फरहान इस्रायली, जयपूर
आजच्या काळात सगळीकडे वाद आणि संघर्षाचा गोंधळ पाहायला मिळतो. अशा वातावरणात जयपूरच्या गल्ल्यांमधून एक शांत लाट उसळली आहे. ही लाट थेट लोकांची मने जोडण्याचे काम करत आहे. कधी रामनवमीच्या मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव होतो, तर कधी गुरुद्वारामध्ये लंगरची सेवा दिली जाते. कधी अमरनाथच्या दुर्गम टेकड्यांवर उणे तापमानात भाविकांवर उपचार केले जातात, तर कधी दिवाळीच्या दिवशी बाजारात जाऊन आनंद वाटला जातो.
हे सर्व कोणत्याही चित्रपटाच्या कथेचे दृश्य नाही. हे 'वर्क' (World Organization of Religious and Knowledge) संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील वास्तव आहे. गेल्या काही वर्षांत या संस्थेने राजस्थानमध्ये सेवा आणि सलोख्याचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. माणुसकीचे नाते कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ असते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
राजस्थानमधील वर्क संस्थेचे प्रवक्ते सय्यद असगर अली यांचे विचार अत्यंत सखोल आहेत. ते म्हणतात, "एखादा वाद जिंकून स्वतःला खरे सिद्ध करणे, हा आमचा उद्देश नाही. आम्हाला फक्त समोरच्या माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचायचे आहे." संस्थेचे तत्त्वज्ञान अगदी सोपे आहे. आपण एखाद्याच्या विरोधात नसून त्याच्या पाठीशी उभे आहोत, हा विश्वास त्याला दिल्यास द्वेषाची निम्मी भिंत तिथेच कोसळते. याच कारणामुळे दिवाळी, होळी, रामनवमी, गुरुनानक जयंती आणि ख्रिसमससारख्या प्रत्येक सणाला संस्थेचे कार्यकर्ते नव्या उत्साहात रस्त्यावर उतरतात.
दिवाळी आणि होळीच्या सणाला संस्थेचे कार्यकर्ते स्वतः तयार केलेले ग्रीटिंग कार्ड्स घेऊन बाजारात फिरतात. ते दुकानदारांची भेट घेतात आणि नात्यांची एक नवी वीण गुंफतात. आजच्या काळात कोणीतरी केवळ शुभेच्छा देण्यासाठी आले आहे, हे पाहून अनेकदा दुकानदारही आश्चर्यचकित होतात.

ते आनंदाने मिठाई आणि सुका मेवा देऊन या कार्यकर्त्यांचे स्वागत करतात. बंद दाराआड कधीही न होऊ शकणाऱ्या संवादाची इथूनच सुरुवात होते. रामनवमीच्या दिवशी शोभायात्रा निघते, तेव्हा हे लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून भाविकांवर फुलांचा वर्षाव करतात. ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील पुस्तके वाटतात.
वर्क संस्था २०१८ पासून अमरनाथ यात्रेत सेवा देत आहे. हा केवळ साधा सहभाग नाही. हे एक अत्यंत शिस्तबद्ध आणि सुनियोजित मॉडेल आहे. दरवर्षी पाच सदस्यांचे एक पथक अमरनाथला पाठवले जाते. यात डॉक्टर आणि परिचारिकांचा समावेश असतो. गृह मंत्रालयाच्या परवानगीने चालणारे हे वैद्यकीय शिबिर बालटाल आणि रामबनसारख्या अत्यंत कठीण मार्गांवर उभारले जाते. ऑक्सिजनची कमतरता आणि हाडे गोठवणारी थंडी असतानाही या ठिकाणी भाविकांना प्राथमिक उपचार दिले जातात.
अमरनाथ सेवेदरम्यानचा २०२२ मधील एक प्रसंग विशेष लक्षात राहण्यासारखा आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसरात ब्लॅकआउट करण्यात आला होता. यात्राही थांबवण्यात आली होती. वातावरणात प्रचंड तणाव होता. अशा परिस्थितीत संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आणि १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला.
देशभक्तीच्या या भावनेची दखल थेट लष्कराने घेतली. त्यानंतर लष्कराने स्वतः या कार्यकर्त्यांना त्यांच्या अधिकृत कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. मर्यादित साधनसामग्रीत राबवलेल्या या उपक्रमाने केवळ तिथले वातावरणच सकारात्मक केले नाही, तर राष्ट्रीय एकात्मतेचा एक भक्कम संदेशही दिला.
आचार्य शम्स नवेद उस्मानी यांनी १९८८ मध्ये उत्तर प्रदेशातील रामपूर येथे वर्क संस्थेचा पाया रचला. आचार्य उस्मानी यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत अनोखे होते. ते केवळ इस्लामी विद्वान नव्हते. त्यांनी चारही वेदांचा अत्यंत सखोल अभ्यास केला होता. लोकांना विभागणे हे धर्माचे काम नसून सर्वांना एका धाग्यात गुंफणे हे खरे कार्य आहे, असा त्यांचा विचार होता. आज अल्लामा सय्यद अब्दुल्ला तारिक हा वारसा पुढे नेण्याचे काम करत आहेत. संस्थेत लोक त्यांना प्रेमाने 'गुरुजी' अशी हाक मारतात.
