आपल्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून २००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आणि तेथील तालिबानी राजवट संपुष्टात आली. १९७९ मध्ये रशियाने घुसविलेले सैन्य; १९९६ मध्ये तालिबानने देशावर मिळविलेला कब्जा यांमुळे हजारो नागरिकांनी देशातून पलायन केले होते.
अमेरिकेने ताबा घेतल्यानंतर नवी आशा निर्माण झाल्याने असंख्य जण परतू लागले. त्यांतच साद मोहसेनी यांचा समावेश होता. त्यांचे वडील राजनैतिक अधिकारी. ते कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले तरी मायभूमीची ओढ क्षीण झालेली नव्हती. मायदेशी परतल्यावर अर्थार्जनासाठी व्यवसायाच्या शोधात असतानाच त्यांच्या वडिलांचे स्नेही आणि सांस्कृतिक मंत्री सय्यद मखदूम राहीन यांनी त्यांना नभोवाणी वाहिनी सुरु करण्याचा सल्ला दिला. माध्यमक्षेत्राचा कोणताही अनुभव नसूनही त्यांनी हे घाडसी पाऊल टाकले. वीस वर्षांच्या खडतर पण निश्चयी वाटचालीचे दर्शन साद यांनी पुस्तकातून घडविले आहे.
अरमान (स्थानिक भाषेत आशा) आणि टोलो (सूर्योदय) या अनुक्रमे नभोवाणी आणि टीव्ही वाहिन्यांच्या प्रारंभीच्या काळातील अनुभवांचे वर्णन लेखकाने केले आहे. 'रेडिओ अफगाणिस्तान' या सरकारी नभोवाणी वाहिनीचे तालिबानने 'व्हॉइस ऑफ शरिया' असे केलेले नामांतर; त्या वाहिनीवरून केवळ धार्मिक कार्यक्रम आणि सरकारी घोषणांचे केले जाणारे प्रसारण; पडक्या घरात स्टरूडिओ स्थापन करून सुरू केलेल्या वाहिन्या; कर्मचारी भरतीसाठी आलेले शेकडो अर्ज; त्यांतून तीन महिलांसह नऊ जणांची केलेली निवड; मसूद सांजेरने पाश्चात्य वाहिन्यांसाठीची गलेलठ्ठ पगाराची कामे सोडून अफगाणी नवख्या वाहिनीमध्ये केलेला प्रवेश; संगीत निषिद्ध असणाऱ्या देशात या नवीन वाहिन्यांवरून 'पॉपच्या' सुरु करण्यात आलेल्या कार्यक्रमांना मिळालेला प्रतिसाद; टीव्ही वाहिनीवरून भारतात गाजलेल्या 'क्यू कि सास भी कभी बहू थी' मालिकेचे संवाद स्थानिक भाषेत डब करून केलेले प्रसारण; त्यास लाभलेली लोकप्रियता या कथनातून अमेरिकेच्या प्रवेशानंतर अफगाणिस्तानमधील बदलत्या वातावरणाकडे आणि नागरिकांच्या वाढत्या आकांक्षांकडे लेखक अंगुलीनिर्देश करतोच; पण स्वतंत्र माध्यमाची भूक समाजाला होती हेही अधोरेखित करतो.
मात्र साद यांची खरी कसोटी होती ती ते बातम्या प्रसारित करायला लागल्यापासून. २००१ मध्ये झालेल्या बॉन कराराने हमीद करझाई याना अंतरिम सरकारचे नेतृत्व दिले होते; त्याच कराराने माध्यमस्वातंत्र्याची ग्वाहीही दिली होती; पण प्रत्यक्षात आलेला अनुभव गळचेपीचा कसा होता, याचे प्रत्ययकारी वर्णन लेखकाने केले आहे. 'क्लिनिंग अप दि सिटी' या 'फोन इन'कार्यक्रमातून नागरिकांच्या कैफियतींना मिळालेली वाट; त्या माध्यमातून प्रशासन आणि मंत्र्यांना उत्तरदायी करण्याची 'अरमान ने बजावलेली भूमिका; महिलांवर अत्याचार प्रकरण उघडकीस आणल्यावर त्याचा केलेला पाठपुरवठा; दोषींना झालेली शिक्षा; टोलोवरील 'अलार्म बेल' कार्यक्रमातून राज्यकत्यांची उडवलली खिल्ली; भ्रष्टाचाराला फोडलेली वाचा; यांमुळे या वाहिन्यांना लोकप्रियता व विश्वासार्हता लाभली. या सगळ्यामुळे मंत्री-नोकरशहा मात्र अस्वस्थ झाले.काही तालिबानींची मुलाखत प्रसारित केल्यावर साद हे
तालिबानींचे सहानुभूतिदार आहेत, अशी ओरड करझाई यांनी सुरु केली. त्यांनी वाहिन्यांवर दबाव टाकण्यासाठी अधिकाऱ्यांना मोकळीक दिली. प्रशासनातील साबेत, खुर्रम यांनी साद यांच्यामागे ससेमिरा लावला. अध्यक्षअश्रफ घनी यांची २०१४ मध्ये साद यांची देशातून हकालपट्टी करण्याची योजना करण्यापर्यंत मजल गेली.हे सगळे विवेचन तालिबानीच नव्हे, तर त्यांना हटवून सत्तेवर आलेलेदेखील माध्यमस्वातंत्र्याविषयी किती असहिष्णू होते, याकडे लक्ष वेधते.
तालिबानींनी काही विद्याथ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची बातमी खोटी निघाल्यावर वाहिनीच्या कर्मचाऱ्यांची ने आण करणाऱ्या वाहनावर तालिबानने केलेला हल्ला; त्यात पत्रकारांसह सात जणांचा झालेला मृत्यू; तथापि तरीही जनरल दोस्तम यांच्या कार्यकाळात तालिबानी कैद्यांच्या घुसमटून झालेल्या मृत्यूच्या बातमीचा केलेला पाठपुरवठा; किंवा त्रास देणारे साबेत यांचे नंतर अपहरण झाले, तेव्हा त्यांच्या ठावठिकाणाच्या माहितीसाठी सरकारवर आणलेला दबाव ही निष्पक्ष पत्रकारितेची खूण असे लेखक नमूद करतो. दडपशाहीच्या छायेतही निर्भीड पत्रकारितेचा वस्तुपाठ उभा करता येतो, याची जाणीव करून देणारे हे कथन आहे.
पुस्तक : रेडियो फ्री अफगाणिस्तान : ए द्रेन्टी
इयर ओडिसी फॉर अन इंडिपेन्डन्ट व्हॉइस इन
अफगाणिस्तान
लेखक : साद मोहसेनी, जेत्रा क्राजेस्की
प्रकाशक : विलियम कॉलिन्स
पाने : ३२०; मूल्य : ६९९ रुपये