दक्षिण पार्स गॅस फील्डवरील इस्रायली हल्ल्यावरून आखाती देशांत युद्ध भडकले; तेलाच्या किमतीत मोठी वाढ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत तेहरान कतारसारख्या निष्पाप देशावर हल्ला करण्याचा चुकीचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत इस्रायल इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावर पुन्हा हल्ला करणार नाही. इस्रायलने इराणच्या दक्षिण पार्स ऑफशोअर लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) क्षेत्रावर हल्ला केल्यानंतर तेहरानने प्रत्युत्तरादाखल पर्शियन आखाती देशांच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले तीव्र केले होते. यामध्ये कतारमधील गॅस सुविधांना लक्ष्य करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.

इस्रायलने युद्धाच्या संतापातून हे पाऊल उचलले असून ही कारवाई अत्यंत हिंसक होती, असा दावा अमेरिकेच्या कमांडर-इन-चीफनी केला आहे. इराणच्या गॅस क्षेत्राविरुद्ध केलेल्या या कारवाईची अमेरिकेला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांनी लिहिले, "मध्यपूर्वेत घडलेल्या घटनांच्या रागातून इस्रायलने इराणमधील दक्षिण पार्स गॅस फील्ड नावाच्या मोठ्या सुविधेवर हिंसक हल्ला केला आहे. या संपूर्ण क्षेत्राच्या तुलनेत एका लहान भागाला फटका बसला आहे. या विशिष्ट हल्ल्याबद्दल अमेरिकेला काहीही माहिती नव्हती. कतारचा यामध्ये कोणत्याही प्रकारे संबंध नव्हता किंवा असा काही प्रकार घडणार आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती."

ते पुढे म्हणाले, "दुर्दैवाने इराणला ही वस्तुस्थिती माहित नव्हती आणि त्यांनी अन्यायकारकपणे कतारच्या एलएनजी गॅस सुविधेवर हल्ला केला."

ट्रम्प यांनी आश्वासन दिले की, "जोपर्यंत इराण कतारसारख्या निष्पाप देशावर हल्ला करण्याचा मूर्खपणा करत नाही, तोपर्यंत इस्रायलकडून या अत्यंत महत्त्वाच्या दक्षिण पार्स क्षेत्रावर पुन्हा कोणतेही हल्ले केले जाणार नाहीत."

तथापि, जर इराणने कतारवर हल्ला केला, तर अमेरिका इस्रायलच्या मदतीशिवाय किंवा संमतीशिवाय दक्षिण पार्स गॅस फील्ड पूर्णपणे उडवून देईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. इराणने यापूर्वी कधीही पाहिली नसेल इतकी ताकद आणि शक्ती वापरून हा हल्ला केला जाईल, असेही त्यांनी बजावले.

"इराणच्या भविष्यावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांमुळे मला इतक्या मोठ्या प्रमाणावर विनाश आणि हिंसाचार करायचा नाही. परंतु जर कतारच्या एलएनजी सुविधेवर पुन्हा हल्ला झाला, तर मी मागेपुढे पाहणार नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.

कतारवर इराणचा हल्ला
कतारची सरकारी तेल आणि वायू कंपनी 'कतार एनर्जी'ने म्हटले आहे की, इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे देशातील एलएनजी स्थळांचे मोठे नुकसान झाले असून तिथे भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्याचा प्रयत्न करत असून अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. कतार हा जागतिक ऊर्जा बाजारपेठेसाठी नैसर्गिक वायूचा मुख्य स्रोत आहे. युद्धाच्या सुरुवातीलाच त्यांनी उत्पादन बंद केले होते, परंतु झालेल्या मोठ्या नुकसानामुळे युद्ध संपल्यानंतरही बाजारपेठेत पुरवठा करण्यास विलंब होऊ शकतो.

इराणवर इस्रायलचा हल्ला
बुधवारी इस्रायलने इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावर हल्ला केला. यामुळे संपूर्ण प्रदेशातील ऊर्जेचा मुख्य स्रोत धोक्यात आला. प्रत्युत्तरादाखल इराणने कतारमधील गॅस सुविधांना लक्ष्य केले. याला उत्तर म्हणून कतारने इराणी दूतावासातील अधिकाऱ्यांना २४ तासांच्या आत देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत.

तेहरानने संयुक्त अरब अमिरातीमधील 'हबशान' गॅस सुविधा आणि 'बाब' क्षेत्रावरही हल्ले केले. अमिराती सरकारने याला इस्रायल आणि अमेरिकेविरुद्धच्या इराणच्या युद्धातील "धोकादायक वाढ" असे म्हटले आहे. अबू धाबीमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्थळांवरील हल्ले हाणून पाडल्यानंतर गॅस प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.

कतार आणि संयुक्त अरब अमिरातीवरील या हल्ल्यांमुळे आखाती अरब देशांवर दबाव वाढत आहे. २८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून हे देश इराणी हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करत आहेत. त्यांच्या लष्करी तळांवर आणि ऊर्जा केंद्रांवर हल्ले होऊनही त्यांनी इराणविरुद्ध कोणतीही आक्रमक कारवाई केलेली नाही.

इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक रोखल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत पुन्हा ५ टक्क्यांनी वाढ होऊन प्रति बॅरल १०८ डॉलरवर पोहोचल्या आहेत. जगातील एकूण तेल वाहतुकीपैकी एक पंचमांश वाहतूक या मार्गातून होते. युद्धाच्या सुरुवातीपासून ब्रेंट क्रूडच्या किमतीत आतापर्यंत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एककीडे हा तणाव वाढत असतानाच, ट्रम्प प्रशासनाने तेलाचा पुरवठा वाढवण्यासाठी व्हेनेझुएलावरील निर्बंध शिथिल केले आहेत. अमेरिकन कंपन्यांना व्हेनेझुएलाच्या सरकारी तेल आणि वायू कंपनीसोबत व्यापार करण्याची परवानगी बुधवारी देण्यात आली आहे.