जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या हज यात्रेसाठी पहिली विमाने निघाली आहेत. लखनौहून २८८ आणि हैदराबादहून २६२ यात्रेकरूंना घेऊन निघाली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी पवित्र हज यात्रेला निघालेल्या १,२२,५१८ यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
X वर पोस्ट करताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार हज यात्रा सुलभ आणि अखंडित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. सर्व यात्रेकरूंच्या सुरक्षित आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध तीर्थयात्रेसाठी प्रार्थना."
त्यांनी पुढे लिहिले, “हज २०२५ सुरू झाले. १,२२,५१८ यात्रेकरूंना या पवित्र यात्रेसाठी हार्दिक शुभेच्छा. यात्रेसाठी आज पहिली विमाने निघाली. लखनौहून २८८ आणि हैदराबादहून २६२ यात्रेकरू रवाना झाले आहेत.”
यापूर्वी २२ एप्रिलला केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी हज २०२५ साठी निवडलेल्या हज प्रतिनिधींच्या दोन दिवसीय मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम २२ आणि २३ एप्रिलला नवी दिल्लीतील स्कोप कॉम्प्लेक्स लोधी रोड येथे झाला होता.
हज यात्रेसाठी यंदा एकूण ६२० प्रतिनिधी निवडले गेले. यात २६६ प्रशासकीय आणि ३५४ वैद्यकीय कर्मचारी आहेत. हे प्रतिनिधी सौदी अरेबियातील जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाला हज व्यवस्थापनात मदत करतील. अतिशय कठोर निवड प्रक्रियेतून हे प्रतिनिधी निवडले जातात. मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांना हज व्यवस्थापन, प्रतिनिधींची भूमिका, आरोग्य समस्या, गर्दी आणि आपत्ती व्यवस्थापन, तसेच हज सुविधा अॅप याबाबत प्रशिक्षण दिले जाते.
यंदा हज सुविधा अॅपवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. २०२४च्या हज यात्रेत या अॅपने माहिती देणे आणि तक्रारी सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०२४च्या यशानंतर सरकार या अॅपचा अधिक प्रभावी वापर करू इच्छिते. त्यासाठी प्रतिनिधींना सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे हज प्रतिनिधींसाठीचा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय यात्रेकरूंना यशस्वी हज यात्रेसाठी मदत करेल.