अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, देशाच्या अणुचाचण्या (Nuclear Weapons Testing) पुन्हा सुरू करण्याच्या आपल्या आदेशावर अधिक तपशील देण्यास नकार दिला आहे. "तुम्हाला लवकरच कळेल," (You'll find out very soon) असे गूढ वक्तव्य त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले. रशिया आणि चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.
फ्लोरिडा येथील एका रॅलीला जाण्यापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना, ट्रम्प यांनी आपल्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. रशियाने नुकतीच एका अणु-सक्षम पाण्याखालील ड्रोनची यशस्वी चाचणी केली होती. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पेंटागॉनला (संरक्षण मंत्रालय) चीन आणि रशियाच्या बरोबरीने अणुचाचण्या सुरू करण्याचे आदेश दिले होते.
या निर्णयाबद्दल अधिक विचारले असता ट्रम्प म्हणाले, "आमच्याकडे दुसरा पर्याय नाही... रशिया आणि चीनसारखे देश अशा शस्त्रांच्या चाचण्या करत आहेत, ज्याबद्दल आपल्याला माहितीही नाही, अशा स्थितीत आम्ही राहू शकत नाही... आम्हाला 'टॉप ऑफ द पॅक' (सर्वात पुढे) रहावे लागेल."
मात्र, या चाचण्या नेमक्या कधी आणि कशा सुरू केल्या जातील, याबद्दल तपशील देण्यास त्यांनी नकार दिला आणि केवळ "तुम्हाला लवकरच कळेल," असे उत्तर दिले.
ही घोषणा अशा वेळी झाली आहे, जेव्हा अध्यक्ष ट्रम्प लवकरच दक्षिण कोरियात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत एका उच्चस्तरीय शिखर परिषदेसाठी भेटणार आहेत.