गणाधीश प्रभुदेसाई
भारताच्या शेजारील बांगलादेशातील सध्याची एकूण स्थिती चिंता व अस्वस्थ करणारी आहे. तिथे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणुकाही होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष या देशाकडे लागले आहेत. अशा वेळी दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाच्या (बीएनपी) प्रमुख खालिदा झिया यांचे निधन व त्यानंतर त्यांचे पुत्र तारिक रहमान यांची पक्षाच्या अध्यक्षपदी झालेली निवड.
'बीएनपी'च्या स्थायी समितीची बैठक शुक्रवारी पक्षाची सूत्रे रहमान यांच्याकडे सोपविण्यास मंजुरी देण्यात आली. "पाच ऑगस्ट २०२४ रोजी अवामी लीग सरकार पडण्यापूर्वीची राजकीय परिस्थिती देशात परत उद्भवण्याचे कोणतेही कारण नाही. आम्ही पाच ऑगस्टपूर्वीच्या काळात परत जाऊ इच्छित नाही. असे होण्याचे काही कारण नाही," ही अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया फार बोलकी आहे. लंडनमध्ये १७ वर्षांच्या स्वविजनवासानंतर रहमान २५ डिसेंबरला बांगलादेशात परतले. २००८ पासून ते तिथे होते. आता ते परत येताच त्यांच्यावर एक मोठी राजकीय जबाबदारी येऊन पडली आहे. देशात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत ते पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, हे स्पष्ट आहे.
बांगलादेशच्या राजकारणात 'बीएनपी'ची व त्यात त्यांच्या कुटुंबाची नेमही महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे 'राजकारणातील घराणेशाही' या नजरेतून पाहिले तर आता त्यांच्याकडे आलेले पक्षाचे अध्यक्षपद हे काही आश्चर्य वाटण्यासारखे नाही. पण बांगलादेशातील एका प्रमुख पक्षाच्या अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. २००२ मध्ये रहमान हे 'बीएनपी'चे वरिष्ठ संयुक्त सरचिटणीस होते तर २००९ मध्ये ते वरिष्ठ उपाध्यक्ष झाले. २०१८ मध्ये जेव्हा झिया तुरुंगात होत्या तेव्हा रहमान यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यात नेतृत्वगुण आहेत, हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. पण बांगलादेशातील राजकीय परिस्थिती पाहता भविष्यात त्यांची राजकीय कसोटी पणाला लागणार हे नक्की.
राजकीय आणि कूटनीतीच्या संदर्भात भारत आणि बांगलादेश यांचे संबंधही शेजारी म्हणून दोन्ही देशासाठी महत्त्वाचे आहेत. या पार्श्वभूमीवर 'बीएनपी'च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रहमान यांची बांगलादेशमधील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी भेट घेऊन चर्चा केली, यालाही वेगळे महत्त्व आहे. बांगलादेशात 'बीएनपी', जमाते इस्लामी व एनसीपी या पक्षांमध्येच सामना रंगणार आहे. अवामी लीगवर बंदी घालण्यात आली आहे. निवडणूकपूर्व चाचण्यांनी 'बीएनपी'ला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. पण या अंदाजाच्या भरवशावर न राहता मैदानात उतरून आपले कार्यक्रम लोकांपर्यंत व खास करून तरुणांपर्यंत पोचवावे लागतील. पक्षाने प्रसिद्ध केलेले योजनापत्र सर्वसामान्यांपर्यंत पोचविणे व त्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन देण्याचे काम रहमान यांनी करावे लागेल. 'आपल्या योजना या फक्त पक्षासाठी नसून लोक व देशासाठी आहेत,' हे रहमान यांनी कार्यकत्यांना उद्देशून सांगितले आहे. यावरून आगामी निवडणुकीत पूर्ण क्षमतेने उतरण्याची तयारी त्यांनी केल्याचे स्पष्ट होते.
जनआंदोलनानंतर शेख हसीना यांना २०२४ मध्ये देश सोडून पलायन करावे लागले. त्यानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर तिथे महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सत्तेवर आले. दरम्यानच्या काळात शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला. अजूनही त्या भारतातच आहेत. हसीना यांच्या काळात द्वीपक्षीय संबंध चांगले होते. पण आता दोन्ही देशांमध्ये कटुता आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका व रहमान यांची 'बीपीएन'च्या अध्यक्षपदी झालेली निवड लक्षवेधी ठरते. लंडनवरून आल्यानंतर काढलेली रॅली व त्यानंतर घेतलेल्या सभेला जो उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला, हे रहमान यांच्यासाठी दिलासादायक म्हणावे लागेल. खलिदा झिया यांच्या निधनामुळे सहानुभूतीचा फायदाही त्यांनी मिळू शकतो. रहमान यांच्या नेतृत्वाखाली 'बीएनपी' बांगलादेशच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिणार का ? हे पहावे लागेल. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुका जशा बांगलादेशाचे भविष्य ठरविणाऱ्या आहेत तशाच रहमान यांचे राजकीय भवितव्य स्पष्ट करणारी ठरणार आहे.