अकरा वर्षांपूर्वी १६ डिसेंबर २०१४ रोजी पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १४० विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू झाला होता. या हादरवून टाकणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत गेली. पाकिस्तानकडून अन्य देशांमध्ये विशेषतः शेजारी देशांमध्ये दहशतवादी कारवाया केल्या जातात, ही मुख्य समस्या आहे. त्याचबरोबर त्याला ‘स्वातंत्र्य चळवळ’ असे नाव देण्याचा प्रयत्न तो करतो. त्यावेळी पाकिस्तानात दहशतवादी कारवाया होतात, तेव्हा शत्रू देशांचे कृत्य म्हणत कांगावा केला जातो. दहशतवादी कारवायांची ही ‘निर्यात’ आणि कथित ‘आयात’ हे पाकिस्तानसाठी खूप मोठे आव्हान असून, त्यांच्या अंतर्गत सुरक्षेलाही मोठा धोका आहे.
पाकिस्तानातील विविध दहशतवादी गटांकडून तेथील सुरक्षेपुढे अनेक आव्हाने आहेत. पाकिस्तानातील सर्वांत मोठा जिहादी गट असलेला तेहरिके तालिबान पाकिस्तान (टीटीपी) पश्तून भागातून सक्रिय आहे. सन २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये अफगाण तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर ‘टीटीपी’ पुनरुज्जीवित झाली असून, त्यांच्या मदतीने अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून ते पाकिस्तानच्या सुरक्षा दलांवर हल्ले करीत होते. सन २०२४ मध्ये ‘टीटीपी’ने केलेल्या हल्ल्यात ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी एक महत्त्वाचा धोका आहे तो इस्लामिक स्टेट खोरसन प्रांत (आयएसकेपी) या दहशतवादी गटाचा. काही वर्षांपूर्वी सीरिया आणि इराकमधून स्थलांतरित झालेल्या ‘आयएस’च्या उपगटाचा आता पूर्व अफगाणिस्तानात तळ आहे. ‘आयएसकेपी’ ही दहशतवादी संघटना सुन्नी मुस्लिमांची असून, ती शिया मुस्लिमांविरोधात आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्ख्वा आणि बलुचिस्तान प्रांत चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचे (सीपेक) स्वागत करीत नाही.
या कॉरिडॉरला त्यांचा विरोध आहे. नैसर्गिक संसाधने नाकारून या कॉरिडॉरचा प्रामुख्याने पंजाब प्रांताला फायदा होतो, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. खुंजेराब पासपासून दहशतवादी हल्ले सुरू होतात. ग्वादार बंदरापर्यंत जाण्यासाठी ‘सीपेक’चा पाकिस्तानात याच भागापासून प्रवेश होतो. या भागात चीनच्या नागरिकांची हत्या झाल्यास पाकिस्तानला चीनला उत्तर देणे भाग पडते. चीनने या भागात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्या काही वर्षांत तेथे सुन्नी मुस्लिमांचे अनेक दहशतवादी गट फोफावले आहेत. लष्करे तय्यबा आणि जैशे महंमद भारताला सातत्याने लक्ष्य करीत आहेत. त्यामुळेच त्यांची मुख्यालये ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताचे लक्ष्य बनली. मुंबईवर सन २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे लष्करे तय्यबाचा हात होता. लष्करे तय्यबाच्या मुख्यालयावर हल्ला करून भारताने या निमित्ताने जुना हिशोब चुकता केला आहे. लष्कर आणि जैशे महंमद या दहशतवादी संघटनांवर बंदी असली तरीही या संघटना कार्यरत आहेतच. पाकिस्तानपेक्षा काश्मीरमध्ये कारवायांमध्ये अधिक गुंतल्या आहेत. खैबर पख्तुन्ख्वाच्या डोंगराळ भागामध्ये दहशतवाद्यांच्या लष्करे इस्लाम (खैबर) यासारख्या संघटनाही कार्यरत आहेत.
पाकिस्तानला सर्वांत मोठे सुरक्षा आव्हान बलुचिस्तानमधून आहे. आर्मी ऑफ लिबरेशन ऑफ बलुचिस्तान, बलुचिस्तानी लिबरेशन फ्रंट आदी गट स्वतंत्र बलुचिस्तानसाठी धडपडत आहेत. आता या बलुचिस्तानामध्ये पारंपरिक वृत्तीच्या नेत्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. तरुण सुशिक्षितांच्या मार्गदर्शनाखाली बलुचिस्तानातील फुटीरतावाद्यांनी त्यांच्या कारवाया मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. गेल्या वर्षी विविध बलूच गटांनी एकूण ९३८ हल्ले केले, ही संख्या सन २०२३मध्ये ६१२ होती. गेल्या वर्षी झालेल्या हल्ल्यात एक हजाराहून अधिक मृत्युमुखी पडले.
भुट्टो-झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टी, शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पीएमएल-एन आणि इम्रान खान यांचा पीटीआय हे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांदरम्यान दहशतवाद्यांची मदत घेतात, हे वारंवार दिसून आले आहे. निवडणूक संबंधित हिंसाचारातही सन २०२४ मध्ये वाढ झाली असल्याचे आकडेवारी सांगते. पहलगाममधील हल्ल्यानंतर सत्ताधारी आघाडीचा भाग असलेले संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ आणि बिलावल भुट्टो यांनी परदेशी माध्यमांशी बोलताना दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचे कबूल केले होते. या प्रोत्साहनामागे अमेरिका आणि ब्रिटन असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या सर्वामध्ये पाश्चात्य राष्ट्रांनी पाकिस्तानला बळजबरीने ओढले आणि त्याचा मोठा फटका बसला, असा दावाही त्यांनी केला होता. मात्र, तथ्य आणि आकडेवारी पाहता हे खरे नाही, हे स्पष्टपणे दिसते. पाकिस्तानातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचे आव्हान भूतकाळापासून होते, तसेच ते वर्तमानकाळातही आहे. पाकिस्तानमध्ये पारंपरिक जिहादी दहशतवाद्यांपासून वांशिक-राष्ट्रवादी अतिरेक्यांपर्यंत विविध संघटनांच्या कारवाया सुरू आहेत. यातून तेथील सुरक्षेचे चित्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
(लेखक दिल्लीस्थित पाकिस्तानी घडामोडींचे विश्लेषक आहेत.)