इस्रायलने मंगळवारी हवाई हल्ल्यात ठार केल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही तासांतच इराणने आपले राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनीही या मृत्यूवर शोक व्यक्त करत बदला घेण्याची शपथ घेतली आहे.
एएफपीने (AFP) दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, "शहीदांच्या शुद्ध आत्म्यांनी देवाचा नीतिमान सेवक शहीद डॉ. अली लारीजानी यांच्या पवित्र आत्म्याला कवेत घेतले आहे. इराण आणि इस्लामिक क्रांतीच्या प्रगतीसाठी आयुष्यभर संघर्ष केल्यानंतर अखेर त्यांनी आपली दीर्घकालीन आकांक्षा पूर्ण केली. त्यांनी दैवी हाकेला साद दिली आणि सेवेच्या रणांगणात हौतात्म्याची गोड कृपा सन्मानाने प्राप्त केली."
इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी लारीजानी यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना त्यांच्या रक्ताचा बदला घेण्याची शपथ घेतली. शोकसंदेशात पेझेश्कियान यांनी लारीजानी यांची अनुपस्थिती 'कडू आणि अस्वस्थ करणारी' असल्याचे वर्णन केले. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, पेझेश्कियान यांनी लारीजानी यांच्या इराण सरकारमधील अनेक दशकांच्या सेवेची प्रशंसा केली आणि देश 'बंडखोरी आणि प्रतिकाराचा मार्ग सुरू ठेवेल' असे सांगितले.
दुसरीकडे, एका दूरदर्शन संबोधनात बेंजामिन नेतन्याहू यांनी अली लारीजानी यांचे वर्णन रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा बॉस असे केले. हे रिव्होल्यूशनरी गार्ड्स म्हणजे प्रत्यक्षात इराण चालवणारी 'गुंडांची टोळी' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी पुढे असेही म्हटले की, इराणी जनता अखेरीस त्यांचे नेतृत्व उलथवून टाकू शकते. पण त्यांनी सावधगिरीचा इशारा देत सांगितले की, "हे सर्व एकाच वेळी किंवा सहजपणे घडणार नाही. परंतु जर आपण यात टिकून राहिलो, तर आपण त्यांना त्यांचे नशीब स्वतःच्या हातात घेण्याची संधी देऊ."
इस्रायलने हवाई हल्ल्यात लारीजानी यांच्या मृत्यूचा दावा केल्यानंतर काही तासांतच ही घडामोड घडली आहे. इस्रायलने मंगळवारी इराणच्या आणखी एका वरिष्ठ लष्करी नेत्याला लक्ष्य केल्याचे सांगितले. बासिजचे प्रमुख गुलामरेझा सुलेमानी यांना ठार केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ म्हणाले की, "इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी आणि रिव्होल्यूशनरी गार्डच्या स्वयंसेवी बासिज दलाचे प्रमुख जनरल गुलाम रेझा सुलेमानी यांना काल रात्री कंठस्नान घालण्यात आले."
एएफपीने फार्स आणि तस्नीम या वृत्तसंस्थांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अली लारीजानी आणि सुलेमानी यांचे अंत्यसंस्कार बुधवारी सकाळी मध्य तेहरानमध्ये पार पडणार आहेत. इस्रायली लष्कराने बासिजच्या सर्वोच्च कमांडरला ठार केल्याची घोषणा केल्यानंतर तेहरानच्या आजूबाजूच्या बासिज तळांवरही हल्ले केल्याचे म्हटले आहे.