डॉ. उझ्मा खातून
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेला दहशतवादी हल्ला संपूर्ण देशाला हादरवून गेला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. सशस्त्र दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांची नावे आणि धार्मिक ओळख विचारून त्यांच्यावर हल्ला केला. हा केवळ निर्दोषांवर हल्ला नव्हता, तर भारतातील एकात्मता आणि धर्मनिरपेक्षता तोडण्याचा हा सुनियोजित डाव होता.
दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर पर्यटकांना वेगळे करून त्यांची हत्या केली. केवळ हत्या करणे हा त्यांचा हेतू नव्हता. तर भारतीय हिंदूंच्या मनात मुस्लिमांविषयी विशेषतः काश्मिरी मुस्लिमांविषयी संशय आणि द्वेष करण्याचा त्यांचा डाव होता. त्यातून त्यांना देशात धार्मिक आग पेटवायची होती. हिंसाचारातून त्यांना तणाव आणि सूडाची मालिका सुरू करायची होती. भारतातील शांतता बिघडवून इथले बहुधर्मीय स्वरूप नष्ट करण्याची त्यांची इच्छा होती.
मात्र देशाने या हल्ल्याला संयम आणि एकतेने उत्तर दिले. दहशतवाद्यांच्या डावपेचांना बळी न पडता भारतीयांनी संयम दाखवला. देशात कोणतेही मोठे सांप्रदायिक संघर्ष किंवा सूडाच्या घटना घडल्या नाहीत. दहशतवादावर खरा विजय मिळवायचा असेल तर केवळ हल्लेखोरांना शिक्षा करणे पुरेसे नाही, तर त्यांचा देश तोडण्याचा हेतू हाणून पाडणे गरजेचे आहे हे सामूहिक शहाणपण यावेळी अपवाद वगळता सर्वत्र दिसून आले.
हिमांशी नरवाल यांचे शांततेचे आवाहन
हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांचे आवाहनाने प्रभावी भूमिका पार पाडली.हिमांशी यांनी भावनिक आवाहन करत देशाला सांगितले, "लोकांनी मुस्लिम किंवा काश्मिरींविरुद्ध सुडाने पेटून उठू नये. आम्हाला शांतता हवी, फक्त शांतता. अर्थात, आम्हाला न्यायही हवा आहे. पण सरकारने फक्त ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांच्याविरुद्ध पावले उचलायला हवीत." त्यांच्या सर्वांना आवाहन केले की कोणत्याही समुदायाविरुद्ध तणाव पसरवू नये किंवा सूड घेऊ नये. कारवाई केवळ दोषींवरच व्हायला हवी, असा त्यांचा आग्रह होता.
हिमांशी यांचे हे विधान अशा वेळी आले जेव्हा देशभरात मुस्लिम आणि काश्मिरींविरुद्ध काही ठिकाणी हिंसाचार आणि भेदभावाच्या घटना घडल्या होत्या. शांतता आणि न्यायाची मागणी करणाऱ्या हिमांशी यांच्या या मानवतावादी विधानाचे सर्वत्र कौतुक झाले. भारत ज्या सामंजस्याची आणि करुणेची आकांक्षा बाळगतो, त्याचे त्या प्रतीक ठरल्या. त्यांच्या या मानवतावादी आवाहनाने द्वेष कमी करण्यात मोठी भूमिका बजावली.
राजकीय नेत्यांची एकजूट
सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हल्ल्याचा एकजुटीने निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी पीडितांसोबत एकजूट दाखवली. त्यांनी दहशतवादाविरुद्ध देशाच्या संकल्पाला पाठिंबा दिला. सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांनी सरकारला दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. शांतता आणि एकता टिकवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. काँग्रेस कार्य समितीने विशेष ठरावात सांगितले: "आता राजकारणाची वेळ नाही, तर एकता, सामर्थ्य आणि राष्ट्रीय संकल्पाची वेळ आहे. पक्षीय मतभेद विसरून आपण स्पष्ट संदेश द्यायला हवा की भारत एकजुटीने उभा आहे."
मुस्लिम समुदायाचा आत्मचिंतनाचा क्षण
मुस्लिम समुदायासाठी, विशेषतः काश्मीरमधील मुस्लिमांसाठी ही आत्मचिंतनाची आणि ठाम भूमिका घेण्याची वेळ आहे. पाकिस्तानी घटक धर्माचा गैरवापर करून आपले हेतू पुढे रेटत राहतील. पण भारतीय मुस्लिमांनी त्यांची भारताविषयीची निष्ठा अधोरेखित करायला हवी. ते पाकिस्तानचे प्रतिनिधी नाहीत. ते या मातीचे सुपुत्र आहेत. हा हल्ला त्यांच्या देशावर झाला आहे, ही भूमिका दबावातून नव्हे तर अंतःकरणातून आल्याचे त्यांनी ठासून सांगायला हवे.
हल्ल्यातील बळींमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाविष्ट होते हे लक्षात घ्यायला हवे. आदिल हुसेन या स्थानिक खेचरवाल्याने इतरांना वाचवताना प्राण गमावले. दहशतवाद कोणालाही सोडत नाही आणि सर्वधर्मीय नागरिक त्याचे बळी ठरतात हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
एकात्मतेचा संदेश
पहलगाम घटना ही एक कटू आठवण आहे. खरी लढाई केवळ बंदुका आणि बॉम्बविरुद्ध नाही, तर समाज तोडणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींविरुद्ध आहे. त्यामुळे धार्मिक सौहार्द टिकवणे आणि तणाव निर्माण होऊ न देणे ही प्रत्येक नागरिक, राजकीय नेते आणि संस्थांची जबाबदारी आहे. मृत अधिकाऱ्याच्या पत्नीची करुणामयी प्रतिक्रिया, सर्वपक्षीय नेत्यांनी देशहिताला दिलेले प्राधान्य, आणि सर्धर्मीय नागरिकांनी दाखवलेली एकजूट दहशतवाद्यांच्या हेतूंचा सर्वात मोठा पराभव आहे.
पहलगाम हल्ला केवळ गुन्हा नव्हता, तर एक परीक्षा होती. आपल्या सामर्थ्याची, संयमाची आणि मूल्यांची परीक्षा. दहशतवादाने आपल्याला तोडण्याचा प्रयत्न केला, पण भारतीयांनी एकजुटीने उभे राहून त्याला प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांना तणावाच्या बातम्या हव्या होत्या, पण त्यांना एकतेच्या कहाण्या ऐकायला आणि पाहायला मिळाल्या, जिथे हिंदूंना वाचवताना मुस्लीम धारातीर्थी पडला, तर या मुस्लीमासाठी हिंदू हळहळले... हीच भारताची खरी भावना आहे. हेच भारताचे खरे सामर्थ्य आहे.
आपल्या कृतीतून आपण जगाला हा संदेश द्यायला हवा कि, आम्ही प्रथम भारतीय आहोत. दहशतवाद, अपप्रचार किंवा द्वेष यांपैकी काहीही आम्हाला तोडू शकत नाहीत.
डॉ. उझ्मा खातून
(लेखिकेने अलिगढ मुस्लिम विद्यापीठात अध्यापनाचे काम केले आहे.)