"भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देणे ही माझी जबाबदारी आहे," असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. तिन्ही सैन्यदलांबरोबर समन्वय साधून देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे माझे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले. राजधानी दिल्लीत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सनातन संस्कृती जागरण महोत्सवात ते बोलत होते.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीची आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची लोकांना चांगली ओळख आहे. मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की, जे व्हायला हवे अशी तुम्हा सर्वांची इच्छा आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच होईल," असे सूचक वक्तव्य राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे. पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले की, सरकार याबाबत योग्य ती सर्व पावले उचलत आहे. "पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी, त्यांना मदत करणारे आणि या हल्ल्याचे सूत्रधार या साऱ्यांना कठोर शासन होईल," असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी राजनाथ सिंह यांनी देशातील साधुसंतांचेही कौतुक केले. आध्यात्मिक नेते आणि संत हे देशाच्या संस्कृतीचे संरक्षण करतात, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. हा देश योद्ध्यांप्रमाणेच ज्ञानी आणि संतमहंतांमुळेही ओळखला जातो, असे राजनाथ सिंह म्हणाले.