अफगाणिस्तानात सोमवारी आलेल्या ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपात किमान २० जण ठार झाले असून ३२० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या भूकंपाने देशातील प्रसिद्ध 'निळ्या मशिदी'चेही (Blue Mosque) मोठे नुकसान केले आहे.
'यूएस जिओलॉजिकल सर्व्हे'नुसार (USGS), या भूकंपाचे केंद्र मझार-ए-शरीफ या देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एकाजवळ, २८ किलोमीटर खोलीवर होते. मझार-ए-शरीफची लोकसंख्या सुमारे ५,२३,००० इतकी आहे.
आरोग्य विभागाचे प्रवक्ते समीम जोयंदा यांनी सांगितले की, मृतांचा आणि जखमींचा हा आकडा सोमवार सकाळपर्यंत रुग्णालयांकडून मिळालेल्या अहवालांवर आधारित आहे. हा भूकंप उत्तर अफगाणिस्तानातील समंगन या डोंगराळ प्रांतात झाला, जो मझार-ए-शरीफजवळ आहे.
या शक्तिशाली भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, एका घराजवळील सीसीटीव्हीमध्ये ते रेकॉर्ड झाले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
बल्ख प्रांताचे प्रवक्ते हाजी झैद यांनी पुष्टी केली की, या भूकंपात मझार-ए-शरीफ येथील पवित्र दर्ग्याचा (निळी मशीद) काही भाग उद्ध्वस्त झाला आहे. मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.