'X' ला केंद्राचा दणका! एआयद्वारे तयार केलेल्या अश्लील फोटोंबाबत बुधवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
एलन मस्क
एलन मस्क

 

केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) ला अश्लील आणि आक्षेपार्ह फोटोंच्या प्रसारामुळे कडक नोटीस बजावली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने X ला या प्रकरणी कारवाईचा अहवाल सादर करण्यासाठी बुधवारीपर्यंतची मुदत दिली आहे. X च्या ग्रोक या एआय टूलचा वापर करून महिलांचे अश्लील आणि आक्षेपार्ह फोटो तयार केले जात असल्याच्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

मंत्रालयाने X ला आपल्या प्लॅटफॉर्मवरून सर्व प्रकारची अश्लील, विकृत आणि बेकायदेशीर माहिती त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः 'ग्रोक' द्वारे तयार केलेल्या सामग्रीवर तातडीने कारवाई करण्यास सांगितले आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० (IT Act 2000) आणि आयटी नियम २०२१ मधील तरतुदींचे पालन न केल्याबद्दल सरकारने ही नोटीस पाठवली आहे.

सरकारने 'X' कडून येत्या बुधवारीपर्यंत सविस्तर अहवाल मागवला आहे. या अहवालात कंपनीने अशा प्रकारच्या सामग्रीला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), २०२३ अंतर्गत अनिवार्य रिपोर्टिंगचे पालन करण्याबाबतही कंपनीला विचारणा करण्यात आली आहे.

'ग्रोक' या एआय चॅटबॉटचा गैरवापर करून महिलांचे 'डीपफेक' आणि आक्षेपार्ह फोटो तयार केले जात असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे महिलांच्या गोपनीयतेचा भंग होतो आणि त्यांच्या सन्मानाला धक्का पोहोचतो, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे लैंगिक छळासारख्या गंभीर गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता सरकारने वर्तवली आहे.

मंत्रालयाने 'X' ला 'ग्रोक' च्या तांत्रिक आणि प्रशासकीय चौकटीचा सर्वंकष आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. बेकायदेशीर सामग्रीची निर्मिती रोखण्यासाठी कठोर धोरणे राबवणे आवश्यक आहे. नियम मोडणाऱ्या वापरकर्त्यांची खाती निलंबित करणे किंवा कायमस्वरूपी बंद करणे यासारखी कडक कारवाई करण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत.