वांद्रेत सुरू असलेल्या ‘वेव्हज् २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतीय चित्रपटसृष्टीच्या भविष्यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘स्टुडिओज ऑफ द फ्युचर : पुटिंग इंडिया ऑन द वर्ल्ड स्टुडिओ मॅप’ या चर्चासत्रात अभिनेता आमिर खानने सध्या हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरण्याच्या कारणांवर स्पष्टपणे प्रकाश टाकला.
आमिर खानने सांगितले, की ‘भारतात चित्रपटगृहांची संख्या अपुरी असल्यामुळे हिंदी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरत आहेत. सध्या देशात केवळ १० हजार चित्रपटगृहे आहेत. यातील निम्म्याहून अधिक चित्रपटगृहे हे दक्षिण भारतात आहेत. तर उर्वरित संख्येत इतर संपूर्ण भारतात विखुरलेले आहेत. याच तुलनेत अमेरिकेत ४० हजार आणि चीनमध्ये तब्बल ९० हजार चित्रपटगृहे आहेत. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या खूपच अपुरी असून त्यामुळे केवळ दोन टक्के प्रेक्षकवर्ग चित्रपटगृहांपर्यंत पोहोचतो.’
भारतातील सर्वात मोठे यशस्वी चित्रपटही आजपर्यंत केवळ तीन कोटी प्रेक्षकांपर्यंतच पोहोचले आहेत, जे एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के इतकेच आहे. उर्वरित ९८ टक्के प्रेक्षक कुठे आणि कसे चित्रपट पाहत आहेत, यावरही आमिर खानने प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सध्याच्या चित्रपटप्रदर्शन यंत्रणेत मोठी दरी असल्याचे अधोरेखित केले. ‘ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये अधिक छोटी चित्रपटगृहे सुरू केल्यास चित्रपटसृष्टीला मोठा फायदा होईल. चित्रपट बघायला रसिक आहेत; पण त्यांच्यापर्यंत पोहोचायला साधनेच नाहीत,’ असेही आमिरने सांगितले.
'वेव्हज् २०२५’ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून हिंदी चित्रपटसृष्टीच्या पायाभूत सुविधा उभारणीविषयी गंभीर चर्चा झाली. अधिकाधिक चित्रपटगृहांची निर्मिती ही केवळ व्यवसायासाठी नव्हे तर भारतातील सांस्कृतिक बाजू जपण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे आमिर खानच्या आपल्या भाषणातून अधोरेखित झाले. निर्माते दिनेश विजन यांनी चांगले चित्रपट बनविले तर प्रेक्षक नक्कीच चित्रपटगृहांमध्ये येतात. त्यामुळे चांगले कथाबीज असलेल्या चित्रपटांची निर्मिती होणे आवश्यक आहे. निर्माते रितेश सिधवानी यांनी कोरोनानंतर चित्रपटगृहांतील प्रेक्षक संख्या कमी झाली आहे. त्यामुळे उत्तमोत्तम चित्रपट बनविणे आवश्यक असल्याचे त्याने नमूद केले.