अखेर तो क्षण आला! भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी इतिहास रचला. डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात, भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच 'विश्वविजेते' होण्याचा मान पटकावला. या ऐतिहासिक विजयाने २००५ आणि २०१७ च्या अंतिम सामन्यातील पराभवाच्या कटू आठवणी पुसून काढल्या.
या विजयाचा आनंद साजरा करत, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 'विमेन्स इन ब्लू'साठी ५१ कोटी रुपयांच्या भव्य बक्षीसाची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी ही घोषणा केली. एएनआयशी बोलताना सैकिया म्हणाले, "बीसीसीआयने संपूर्ण संघ – खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे."
त्यांनी या विजयाची तुलना १९८३ च्या विजयाशी केली. ते म्हणाले, "१९८३ मध्ये कपिल देव यांनी विश्वचषक जिंकून भारतात क्रिकेटचे नवे युग आणि उत्साह आणला. तोच उत्साह आणि प्रोत्साहन आज या महिलांनी आणले आहे."
या अंतिम सामन्यात शेफाली वर्माने आपल्या तुफानी फलंदाजीने आणि उपयुक्त गोलंदाजीने 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब पटकावला. तर, संपूर्ण स्पर्धेत २१५ धावा आणि २२ बळी घेणारी अष्टपैलू दीप्ती शर्मा'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरली. दीप्तीने अंतिम सामन्यातही अर्धशतक आणि महत्त्वपूर्ण ५ बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.
बीसीसीआयच्या ५१ कोटींच्या बक्षीसाव्यतिरिक्त, विजेत्या संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) अंदाजे ४० कोटी रुपयांचे बक्षीसही मिळणार आहे.
देवजित सैकिया यांनी नमूद केले की, "जेव्हा आपल्या संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवले, तेव्हाच महिला क्रिकेट पुढच्या स्तरावर पोहोचले होते." त्यांनी 'पे पॅरिटी' (समान मानधन) आणि आयसीसीच्या बक्षीस रकमेतील वाढ यांसारख्या अलीकडील प्रशासकीय बदलांचे श्रेयही दिले. मात्र, काही विश्लेषकांच्या मते, हे ५१ कोटी रुपयांचे बक्षीस, गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या पुरुष संघाला मिळालेल्या बक्षीसाच्या जवळपास निम्मेच आहे.