भारत आणि पाकिस्तानमधील अण्वस्त्र तणाव कमी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने मोठी मदत झाली आहे, असा दावा अमेरिकेच्या इंटेलिजन्स कम्युनिटीच्या वार्षिक धोक्याच्या मूल्यमापन अहवालात करण्यात आला आहे. दोन्ही देशांपैकी कोणालाही उघड संघर्षात रस नसल्याचे दिसत असले तरी, दहशतवादी घटकांमुळे दक्षिण आशियात सातत्याने सुरक्षा जोखीम निर्माण होत असल्याचा इशाराही या अहवालात दिला आहे.
दोन अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधील जुन्या संघर्षांमुळे भारत-पाकिस्तान संबंध अजूनही स्फोटक ठरू शकतात, असे या अहवालात नमूद केले आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम जवळ गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा दाखला देत, अशा हल्ल्यांमुळे संघर्षाची ठिणगी पडू शकते, असेही यात म्हटले आहे.
२०२६ च्या वार्षिक धोक्याच्या मूल्यमापन अहवालानुसार, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे अलीकडचा अण्वस्त्र तणाव निवळला असून दोन्ही देश उघड संघर्षाकडे परतण्याची शक्यता कमी आहे." मात्र, दहशतवादी गट अजूनही संकट निर्माण करण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगत अहवालात सावधगिरीचा इशारा दिला आहे.
प्रादेशिक दहशतवादावर भाष्य करताना या अहवालात म्हटले आहे की, "ISIS-K या भागात आपले पाय रोवून असून बाह्य हल्ले करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे." दरम्यान, तालिबानने या गटाविरुद्ध आक्रमक पावले उचलली असून काही हल्ले यशस्वीपणे हाणून पाडल्याचेही यात नमूद केले आहे.
पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र क्षमतेबद्दलही या अहवालात चिंता व्यक्त केली आहे. "पाकिस्तान सातत्याने अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करत आहे." या तंत्रज्ञानामुळे पाकिस्तान दक्षिण आशियाच्या पलीकडे असलेल्या लक्ष्यांवर, अगदी आंतरखंडीय अंतरावरही मारा करण्यास सक्षम होऊ शकतो, असे यात म्हटले आहे.
पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात वाढत्या तणावाचा उल्लेखही अहवालात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सीमेवर झालेल्या चकमकी आणि लष्करी संघर्षाचा दाखला देत, "ही लढाई सुरूच आहे," असे अहवालात म्हटले आहे. शाश्वत शांततेसाठी तालिबानने पाकिस्तानला लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी गटांशी असलेले संबंध तोडणे आवश्यक असल्याचेही यात नमूद केले आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह २६ जणांचा मृत्यू झाला होता. जम्मू-काश्मीरमधील बैसरन खोऱ्यात डोंगरावरून खाली आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला होता. निसर्गरम्य हिरवळीमुळे या भागाला मिनी स्वित्झर्लंड असेही म्हटले जाते. या हल्ल्यानंतर भारताने ६ आणि ७ मे च्या दरम्यानच्या रात्री पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अनेक हल्ले केले.
भारतीय सशस्त्र दलांनी अत्यंत अचूक आणि सुनियोजित कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक आणि साथीदार मारले गेले. यात प्रामुख्याने जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता.