जयपूर मदरशात 'ऑपरेशन सिंदूर'चे स्वागत केले.
भारतीय सैन्याने काल पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. या कारवाईवर देशभरातून भारतीय सैन्याचे कौतुक झाले. राजस्थानच्या जयपूरमधून प्रेरणादायी बातमी समोर आली. शास्त्री नगर येथील ‘जामिया तैयबा’ मदरशात विशेष देशभक्ती कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय जाणीव आणि सैन्याबद्दल आदर निर्माण करणं होता. यात विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिकांनी भारतीय सैन्याच्या शौर्याचं कौतुक केलं. यावेळी उपस्थित मुलांनी देशभक्तीवर कविता, भाषणं आणि नाटकं सादर करत दहशतवादाविरोधात एकजुटीचा संदेश दिला.
या देशभक्तीपर कार्यक्रमाची सुरुवात मदरशाच्या प्रांगणात झाली. मुलांनी देशभक्ती गीतं सादर करत “हिंदुस्तान जिंदाबाद”, “दहशतवाद मुर्दाबाद” असे नारे दिले. जाती धर्म बाजूला ठेवून या मुलांनी राष्ट्रभक्तीचं आणि देशप्रेमाचं उदाहरण दिलं.
भारतीय सैन्याचा अभिमान - कारी मोहम्मद इसहाक
‘जामिया तैयबा’ मदरशाचे संचालक कारी मोहम्मद इसहाक यांनी सांगितलं, “आम्हाला भारतीय सैन्याचा अभिमान आहे. सैन्याने दहशतवाद्यांना त्यांच्या अड्ड्यावरच नष्ट केलं. भारतीय सैन्याचा देशाला अभिमान वाटत आहे.” देशाला प्रथम संबोधत त्यांनी मुलांना लहानपणापासून देशप्रेम शिकवण्यावर भर दिला.
अमीन कायमखानी यांचं आवाहन
राजस्थान उर्दू शिक्षक संघाचे अध्यक्ष अमीन कायमखानी कार्यक्रमाला उपस्थित होते. ते म्हणाले, “दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे. प्रत्येक भारतीयाने याविरोधात आवाज उठवायला हवा.”
पुढे ते देशाची एकता आणि सुरक्षा सर्वोपरि असल्याचं म्हणत म्हणाले, “असे कार्यक्रम मुस्लिम समाजात देशप्रेम आणि सामाजिक जबाबदारी वाढवतात. यामुळे असे कार्यक्रम आणखी होणे आवश्यक आहे.”
विद्यार्थी तौहीद, सबा, रेहान आणि समीना यांनी “जय हिंद” आणि “वंदे मातरम” असे नारे दिले. त्यांनी सैन्याच्या पराक्रमाने प्रेरित असल्याचं सांगितलं. भविष्यात शिक्षण, आरोग्य किंवा सुरक्षाक्षेत्रात देशसेवा करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. या मुलांनी सर्वांना धर्म, भाषा आणि प्रदेशाच्या पलीकडे जाऊन एकजुटीचं दर्शन घडवलं आहे.
हा कार्यक्रम पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता. २२ एप्रिलला झालेल्या या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंटने जबाबदारी घेतली. ऑपरेशन सिंदूर हे या हल्ल्याला प्रत्युत्तर होतं. जयपूरच्या मदरशाने या कार्यक्रमच्या माध्यमातून देशभक्ती कोणत्याही समुदायाची मक्तेदारी नाही हे दाखवून दिलं आहे. प्रत्येक भारतीयाला देशावर अभिमान आहे. मुस्लिम समाजाला राष्ट्रभक्तीपासून वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीला या कार्यक्रमाने चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
जयपूरच्या मदरशाने देशभक्तीचा दिलेला संदेश दिला एकजुटीची प्रेरणा देतो. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरोधात भारताची ताकद दाखवली तर दुसरीकडे जयपूरच्या या कार्यक्रमाने हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवलं.
मोहम्मद फरहान इसराइली/ जयपुर