लक्ष्य, वेळ आणि हल्ला कसा करायचा हे लष्करानेच ठरवावे - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडली बैठक
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडली बैठक

 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतीय सुरक्षा दले सज्ज झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी काल सायंकाळी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथसिंह, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि तिन्ही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा दलांना पूर्ण मुभा देताना सांगितले की, "दहशतवादाला चिरडणे हा आमचा राष्ट्रीय संकल्प असून, भारतीय लष्करावर माझा पूर्ण विश्वास आहे. आता लष्करानेच लक्ष्य, वेळ आणि हल्ला कसा करायचा, हे ठरवावे."

दिल्लीमध्ये सुरक्षाविषयक हालचालींना वेग आला असून गृहमंत्रालयामध्ये आज केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि सशस्त्र सीमा बलाचे (एसएसबी) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

आज (ता. ३०) सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्या बैठकीस पंतप्रधान मोदी हे उपस्थित राहतील. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे 'एक्स' या सोशल मीडियावरील हँडल बंद करण्यात आले.