छत्तीसगडमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. या सुरक्षा दलाने ‘ऑपरेशन संकल्प’ अंतर्गत तेलंगाना सीमेजवळच्या कर्रेगुट्टा डोंगरात झालेल्या चकमकीत 22 नक्षलवादी ठार केले. या दलाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. बस्तर विभागातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी नक्षलविरोधी कारवाई आहे.
कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा नेतृत्व करीत असलेल्या सर्वात आक्रमक बटालियन क्रमांक १ चे जवळपास ७०० हून अधिक नक्षलवादी छत्तीसगड-तेलंगणा सिमवेरील करेगुट्टा टेकडीवर एकत्र आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. यावरून केंद्र आणि राज्य सुरक्षा दलातील तब्बल १० हजारहून अधिक जवानांनी या परिसरात नक्षलविरोधी मोहीम सुरू करण्यात आली.
नक्षलवाद्यांनी पत्रक काढून ही मोहीम थांबवण्याची विनंती केली होती. मात्र, या टेकडीवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याशिवाय मोहीम थांबविण्यात येणार नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
२१ एप्रिलपासून ‘ऑपरेशन संकल्प’ सुरू झाले असून या मोहिमेत आतापर्यंत ३५ चकमकी झाल्या आहेत. कर्रेगुट्टा आणि आजूबाजूच्या जंगलात २६ नक्षलवाद्यांना ठार करून ४० हत्यारं, ४०० हून अधिक आयईडी (स्फोटकं), दोन टन स्फोटकं आणि सहा टन रसद, औषधं, दैनंदिन गरजेच्या वस्तू सुरक्षा दलाने जप्त केल्या आहेत. ही कारवाई करण्यात डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (DRG), बस्तर फायटर्स, स्पेशल टास्क फोर्स (STF), राज्य पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि त्यांची खास युनिट कोब्रा (CoBRA) सहभागी आहे.
७ मे ला सकाळी कर्रेगुट्टा परिसरात चकमक झाली. यामध्ये २२ नक्षलवाद्यांना करण्यात आले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. ही मोहीम बिजापूर (छत्तीसगड) आणि मुलुगु, भद्रद्री-कोत्तागुडेम (तेलंगणा) यांच्या ८०० चौरस किमी सीमेवर सुरू आहे.