कठोर परिश्रम आणि चिकाटीला पर्याय नाही – शाहरूख खान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 17 d ago
अभिनेता शाहरुख खान
अभिनेता शाहरुख खान

 

जागतिक स्तरावर भारताच्या मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 'वेव्हज २०२५' परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हा चार दिवसांचा कार्यक्रम मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या शिखर परिषदेत अनेक मोठे बॉलीवूड स्टार सहभागी होत आहेत. त्यामध्ये बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान, अनुपम खेर, आमिर खान आणि रणबीर कपूर सारखी नावे आहेत. 

वेव्हज या शिखर परिषदेची संकल्पना मांडल्याबद्दल आणि ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अभिनेता शाहरुख खान याने चित्रपट उद्योगाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली. या परिषदेमध्ये मनोरंजन उद्योगाला अधिक मजबूत करण्याची क्षमता असल्याचे त्याने सांगितले. हे व्यासपीठ उद्योगासाठी किती समर्पक आहे आणि ते विविध आघाड्यांवर सरकारकडून अत्यंत आवश्यक समन्वय आणि पाठबळ उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्था आणि उद्योगांशी विविध प्रकारचे करार भारताच्या मनोरंजन उद्योगाला आकार देण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात यावर त्यांनी भर दिला. शाहरूख खानने द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांतील प्रेक्षकांसाठी भारतीय सिनेमा अधिक परवडणारा बनवण्यावरही भर दिला. या शहरांमध्ये एकल पडदा असलेल्या चित्रपटगृहांमध्ये सिनेमा पाहण्‍याचा अनुभव निर्माण करण्याची संकल्पना त्यांनी मांडली, ज्यामुळे चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही वेव्हज्‌चे महत्त्व मांडले. माध्‍यम आणि मनोरंजन उद्योगातील विविध माध्यमांना एकत्र आणण्याची ही अचूक वेळ असल्याचे ती म्हटली. दीपिका पदुकोणने सांगितले की, "या क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आतापर्यंत माहितीचे आदान- प्रदान किंवा सहकार्य मर्यादित स्वरूपात केले जात होते, पण वेव्हज्‌चे स्वरूप व्यापक आहे आणि त्यात चित्रपट, ओटीटी, ॲनिमेशन, कृत्रिम प्रज्ञा आणि इतर भासमान तंत्रज्ञाने एकत्र आणण्याची क्षमता आहे."

वेव्हज्‌ शिखर परिषदेच्या पहिल्या दिवसानिमित्त आयोजित ‘द जर्नी: फ्रॉम आउटसाइडर टू रुलर’ या सत्रात अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपट निर्माते करण जोहर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी चित्रपट उद्योगातील त्यांच्या प्रवासावर आणि स्वतःचे वेगळे स्थान कसे निर्माण केले ते सांगितले. शाहरुख खान यांनी ‘आउटसाइडर-इनसाइडर’ टॅग्जबद्दल आपले विचार मांडले आणि तरुणांनी इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच चित्रपट उद्योगाकडे पाहण्याचे आवाहन केले. इथेही कठोर परिश्रम आणि चिकाटीला पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले.

समाजमाध्‍यमे आणि प्रतिमा व्यवस्थापनाच्या आजच्या काळात मनोरंजन उद्योगाच्या बदलत्या परिमाणांबद्दल शाहरुख खानने नवीन कलाकारांना केवळ त्यांच्या विशिष्‍ट प्रतिमा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्यातील कौशल्यांकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांच्यातील अद्वितीय गुण आणि क्षमतांद्वारे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे, असे सांगितले.