भारतातील मुस्लीम मान्यवरांनी आणि संघटनांनी केलं 'ऑपरेशन सिंदूर'चे स्वागत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 21 h ago
खासदार असदुद्दीन ओवैसी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सैयद सआदतुल्लाह हुसैनी, कॉँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढ़ी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे नेते मौलाना साजिद रशीदी
खासदार असदुद्दीन ओवैसी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सैयद सआदतुल्लाह हुसैनी, कॉँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढ़ी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे नेते मौलाना साजिद रशीदी

 

पहलगाम हल्ल्यानंतर देशभारत अस्वस्थता पसरली होती. हा हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील मुस्लिम नेत्यांनी आणि संघटनांनी निदर्शने केली. तसेच दहशतवादा विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. आज पहाटे भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून नऊ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केलं. या मिशन ला भारताने 'ऑपरेशन सिंदूर' नाव दिलं. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता मुस्लिम नेत्यांनी आणि संघटनांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

हैद्राबादचे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी ऑपरेशन सिंदूरविषयी म्हणाले, “आपल्या सैन्यदलांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे मी स्वागत करतो. पाकिस्तानी डीप स्टेटला असं धडा शिकवला पाहिजे, की पुन्हा पहलगामसारखा हल्ला होणार नाही. पाकिस्तानचा दहशतवादी पाया पूर्णपणे उद्ध्वस्त करायला हवा. जय हिंद!”

तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील या कारवाईला पाठिंबा दिला. ते म्हणाले, "पाकिस्तानला उत्तर देण्याचा हा योग्य मार्ग होता. या कारवाईत कोणत्याही नागरी किंवा लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही. केवळ दहशतवादी तळांवरच हल्ला करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये विध्वंस घडवणारेच या हल्ल्यात ठार झाले आहेत. या कारवाईमुळे पाकिस्तानला योग्य पद्धतीने उत्तर मिळालं आहे." 

'जमात-ए-इस्लामी हिंद'ने या एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया दिली आहे. जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सैयद सआदतुल्लाह हुसैनी यांनी ऑपरेशन सिंदूरवर सांगितलं, “दहशतवाद हा मानवतेविरुद्धचा गंभीर गुन्हा आहे. देशाच्या सुरक्षेसाठी दहशतवाद संपवणं गरजेचं आहे. आमच्या सैन्याने दहशतवादा विरोधात केलेली कारवाई योग्य आहे. दहशतवाद विरोधी कारवाईला सर्व धर्म आणि समुदायातील देशवासीयांचा पाठिंबा आहे. भारतातील जनता आपल्या सैन्याच्या पाठीशी एकजुटीने उभी आहे.”  

पुढं देशवासीयांना आवाहन करताना ते म्हणाले, "राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा वापर करून विभाजन किंवा सांप्रदायिक तणाव पसरवणे हे देशाच्या हिताविरुद्ध आहे. या गोष्टींचा ठामपणे निषेध केला पाहिजे. आम्ही सर्व राजकीय, सामाजिक व धार्मिक संघटना तसेच गटांना देशाची एकता, सांप्रदायिक सलोखा आणि परस्पर आदर राखण्याचे आवाहन करतो." 

कॉँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढ़ी यांनी भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केलं. त्यांनी एक्सवर लिहिलं, “जय हिंद! हिंदुस्तान जिंदाबाद"  इम्रान प्रतापगढ़ी यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. 

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे नेते मौलाना साजिद रशीदी यांनी ऑपरेशन सिंदूरचे स्वागत केलं. लखनऊमध्ये बोलताना ते म्हणाले, “दहशतवाद कोणत्याही धर्माशी जोडता येत नाही. पहलगाममध्ये निर्दोष लोकांचा जीव गेला. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांवर केलेली कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक होती. मुस्लिम समाज दहशतवाद विरोधी कारवाईत भारतीय सैन्याच्या पूर्णपणे पाठीशी उभा आहे."  

जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्सचे नेते झुबैर अहमद यांनी श्रीनगर येथे पत्रकार परिषद घेत 'ऑपरेशन सिंदूर'चं समर्थन केलं. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं, "पहलगाम हल्ल्याने काश्मिरी आणि देशातील जनतेचं मन दुखावलं आहे. भारतीय सैन्याने दहशतवादी तळ नष्ट करून योग्य पाऊल उचललं आहे. ही कारवाई करणं आवश्यक होतं. आम्ही काश्मिरी म्हणून दहशतवादाचा तीव्र निषेध करतो.”  

या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम खान म्हणतात, "भारतीय म्हणून आम्हाला लष्कराच्या शौर्याचा अभिमान वाटतो.  तसेच भारतीय सैन्याच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेचं नेतृत्व केलं याही कौतुक आहे. दहशतवादाविरोधात अशीच कारवाई करणं आवश्यक आहे. हिंदू मुस्लिम समाज सौहार्दाची आणि ऐक्याची अनेक उदाहरणे देत असतात. मात्र पहलगाम हल्ल्याने हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या. यामध्ये देशातील काही ढोंगी लोकांचा हात होता. या कारवाईमुळे दहशतवादाविरोधात देश एकसंध असल्याचे जगाला दिसलं आहे. तसेच दहशतवाद्यांना आणि हिंदू मुस्लिम सलोख्याला बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.”     
  
विज्ञान आणि कला फाउंडेशन तसेच विश्व सूफी कारवांचे अध्यक्ष मुफ्ती मंजूर झियाई यांनी ऑपरेशन सिंदूरचं स्वागत केलं. ते म्हणाले, “भारतीय हवाई दलाने मध्यरात्री अतिशय धाडसी आणि संवेदनशील कारवाई केली. पाकिस्तानातील दहशतवादी तळं त्यांनी उद्ध्वस्त केली. ही कारवाई दहशतवादाविरोधात भारताच्या ठाम धोरणाचं दर्शन आहे."   

त्यांनी या कारवाईत महिला नेतृत्वाचाही गौरव केला. ते म्हणाले, “कर्नल सोफिया कुरैशी आणि एअर कमोडोर व्योमिका सिंग यांसारख्या महिला अधिकाऱ्यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं. ही कारवाई दहशतवादामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली आहे. आजची भारतीय नारी साहस आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे." 

प्रमुख शिया धर्मगुरू मौलाना झहीर अब्बास रिझवी यांनी भारत सरकारच्या कारवाईचे समर्थन केलं. ते म्हणाले, “पहलगामसारख्या क्रूर हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना कठोर प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं. भारताने दाखवून दिलं, की दहशतवादाविरोधात भारत गप्प बसणार नाही. ही कारवाई राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल आहे." 

नसीरुद्दीन चिश्ती, अजमेर शरीफ दरगाह
अजमेर शरीफ दरगाहचे दीवान नसीरुद्दीन चिश्ती यांनी ऑपरेशन सिंदूरला काळाची गरज ठरवलं. ते म्हणाले, “भारताने पाकिस्तानला दिलेलं प्रत्युत्तर गरजेचं होतं. हा जागतिक संदेश आहे, की भारत आता दहशतवादाविरोधात गप्प बसणार नाही.” त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाला प्रतीकात्मक श्रद्धांजली ठरवलं. “हे नाव दहशतवादामुळे बळी गेलेल्या बहिणींसाठी आहे,” असं ते म्हणाले.

डॉ. ख्वाजा इफ्तिखार, बुद्धिजीवी
विख्यात बुद्धिजीवी डॉ. ख्वाजा इफ्तिखार यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव केला. ते म्हणाले, “आपल्या सैन्याने शत्रूच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आहेत. देशाने आता अभिमानाने सैन्याच्या वीरतेचा उत्सव साजरा करावा.”

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter