रशियाने भारतीय विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाच्या २००० जागा वाढवल्या आहेत. २०२४ मध्ये जागांची संख्या ८,००० वरून १०,००० झाली. चेन्नईतील रशियन कॉन्सुलेटचे कॉन्सुल जनरल व्हालेरी खोद्झाएव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या संख्येने रशियात जात आहेत. रशिया हे भारतीय विद्यार्थ्यांचं वैद्यकीय शिक्षणासाठी पहिलं पसंतीचं ठिकाण आहे. त्यामुळे या जागा वाढवण्यात आल्या आहेत.”
रशियाचं वैद्यकीय शिक्षण का खास?
रशियन विद्यापीठं गेल्या ६० वर्षांपासून भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहेत. याठिकानचे शिक्षण परवडणारं, जागतिक दर्जाचं आणि प्रतिष्ठित मानलं जातं. रशियातील वैद्यकीय विद्यापीठं भारताच्या नॅशनल मेडिकल कमिशनच्या (NMC) नव्या नियमांचं पूर्ण पालन करणारी एकमेव परदेशी संस्था आहेत. खोद्झाएव म्हणाले, “रशियन विद्यापीठांत आधुनिक सुविधा, अनुभवी प्राध्यापक आणि सर्वसमावेशक अभ्यासक्रम आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी त्याठिकाणी उत्तम शिक्षणाची संधी आहे.”
रशियन हाऊसचे उपकॉन्सुल आणि संचालक अलेक्झांडर डोडोनोव यांनी सांगितलं, की रशियन सरकार दरवर्षी २०० भारतीय विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देते. यंदाही ही योजना कायम आहे. यातून विद्यार्थी बॅचलर, मास्टर, स्पेशालिस्ट आणि पोस्टग्रॅज्युएट अभ्यासक्रम मोफत शिकू शकतात. १० आणि ११ मे रोजी चेन्नईतील रशियन सेंटर ऑफ सायन्स अँड कल्चर येथे २०२५-२६ साठी अखिल भारतीय रशियन शिक्षण मेळावा होणार आहे. कोयंबतूर, सालेम आणि तिरुचिरापल्ली येथेही असे मेळावे होतील. या मेळाव्यात व्होल्गोग्राड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, मॉस्को एव्हिएशन इन्स्टिट्यूट यांसारख्या संस्था सहभागी होतील. वैद्यकीय शिक्षणाबरोबरच बायोटेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स यासारख्या क्षेत्रांतील अभ्यासक्रमांची माहिती मिळेल.
भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी मोठी स्पर्धा असून सरकारी महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठीच्या जागा मर्यादित आहेत. खासगी महाविद्यालयांची फी ६० लाख ते एक कोटी रुपये आहे. रशियात मात्र संपूर्ण सहा वर्षांचं वैद्यकीय शिक्षण १५ ते ५० लाख रुपयांत पूर्ण होतं. याशिवाय, रशियातील बहुतांश विद्यापीठं इंग्रजी माध्यमात शिक्षण देतात. नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा द्यावी लागत नाही. रशियातील वैद्यकीय पदवी जागतिक स्तरावर मान्य आहे. यामुळे भारतीय विद्यार्थी रशियाला पसंती देतात.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter