भारताच्या महिलांच्या क्रिकेट संघाने विश्वकरंडक जिंकून जो पराक्रम गाजवला, तो १९८३ च्या कपिल देवच्या संघाइतकाच, किंवा खरे तर त्यापेक्षा कैक पटींनी अधिक मोलाचा आहे.
एकशेबारा वर्षापूर्वी केरळातल्या कोट्टयम गावात बेकर्स शाळेच्या पटांगणात मुख्याध्यापिका ॲन केलवेबाईंनी मुलींना क्रिकेटच्या खेळातला पहिला चेंडू टाकायला लावला. या केलवेबाईंनी क्रिकेट कंपल्सरीच केले होते, आणि त्या पहिल्या चेंडूनिशी भारतीय महिला क्रिकेटचा जन्म झाला होता. त्यानंतर रविवारी संध्याकाळी थेट नवी मुंबईत महिला क्रिकेटविश्वातली ती सोनेरी पहाट उगवली.
हरमनप्रीत कौरने दक्षिण आफ्रिकेच्या नॅडिन डी क्लर्कचा झेल धावत जाऊन पकडला, तो क्षणही काही साधासुधा नव्हता. एका प्रदीर्घ खडतर प्रवासाची मंझिल गाठण्याचा तो सुवर्णक्षण होता. दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी चोख पराभव करत महिलांच्या भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वकरंडकावर नाव कोरले, तेव्हा देशभरातले कोट्यवधी क्रिकेटवेडे श्वास रोधून टीव्ही आणि मोबाइल फोनला चिकटले होते.
मध्यरात्रीचा प्रहर गाठता गाठता देशभरातले ढगाळ आकाश नळेचंद्रज्योतींनी उजळून निघाले. फटाक्यांच्या धमाक्यांनी दशदिशा दुमदुमल्या. ‘छे, केवढे हे ध्वनिप्रदूषण’ असा किरटा सूर लावण्याचेही कुणाला सुचले नाही. दिवाळी नुकतीच संपली असली तरी भारतीयांच्या घरातले फटाके संपले नव्हते, आणि दिवाळीनंतरची ही दिवाळी अधिक सुंदर, अधिक तेजस्वी होती, हे कोणीही मान्य करावे.
तसे पाहू गेल्यास विश्वकरंडक किंवा कुठलीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा जिंकल्यानंतरचे कवित्व भारताला नवीन नाही. पुरुषांच्या स्पर्धेत हा पराक्रम अनेक वेळा घडून गेला आहे. जिंकले की डोक्यावर घ्यायचे आणि पराभूत होऊन आले की चपलांचे हार, शिव्याशाप यांची बरसात करायची, असा आपला खाक्या. महिला क्रिकेटचे विश्व मात्र या सगळ्यापासून संकोचामुळे, दुर्लक्षामुळे काहीसे दूरच होते. ते मळभ रविवारच्या संध्याकाळी अचानक दूर झाले.
हरमान कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, आदींचा भारतीय संघ यंदा विश्वकरंडक जिंकणार असा विश्वास होताच. कारण यंदा पहिल्यांदाच पूर्ण तयारीने, पूर्ण क्षमतेने, पूर्ण फॉर्ममध्ये भारतीय क्रिकेटपटू खेळल्या. साखळी लढतीतले सुरवातीचे अडखळणे सोडले तर पुढे स्मृती मानधनाची बॅट तळपती राहिली, आणि सर्वाधिक ४३४ धावा तिने संपूर्ण स्पर्धेत कुटल्या.
विश्वकरंडकातील सर्वाधिक धावांचा विक्रम भारताच्याच मिताली राजच्या नावावर होता, तो या दरम्यान स्मृती घेऊन गेली. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर क्रिकेटचे सामने होतात. पण जादू चालते वानखेडे स्टेडियमचीच. एरवी ‘अरिजित सिंग’ किंवा ‘कोल्डप्ले’चे जलसे जिथे होतात, त्या डीवाय पाटील स्टेडियमवर रविवारी जो इतिहास घडला, तो पुढली अनेक दशके ताजा राहणार आहे.
