गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेला व्यापारी तणाव आणि मतभेद बाजूला सारत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची गुरुवारी दक्षिण कोरियात भेट झाली. सहा वर्षांनंतर झालेल्या या पहिल्याच भेटीत, अध्यक्ष ट्रम्प यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेत, दोन्ही देशांमध्ये "विलक्षण" संबंध प्रस्थापित होतील, असा विश्वास व्यक्त केला.
या भेटीनंतर ट्रम्प म्हणाले, "हा एक मोठा सन्मान आहे... मला वाटते की आपले संबंध दीर्घकाळासाठी विलक्षण असणार आहेत - आणि तुम्ही आमच्यासोबत आहात हा आमचा सन्मान आहे."
ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांचे कौतुक करताना त्यांना "एका महान देशाचे महान नेते" म्हटले. ते पुढे म्हणाले, "आम्ही आधीच अनेक गोष्टींवर सहमती दर्शवली आहे आणि आता आणखी काही गोष्टींवर सहमत होऊ. राष्ट्राध्यक्ष शी हे एका महान देशाचे महान नेते आहेत आणि मला वाटते की आपले संबंध दीर्घकाळासाठी विलक्षण राहतील."
यावर प्रतिक्रिया देताना, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की, "जरी दोन्ही देश नेहमीच प्रत्येक गोष्टीवर सहमत नसले, तरी त्यांनी 'भागीदार आणि मित्र' बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे." ते म्हणाले, "चीन आणि अमेरिका या दोन्ही प्रमुख देशांनी आपली जबाबदारी संयुक्तपणे पार पाडली पाहिजे आणि दोन्ही देशांच्या आणि संपूर्ण जगाच्या भल्यासाठी अधिक ठोस गोष्टी साध्य करण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे."
या बैठकीनंतर, अध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले की, दोन्ही देशांमध्ये 'चायना रेअर अर्थ करारा'वर (China rare earths agreement) सहमती झाली आहे, जो एक वर्षासाठी वैध असेल आणि पुढे वाढवण्याचा पर्यायही असेल. ट्रम्प यांनी या भेटीला " मोठे यश" म्हटले आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये सहा वर्षांनंतर ही भेट झाली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये जपानमधील ओसाका येथे G20 शिखर परिषदेच्या निमित्ताने त्यांची भेट झाली होती. त्या बैठकीतही व्यापार आणि आर्थिक तणावाच्या मुद्द्यांवरच मुख्य चर्चा झाली होती. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष शी यांनी परस्पर फायद्याच्या संबंधांवर भर दिला होता आणि अध्यक्ष ट्रम्प यांनी चिनी निर्यातीवर कोणतेही अतिरिक्त शुल्क न लावण्याचे मान्य केले होते.