जम्मू-काश्मीरच्या विधानसभेमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करणारा ठराव सोमवारी एकमताने मंजूर करण्यात आला. पहलगाम हल्ला हा मोठा धक्का असल्याचे म्हणत याबद्दल तीव्र संताप यावेळी व्यक्त करण्यात आला.
त्याचप्रमाणे सामाजिक सौहार्द बिघडविण्याचे आणि काश्मीरचा विकास रोखण्याचे जे दुष्ट प्रयत्न सुरू आहेत, त्याचा एकत्रित आणि ठामपणे विरोध करण्याचा संकल्प यावेळी विधानसभा सदस्यांनी केला.
जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर यांनी सोमवारी बोलविलेल्या विशेष अधिवेशनात जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करणारा ठराव मांडला. त्यानंतर तो आवाजी मतदानाने एकमताने मंजूर करण्यात आला. विशेष अधिवेशन सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम दोन मिनिटे मौन पाळून पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
‘‘जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदावी, येथील सर्व नागरिकांचा उत्कर्ष व्हावा आणि येथील विकास व्हावा यासाठी ही विधानसभा कटिबद्ध असून, देशातील आणि जम्मू-काश्मीरमधील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचे आणि विकासात अडथळे उत्पन्न करण्याचे जे दुष्ट प्रयत्न सुरू आहेत, त्याचा एकत्रित आणि ठामपणे विरोध करण्यात येईल,’’ असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.
‘त्यांना काय उत्तर देऊ?’
‘‘पर्यटन मंत्रालयाची जबाबदारीही माझ्याचकडे आहे, पर्यटन मंत्री या नात्याने नैतिकदृष्ट्या मीच त्या पर्यटकांना पाहुणे म्हणून येथे बोलावले होते. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी माझी आहे,’’ असे काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विधानसभेत बोलताना म्हणाले. त्या मृतांच्या कुटुंबीयांना मी आता काय उत्तर देऊ? त्यांचा काय दोष होता, असा सवाल करत त्यांनी पहलगाम हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला.
विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविल्याबद्दल जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर यांचेही त्यांनी आभार मानले. देशातील इतर कोणतीही विधानसभा किंवा देशाच्या संसदेपेक्षाही आम्ही हल्ल्यातील पीडितांचे दुःख अधिक समजू शकतो, असेही अब्दुल्ला म्हणाले. ‘‘ही दहशत वादाच्या शेवटाची सुरुवात आहे,’’ असा इशाराही अब्दुल्ला यांनी त्यांच्या भाषणात दिला. दरम्यान, आतिथ्यशीलता आणि ऐक्य दर्शविण्यासाठी स्थानिकांनी पर्यटकांना दिलेल्या मोफत सेवेबद्दलही त्यांनी स्थानिकांचे कौतुक केले.
जामियामध्ये दोन मिनिटाचे मौन
‘‘श्रीनगरमधील जामिया मशिदीमध्ये पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. जामियामध्ये जेव्हा अशापद्धतीने मौन पाळले जाते तेव्हा त्याचे गांभीर्य काश्मिरी नागरिकांव्यतिरिक्त कोणाला समजणार आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी त्यांच्या भाषणात केले. दरम्यान, राज्याबाहेर शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील अनेक ठिकाणी बहिष्काराचा सामाना करावा लागत असल्याचे सांगत अब्दुल्ला यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच या विद्यार्थ्यांना पुरेशी सुरक्षा देणाऱ्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचेही त्यांनी यावेळी आभार मानले.
‘हल्ल्याचे भांडवल करणार नाही’
जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा या राजकीय मागणीसाठी पहलगाम हल्ल्यासारख्या अत्यंत संवेदनशील घटनेचे भांडवल केले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या विधानसभेतील भाषणाच्या शेवटी दिले. ‘‘योग्यवेळी आम्ही त्याची मागणी करू, मात्र २६ जणांचा मृत्यू झाला म्हणून जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या अशी मागणी केंद्रसरकारकडे करणे लज्जास्पद ठरेल,’’ असे मत अब्दुल्ला यांनी यावेळी व्यक्त केले.