'राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचे, सैन्याला पूर्ण पाठिंबा'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 21 h ago
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रीय ऐक्य आणि एकजुटीची आज गरज असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्ष सैन्यदलांसोबत खंबीरपणे उभा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर खर्गे यांनी हे वक्तव्य केले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरून भावना व्यक्त केली. त्यांनी लिहिले की, "पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध भारताची राष्ट्रीय धोरण ठाम आहे. भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यांच्या धैर्याचा आणि दृढनिश्चयाचा आम्हाला अभिमान आहे." 

पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, "राष्ट्रीय ऐक्य आणि एकजूट सध्या अत्यंत गरजेची आहे.  पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून काँग्रेसने सैन्यदल आणि सरकारसोबत सीमापार दहशतवादाविरुद्ध ठाम कारवाईला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय काँग्रेस भारतीय सैन्यदलांसोबत आहे. आमच्या नेत्यांनी भूतकाळात मार्ग दाखवला. राष्ट्रीय हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे." असे खर्गे यांनी नमूद केले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्यदलांनी बुधवारी पहाटे पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यात जैश-ए-मोहम्मदचा बहावलपूरमधील गड आणि लष्कर-ए-तैयबाचा मुरिदके येथील तळ यांचा समावेश आहे.

भारतीय वायुसेनेने मंगळवारी मध्यरात्रीनंतर १:४४ वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. बहावलपूर, कोटली, मुजफ्फराबाद, मुरिदके, अहमदपूर शर्किया, बाग, भिवर, गुलपूर आणि सियालकोटजवळील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. हे हल्ले अत्यंत नियोजनबद्ध आणि अचूक होते. भारतीय संरक्षण मंत्रालयाने सांगितले की ही कारवाई रणनीतीनुसार आखली गेली होती.