एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिलपासून अवघ्या सहा दिवसांत ७८६ पाकिस्तानी नागरिकांनी अटारी-वाघा सीमेमार्गे भारत सोडले. याच काळात १३७६ भारतीय नागरिक पाकिस्तानातून परतले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सर्व पाकिस्तानी नागरिकांनी २७ एप्रिलपर्यंत भारत सोडावा असे सरकारकडून आदेश देण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाली होती.
भारतीयांना सल्ला
राजनैतिक, अधिकृत आणि दीर्घकालीन व्हिसाधारकांना या आदेशातून सवलत आहे. १२ प्रकारच्या अल्पकालीन व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतात राहण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल होती. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही कठोर कारवाई झाली. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. सरकारने भारतीयांना पाकिस्तानात प्रवास न करण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानात असलेल्या भारतीयांना लवकर परतण्यास सांगितले.
पाकिस्तानी नागरिकांची ओळख
एका अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक पाकिस्तानी नागरिक दुबई किंवा अन्य मार्गांनी विमानाने भारत सोडून गेले. भारत-पाकिस्तान दरम्यान थेट विमानसेवा नाही. आणखी काही पाकिस्तानी नागरिक भारत सोडतील, अशी अपेक्षा आहे. राज्य पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा देशभरातील पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवत आहेत.
२९ एप्रिलनंतर भारतात राहणे बेकायदेशीर
या कारवाईसाठी विशेष मोहीम सुरू आहे. यात गुप्तचर यंत्रणांचाही सहभाग आहे. दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, २९ एप्रिलनंतरही कोणता पाकिस्तानी नागरिक भारतात राहिला तर त्याची उपस्थिती बेकायदेशीर ठरेल. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक पावले उचलली. हा निर्णय त्यापैकी एक आहे.