पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई कारवाईनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर दोन्ही देशांना मध्यस्थीसाठी गरज भासली तर, त्यासाठी ते उपलब्ध असतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधताना भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबाबत ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "माझी भूमिका अशी आहे की, मी दोन्ही देशांशी सहमत आहे, दोन्ही देशांशी माझे चांगले संबंध आहेत आणि मला त्यांना या परिस्थितीतून मार्ग काढताना पहायचे आहे. मला त्यांच्यातील तणाव थांबलेला पहायचा आहे. मला आशा आशा आहे की, ते आता थांबतील. त्यांनी जशास तसे उत्तर दिले आहे, म्हणून आशा आहे की ते आता थांबतील. हा तणाव दूर करण्यासाठी जर त्यांना माझी मदत लागली तर, मी त्यासाठी उपलब्ध असेन."
दोन आठवड्यांपूर्वी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका परदेशी नागरिकाचाही समावेश होता. पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील शांतता बिघडली असून, भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्षाला सुरुवात झाली आहे. भारताने बुधवारी पहाटे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशवादी तळांवर हावाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले.
तत्पूर्वी ऑपरेशन सिंदूरचे वृत्त समोर आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कालही यावर प्रतिक्रिया दिली होती. पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देताना ही लाजिरवाणी बाब असल्याचं नमूद करत डोनाल्ड ट्रम्प यांनी असं काहीतरी होईल, असा अंदाज सगळ्यांनाच होता, असे म्हटले होते.
“ही एक लाजिरवाणी बाब आहे. आम्हाला आत्ताच या एअर स्ट्राईकसंदर्भात माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काहीतरी घडणार हे लोकांना माहिती होते. भारत व पाकिस्तान यांच्यात बऱ्याच काळापासून हा संघर्ष चालू आहे. तुम्हाला कल्पना असेल की हे अनेक वर्षं नव्हे तर शतकांपासून चालू आहे. आता मी आशा करतो की हे सगळे लवकर संपावे”, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.