ड्रग्सविरोधात 'एनसीबी'ने हाती घेतली 'ही' मोहीम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत ड्रग माफियांवर आक्रमकपणे कारवाई करत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) अमृतसर विभागाने चार राज्यांमध्ये चार महिन्यांच्या मोहिमेत ड्रग तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश केला." ही माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.  

अमित शहा यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "भारत ड्रग माफियांवर आक्रमकपणे कारवाई करत आहे. एनसीबीच्या अमृतसर विभागाने चार राज्यांमध्ये चार महिन्यांच्या मोहिमेत ड्रग तस्करीच्या जाळ्याचा पर्दाफाश केला. ५४७ कोटींचे ड्रग्स जप्त झाले. १५ जणांना अटक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारताच्या दृष्टिकोनातील हे मोठे पाऊल आहे. एनसीबीच्या टीमचे अभिनंदन."

नशामुक्त भारताच्या संकल्पनेला गती देत एनसीबीने हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील एका वितरकाकडून १.३६ कोटी सायकोट्रॉपिक गोळ्या जप्त केल्या. उत्तराखंडमधील हरिद्वार येथील एका उत्पादकाकडून ११,६९३ कोडिनयुक्त खोकल्याच्या सिरपच्या बाटल्या आणि २.९ किलो ट्रामाडॉल पावडर जप्त केली. या ड्रग्सची किंमत सुमारे ५४७ कोटी रुपये आहे.

पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत औषधांचे बेकायदा वितरण करणाऱ्या मोठ्या जाळ्यांचा पर्दाफाश झाला. शहा यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत गुप्तचर माहितीवर आधारित मोहीम राबवली गेली. यात उत्पादक, वितरक आणि मध्यस्थ यांचे नेटवर्क असल्याचे उघड झाले.

एप्रिल २०२५ ला उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत छापे टाकले गेले. उत्तराखंडमधील जे. आर. फार्मास्युटिकल्सकडून ११,६९३ कोडिन सिरपच्या बाटल्या आणि २.९ किलो ट्रामाडॉल पावडर जप्त झाली. हिमाचल प्रदेशातील एम्बिट बायो मेडिक्स या वितरकाकडून १९,२५,२०० गोळ्या जप्त झाल्या. दिल्लीतील आशी फार्मास्युटिकल्सकडून १.१७ कोटी ट्रामाडॉल आणि अल्प्राझोलम गोळ्या जप्त झाल्या. एम्बिट बायो मेडिक्सचा मालक १८ एप्रिलला दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर व्हिएतनामला पळण्याच्या प्रयत्नात अटक झाला.

तपासात समजले की, एम्बिट बायो मेडिक्सचा मालक यापूर्वी दिल्लीत काम करत होता. तिथे त्याचा ड्रग परवाना डिसेंबर २०२२ मध्ये रद्द झाला होता. ही बाब लपवून त्याने हिमाचल प्रदेशात नवीन परवाना मिळवला. दिल्लीत आपल्या सहकाऱ्याच्या नावाने आशी फार्मास्युटिकल्स नावाची कंपनी स्थापन केली.

एनसीबी जीएसटी विभाग, राज्य औषध नियंत्रक, आयकर प्राधिकरण, सीबीएन आणि वित्तीय संस्थांशी समन्वय साधत आहे. ड्रग तस्करीच्या जाळ्याचा पूर्ण पर्दाफाश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या चार महिन्यांत १.४२ कोटी ट्रामाडॉल आणि अल्प्राझोलम गोळ्या, २.९ किलो ट्रामाडॉल पावडर आणि ९,०१,०८४ कोडिन सिरपच्या बाटlya (सुमारे १३५ टन) जप्त झाल्या. चार राज्यांतून १५ आरोपींना अटक झाली. तपासात इतरांचा सहभाग उघड झाला आहे. पुढील काही आठवड्यांत आणखी जप्ती होण्याची शक्यता आहे.

ड्रग तस्करीच्या जाळ्याचा नायनाट करण्यासाठी एनसीबी कटिबद्ध आहे. नागरिकांनी ड्रग विक्रीची माहिती मनास- राष्ट्रीय नार्कोटिक्स हेल्पलाइन १९३३ वर द्यावी, असे आवाहन एनसीबीने केले आहे.