१९८३ मध्ये कपिलदेवच्या भारतीय संघाने प्रुडेन्शियल विश्वकरंडक लॉर्ड्सवर जिंकला होता, त्याचे पवाडे अजूनही थांबलेले नाहीत. थांबण्याचे कारणही नाही, कारण भारतीय क्रिकेटने कात टाकण्याचा तो मन्वंतरकारी क्षण मानला जातो. महिलांच्या संघाने डीवाय पाटील स्टेडियमवर जो पराक्रम गाजवला, तो कपिलच्या संघाइतकाच, किंवा खरे तर त्यापेक्षा कैक पटींनी अधिक मोलाचा आहे.
कारण भारतीय महिला क्रिकेटने फार फार हालअपेष्टा काढल्या आहेत. कुचेष्टा, विटंबना, हेळसांड, दुर्लक्ष असे सारे भोग भोगले आहेत. एकवेळ अशी होती की महिलांच्या संघाकडे गणवेशाची बात सोडा, साधे किट नव्हते. जेव्हा भारतीय पुरुष क्रिकेट सितारे पंचतारांकित हॉटेलमध्ये राहात आणि मदमस्त मेजवान्या झोडत, त्या काळी महिलांचा चमू लढतीच्या ठिकाणी एखाद्या रिकाम्या शाळेत, डॉर्मिटरीत उंदिर-झुरळांच्या संगतीत राहात होता.
पुरुष सितारे विमानाने उडत होते, तेव्हा महिला क्रिकेटपटू सेकंड क्लासच्या रेल्वेडब्यात द्रोणातले दहिवडे खात प्रवास करत होत्या. डायना एडुलजी, शांता रंगास्वामी, शुभांगी कुलकर्णी, सुधा शहा अशा क्रिकेटपटूंनी महिला क्रिकेटचा पाया रचला. भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वकरंडकात पहिल्यांदा उतरला तो १९७८ मध्ये.
पण तेव्हा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आणि इंग्लंडच्या संघासमोर भारताची डाळ शिजली नाही. २००६ मध्ये ‘आयसीसी’च्याच दट्ट्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला क्रिकेटची जबाबदारीही शिरावर घेतली, त्यानंतर महिला क्रिकेटपटूंची दैन्यावस्था संपुष्टात आली.
त्याआधी २००५ मध्ये भारताच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारुन दाखवली होती, त्यानंतरच हा चमत्कार घडला. २०१७ मध्येही विश्वकरंडक भारतीय संघाच्या हातून अगदी नऊ धावांनी निसटला.
यंदा मात्र या सगळ्या नष्टचर्याचे उट्टे फेडले गेले. आता या जगज्जेत्या संघावर इनाम आणि स्तुतीसुमनांची बरसात होते आहे. स्पर्धा जिंकल्याबद्दलची चाळीसेक कोटींची बक्षीसरक्कम संघाला मिळालीच आहे, शिवाय भारतीय नियामक मंडळानेही आणखी ५१ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. आणखीही पैशांचा पाऊस पडेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
कारण भारतात क्रिकेट हेच इतके चलनी नाणे आहे की, यशस्वी क्रिकेट सिताऱ्यांवर माया ओतण्यासाठी अनेक धनाढ्य मेघ उत्सुक असतात. तथापि, हे सगळे घडायलाच हवे. कारण या विजयानंदामागे फक्त क्रिकेटची पुण्याई नाही, यापेक्षा खूप काही आहे.
स्त्रियांना दुर्बल ठरवणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीचा सणसणीत मुखभंग म्हणूनही या विजयाकडे पाहावे लागेल. ‘चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला, अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’ या कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती आता भारतीय महिला क्रिकेटचे गर्वगीत ठराव्यात.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -