अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये मंगळवारी लेफ्टनंट गव्हर्नर पदाच्या शर्यतीत डेमोक्रॅट पक्षाच्या गझाला हाश्मी यांनी जॉन रीड यांचा पराभव करत विजय मिळवला. गझाला हाश्मी या व्हर्जिनियामध्ये राज्यस्तरीय पद जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय अमेरिकन आणि पहिल्या मुस्लिम महिला आहेत.
हाश्मी या माजी महाविद्यालयीन प्राध्यापिका आहेत. त्यांनी जून महिन्यात झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या गर्दीच्या प्राइमरीमध्ये विजय मिळवून हे नामांकन पटकावले होते.
लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून, हाश्मी या व्हर्जिनियाच्या राज्य सिनेटचे अध्यक्षपद भूषवतील. हे सभागृह सध्या अगदी निसटत्या बहुमतावर विभागलेले आहे, डेमोक्रॅट्सकडे सध्या २१-१९ असे जागांचे किरकोळ बहुमत आहे. सिनेटमध्ये मतांची बरोबरी (टाय) झाल्यास लेफ्टनंट गव्हर्नर मतदान करतात. हाश्मी यांच्या विजयाचा अर्थ असाही होतो, की त्यांची सिनेटमधील जागा आता एका विशेष निवडणुकीद्वारे भरावी लागेल.
दरम्यान, माजी काँग्रेसवुमन (Congresswoman) अबिगेल स्पॅनबर्गर यांनी रिपब्लिकन लेफ्टनंट गव्हर्नर विन्सम अर्ल-सियर्स यांचा पराभव केला. स्पॅनबर्गर यांनी सियर्स यांच्यापेक्षा जास्त निधी (outraised) जमवला होता. सियर्स यांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन मिळवण्यात अपयश आले होते.
व्हर्जिनिया आणि न्यू जर्सी इथे मतदारांनी मंगळवारी गव्हर्नरची निवड केली. न्यूयॉर्क शहरातील मतदार देखील नवीन महापौराची निवड करत होते. कॅलिफोर्नियामध्ये, मतदार एका नवीन काँग्रेस नकाशाला मंजुरी देण्याबाबत निर्णय घेत होते. हा नकाशा पुढच्या वर्षीच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅट्सना पाच अतिरिक्त यूएस हाऊस जागा जिंकण्यास मदत करण्यासाठी तयार केला आहे.
कोण आहेत गझाला हाश्मी?
हाश्मी या व्हर्जिनियाच्या राज्य सिनेटवर निवडून आलेल्या पहिल्या मुस्लिम महिला आणि पहिल्या दक्षिण आशियाई अमेरिकन आहेत. त्यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला आणि वयाच्या ४ थ्या वर्षी त्या अमेरिकेत आल्या आणि आपल्या कुटुंबासह जॉर्जियामध्ये स्थायिक झाल्या.
हाश्मी यांनी अमेरिकन साहित्यात पीएचडी (PhD) केली आहे. त्यांनी त्यांच्या व्यावसायिक आयुष्याचा मोठा काळ प्राध्यापिका म्हणून घालवला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ रिचमंड आणि नंतर रेनॉल्ड्स कम्युनिटी कॉलेजमध्ये अध्यापन केले.
२०१९ मध्ये, त्यांनी रिपब्लिकन ग्लेन स्टर्टव्हंट यांचा एका अटीतटीच्या शर्यतीत पराभव करून व्हर्जिनिया सिनेटमध्ये प्रवेश केला. २०२३ मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या. सिनेटमध्ये त्यांनी प्रजनन हक्कांचा (reproductive rights) जोरदार पुरस्कार केला.
त्यांच्या एका प्रमुख विधेयकाचा उद्देश व्हर्जिनियामधील नागरिकांच्या गर्भनिरोधक साधनांच्या उपलब्धतेचे (access to contraception) संरक्षण करणे हा होता. हे विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाले, परंतु गव्हर्नर ग्लेन यंगकिन यांनी ते फेटाळून लावले.