आशिया चषक : करंडकापेक्षा सन्मान महत्त्वाचा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आशिया करंडक सामन्यांतून जाणवला तो भारतीय संघाचा आत्मविश्वास. मैदानावरील आणि मैदानाबाहेरील कामगिरीतून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर भारताने दिले.

हमसे है ज़माना... ज़माने से हम नहीं, हम अपनी शर्तों पर खेलते हैं... और जीतते भी हैं।

या पंक्तींचा भावार्थ दुबईत झालेल्या ‘आशिया क्रिकेट स्पर्धे’त भारतीय संघाने केलेल्या कामगिरीशी मिळताजुळता आहे. आव्हानवीर असल्याचा आव आणून आणि वल्गना करून बेटकुळ्या काढण्याचा प्रयत्न पाकिस्तानी संघाने केला, तरी भारताने एकदा नव्हे तर तीनदा त्यांना भुईसपाट करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.

त्याचबरोबर मैदानात आणि मैदानाबाहेरही भारताने आपली सिद्धता व प्रभुत्व जगासमोर मांडले. आपल्याकडे कोणत्याही मोहिमेवर जाताना कुंकुमतिलक माथी लावण्याची प्रथा आहे. मग ते ‘सिंदूर’ असो वा ‘तिलक’, त्याचा प्रभाव सर्वदूर जाणवतोच. तिलक वर्माच्या अद्वितीय खेळीने या प्रतीकात्मकतेचे महत्त्व अधिक अधोरेखित केले.

भारताने मिळवलेले विजेतेपद केवळ क्रिकेटच्या मैदानापुरते मर्यादित नव्हते, तर त्याचा ठसा खेळाबरोबरच राजकीय स्तरावरही उमटवणारा होता. याचे कारण त्याला पार्श्वभूमी होती, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची आणि त्यानंतरच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या प्रत्युत्तराची. खेळ आणि राजकारण यांची सांगड घालू नये, असे कितीही म्हटले तरी जिव्हारी लागलेला घाव कोणी सहजासहजी विसरू शकत नाही. खेळाडू असले तरी त्यांनाही भावना आहेत.

शिवाय कोट्यवधी भारतीयांचे आपण प्रतिनिधित्व करतो, याचीही जाणीव या खेळाडूंना असते. आपल्या देशाविषयीचा अभिमान बाळगणारे खेळाडू ही भारतीय संघाची ओळख आहे. मैदानावरील चिथावणीखोर वर्तनातून टाकलेल्या ठिणगीचे भारतीय संघाने ज्वालामुखीत रूपांतर केले आणि त्यात पाकिस्तानचा सारा माज भस्मसात केला.

ज्याने हे चिथावणीखोर वर्तन केले त्याच हॅरिस रौफला खणखणीत चौकार मारून रिंकू सिंगने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धा सुरू होण्याआधी काही खेळाडूंना आपली इच्छा एका कागदावर लिहिण्यास सांगण्यात आली होती. रिंकूने आपल्याला अंतिम सामन्यात विजयी फटका मारण्याची इच्छा व्यक्त केली होती; मात्र संपूर्ण स्पर्धेत त्याची अंतिम संघात निवडच होत नव्हती.

योगायोगाने आदल्या सामन्यात हार्दिक पंड्या जखमी झाला आणि त्यामुळे रिंकूला अंतिम लढतीत संधी मिळाली. एवढेच काय, अंतिम षटकात तो फलंदाजीला आला आणि नेमका त्याच्याच बॅटमधून विजयी चौकार निघाला. रिंकू सिंग संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच चेंडू खेळला पण जो खेळला तो विजयी फटका होता! आपल्या तरुण पिढीतील आत्मविश्वास किती पराकोटीचा आहे, हे त्यात दिसले.

अभिषेक शर्माभोवती भारताचे या स्पर्धेतले यश गुंफले गेले होते; पण अंतिम सामन्यात तो अपयशी ठरला. ‘सूर्य’ झाकोळला, शुभमन गिलही अपयशी ठरला; परंतु तिलक वर्माने संघाचा भार एकहाती वाहिला. ‘‘येथे प्रत्येक खेळाडू हा योद्धा आहे, हीच खरी ‘टीम इंडिया’ची ओळख.

मग असा संघ समोर असताना तुम्ही कसल्या करता वल्गना? आव्हानाबाबत काय बोलता? सध्याची आकडेवारी पाहा, सर्व लढती आम्ही एकतर्फी जिंकलेल्या आहेत’, असे पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमारने ठणकावून सांगितले. त्यानंतर मैदानात, मैदानाबाहेर आणि समाजमाध्यमांवर भारत-पाकिस्तान क्रिकेट वादविवाद रंगले. असे कदाचित प्रथमच घडले असावे.

यास कारणीभूत ठरले पाकिस्तानचे गृहमंत्री तसेच त्यांच्या क्रिकेट मंडळाचे आणि आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी. पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधाराने पाकिस्तानीन कर्णधार सलमान आघाशी हस्तांदोलन केले नाही आणि विजय मिळवल्यानंतरही तो पवित्रा कायम ठेवला. त्यावेळीच पाकिस्तानी संघ, त्यांचे व्यवस्थापन आणि मंडळ यांच्या अहंकाराला धक्का बसला होता.

त्यानंतर ‘सुपर-४’ मधील लढतीतही तसाच प्रसंग घडला. त्यामुळे अंतिम सामन्यानंतर महानाट्य रंगणे अपेक्षित होते. मुळात सामना संपल्यानंतर अर्ध्या तासात बक्षीस समारंभ होणे अपेक्षित असते; पण भारतीय संघाने नक्वी यांच्या हस्ते करंडक स्वीकारणार नाही, असे ठाम सांगितल्यावर वेळकाढूपणा करण्यात आला.

मैदानात आणलेला करंडकच काय, नव्या प्रथेप्रमाणे विजेता संघ ज्या ‘चॅम्पियन्स’ या फलकासमोर छायाचित्र काढतो तो फलकही लपवण्यात आला. हा खोटेपणा पाकिस्तानच्या कोत्या मनोवृत्तीचे द्योतक आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाने आभासी करंडक स्वीकारला आणि जल्लोष साजरा केला.

कप हाती असल्याचे भासवत काढलेली छायाचित्रे ही पाकिस्तानच्या कृतीला दिलेली सडेतोड प्रतिक्रिया होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर द्यायचा तो संदेश भारताने दिला. मुळात भारतीय संघ करंडकापेक्षा सन्मानासाठी खेळत होता. आता केवळ आशियाच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही ही स्पर्धा वेगळ्या नजरेतून पाहिली जाईल.

येथून पुढे कोणत्याही बहुराष्ट्रीय स्पर्धांत याचे पडसाद उमटतील. काही दिवसांतच महिला विश्वकरंडक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना होणार आहे; पण त्याआधीच भारतीय संघाने आपल्या कृतीतून नक्वी आणि पाकिस्तानच्या वृत्तीचे नाक कापले, हे सत्य आहे.