भारतीय लष्कराने आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही कारवाई केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल आणि इतर मान्यवरांनी या कारवाईचं स्वागत केलं. त्यांनी भारतीय सैन्याच्या शौर्याचं कौतुक करत दहशतवादाविरोधात एकजुटीचं आवाहन केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन सिंदूरचं समर्थन केलं. मुंबईत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “दहशतवाद्यांना नष्ट करण्याचं काम भारतीय सैन्याने केलं. पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानला कठोर प्रत्युत्तर मिळालं. ही कारवाई संपूर्ण देशासाठी अभिमानाची आहे. भारत सहन करणार नाही, हे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. पाकिस्तान येथील दहशतवाद्यांचे 9 अड्डे अचूकपणे एयर स्ट्राइक करून पूर्णतः उद्ध्वस्त केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सर्व देशवासीयांचे मन:पूर्वक अभिनंदन.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सैन्याच्या कारवाईचं कौतुक केलं. ते म्हणाले, “आज खऱ्या अर्थाने पहलगामध्ये प्राण गमावलेल्या भारतीयांच्या हत्येचा बदला आपण घेतला. आज पहाटे पाकिस्तानमधल्या ९ दहशतवादी तळांवर झालेला एअर स्ट्राईक हा प्रत्येक देशवासीयांच्या मनाला समाधान देणारा होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचा करारी बाणा यातून दिसला. भारत हा शांतताप्रिय देश आहे मात्र आडवे येणाऱ्या शत्रूला प्रसंगी गुडघे टेकायला लावतो हा संदेश स्पष्टपणे जगभर गेला.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकमधल्या दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणार असून यापुढे या दहशतवाद्यांची भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. यापुढे गोळीचा बदला मिसाईलने दिला जाईल. प्रत्येक भारतीय आज लष्कराच्या बरोबर आहे.”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑपरेशन सिंदूरला देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल मानलं. ते म्हणाले, “पहलगाम हल्ल्याने देश हादरला होता. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवला. ही कारवाई देशाच्या ऐक्यासाठी प्रेरणादायी आहे. अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून सैन्याच्या पाठीशी उभं राहायला हवं.”
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सैन्याच्या कारवाईचं स्वागत केलं. मुंबईतील राजभवनातून जारी केलेल्या निवेदनात ते म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरने भारताच्या दहशतवादाविरोधी धोरणाची ताकद दाखवली. आपल्या सैन्याने अचूक आणि संयमित कारवाई करत देशाचा अभिमान वाढवला.” त्यांनी पहलगाम हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली आणि सैन्याच्या शौर्याला सलाम केला.
ऑपरेशन सिंदूरने भारताच्या दहशतवादाविरोधी लढ्याची ताकद जगासमोर आणली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी सैन्याच्या कारवाईचं एकमुखाने समर्थन केलं. फडणवीस आणि शिंदे यांच्या आक्रमक प्रतिक्रियांमुळे राज्यातील जनतेचा विश्वास वाढला आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter