परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरी तीव्र केली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सात अस्थायी सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली. भारताची चिंता मांडताना त्यांनी जागतिक एकजुटीचे आवाहन केले.
जयशंकर यांचे मंगळवारी स्लोव्हेनिया, पनामा, अल्जीरिया आणि गयानाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी स्वतंत्रपणे फोनवर बोलणे झाले. इतर अस्थायी सदस्य देशांमध्ये डेन्मार्क, पाकिस्तान आणि कोरिया प्रजासत्ताक यांचा समावेश आहे. या चर्चेत भारताच्या ‘दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता’ धोरणावर भर देण्यात आला.
संयुक्त राष्ट्र महासचिवांशी चर्चा
जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्याशीही फोनवर बोलणे केले. पहलगाम हल्ल्याच्या कटात सहभागी, गुन्हेगार आणि त्यांच्या समर्थकांवर न्यायलयीन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
या चर्चेनंतर जयशंकर यांनी X या सोशल मीडियावर लिहिले, “पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा स्पष्ट निषेध केल्याबद्दल महासचिव गुटेरेस यांचे आभार. या हल्ल्याच्या दोषींना शिक्षा देण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.”
संयुक्त राष्ट्राच्या निवेदनावर भारताची नाराजी
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने २५ एप्रिलला हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन जारी केले. परंतु पाकिस्तान आणि चीनच्या हस्तक्षेपामुळे हे निवेदन कमकुवत झाल्याचे भारताचे मत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत कोणत्याही स्वरूपातील दहशतवाद सहन करणार नाही, असे जयशंकर यांनी सर्व परराष्ट्रमंत्र्यांना स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय समुदायानेही असाच दृष्टिकोन ठेवावा, असे देखील त्यांनी सांगितले.
चर्चेतील ठळक मुद्दे
गयानाचे परराष्ट्रमंत्री ह्यूग हिल्टन टॉड यांच्याशी बोलताना दहशतवादाविरुद्ध एकसमान दृष्टिकोनावर भर देण्यात आला.
स्लोव्हेनियाच्या परराष्ट्रमंत्री तांजा फाजोन यांचे समर्थन आणि हल्ल्याच्या निषेधाबद्दल आभार मानले गेले.
पनामाचे जेव्हियर मार्टिनेझ यांच्याशी बोलताना भारताने एकजुटीचे आणि सहकार्याचे कौतुक केले.
अल्जीरियाचे परराष्ट्रमंत्री अहमद अत्ताफ यांच्याशी चर्चेत मजबूत द्विपक्षीय भागीदारी पुन्हा अधोरेखित झाली. जयशंकर यांनी त्यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले.
सिएरा लिओनचे परराष्ट्रमंत्री टिमकब्बा यांच्याशीही फोनवर बोलणे झाले. यात पहलगाम हल्ल्याचा निषेध आणि द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेण्यात आला.
जागतिक नेत्यांशी संपर्क
भारताने अलीकडेच अनेक देशांशी संपर्क साधला. पहलगाम हल्ल्यात सीमेपलीकडील घटकांचा सहभाग असल्याचे सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं, इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, मिस्र, जॉर्डन, इटली, जपान, इराण, श्रीलंका, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात आणि नेपाळ यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलताना हल्ल्याचा निषेध केला. तसेच भारताशी एकजूट व्यक्त केली.
पंतप्रधानांचा कठोर संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात स्पष्ट सांगितले की, "पहलगाम हल्ल्याच्या दोषींना सर्वात कठोर प्रत्युत्तर मिळेल." मंगळवारी त्यांनी लष्कर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि संरक्षणमंत्र्यांसह उच्चस्तरीय बैठक घेतली. सुरक्षेचा आढावा घेताना लष्कराला पूर्ण मुभा दिली आहे.