राजस्थानमध्ये या संस्थेची सुरुवात २०१८ मध्ये झाली. लईक हसन आणि एच. आर. खान यांच्या नेतृत्वाखाली आज ही संघटना संपूर्ण राज्यभर पसरली आहे. जयपूरमध्ये जियाउर रहमान आणि महिला आघाडीत डॉ. शहनाज, रेहाना आणि आलिया यांसारख्या सक्रिय महिला हे मिशन पुढे नेत आहेत. अजमेरमध्ये संस्थेची 'जनता रसोई' दर आठवड्याला शेकडो लोकांची भूक भागवते. हे केवळ अन्नदान नाही, तर एका माणसाने दुसऱ्या माणसाप्रती व्यक्त केलेला तो मोठा आदर आहे.
संस्थेचा प्रभाव केवळ बाहेरील समाजापुरता मर्यादित राहिलेला नाही. २०२३ मध्ये टोंकच्या मध्यवर्ती कारागृहात आयोजित केलेला कार्यक्रम त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष देतो. तुरुंग अधीक्षक वैभव भारद्वाज यांच्या सहकार्याने सुमारे ५०० कैद्यांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या सदस्यांनी कैद्यांशी थेट संवाद साधला. सण केवळ मुक्त लोकांसाठी नसतात, हे त्यांनी कैद्यांना समजावून सांगितले.
तिथे एका नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकाची संपूर्ण तयारी कार्यकर्त्यांनी स्वतः केली होती. सय्यद असगर अली यांनी 'गॉड'ची भूमिका साकारली. नाटकाचा संदेश इतका हृदयस्पर्शी होता की, तो पाहून अनेक सराईत गुन्हेगारांच्या डोळ्यांतूनही अश्रू तरळले. कैद्यांनी गुन्हेगारी सोडण्याची शपथ घेतली आणि स्वतःच्या हातांनी सर्वांना फळे वाटली. कैद्यांना भजन आणि सकारात्मक कार्यक्रम पाहता यावेत, यासाठी नंतर तुरुंग प्रशासनाला एक प्रोजेक्टरही भेट देण्यात आला.
८ ऑगस्ट २०२४ रोजी जयपूरमध्ये संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले. मुस्लिम समाजातील ४० जणांनी सामूहिकरीत्या अवयवदानाचा संकल्प केला. यात किडनी आणि हृदयासोबतच त्वचा आणि अस्थिदानाचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. लईक हसन यांनी स्वतः या मोहिमेचे नेतृत्व केले. समाजात काहींनी यावर प्रश्न उपस्थित केले, पण संस्थेने धार्मिक आधारावर त्याचे चोख उत्तर दिले. ज्याने एकाचा जीव वाचवला, त्याने संपूर्ण मानवतेचे रक्षण केले, या कुराणातील वचनाचा त्यांनी संदर्भ दिला. मृत्यूनंतरही माणूस दुसऱ्याच्या कामी येऊ शकतो, हे या उपक्रमाने दाखवून दिले.
वर्क संस्थेचे कार्यकर्ते केवळ मंचावर दिसत नाहीत, तर ते रस्त्यावर वाहतूक नियंत्रित करतानाही पाहायला मिळतात. 'सुरक्षित घरी पोहोचा, कोणीतरी तुमची वाट पाहत आहे' असा संदेश देत ते वाहतूक पोलिसांना मदत करतात. अपघात कमी करण्यासाठी ते मोकाट गायींच्या गळ्यात रेडियमच्या पट्ट्या बांधतात. अंधारातही या गायी वाहनचालकांना स्पष्ट दिसाव्यात, हा त्यामागचा उद्देश असतो.
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी हजारो बीजगोळे तयार करून जंगलात फेकले आहेत. नाहरगढ आणि आमेरसारख्या भागात त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली आहे. लंपी आजाराच्या साथीमध्ये गायींचे प्राण जात होते, त्यावेळी संस्थेने एक लाख आयुर्वेदिक लाडू तयार करून त्यांना खाऊ घातले. या निस्वार्थ सेवेमुळेच त्यांना समाजात एक वेगळी ओळख मिळाली आहे.
संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये अनेकदा विरोधी विचारधारेचे लोकही एकत्र बसलेले दिसतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिनिधी, पत्रकार आणि डॉक्टर एकाच टेबलावर बसून सामाजिक प्रश्नांवर चर्चा करतात. याशिवाय १२ रबी-उल-अव्वलच्या निमित्ताने संस्था एक अतिशय सुंदर उपक्रम राबवते. कार्यकर्ते रुग्णालयांमध्ये जाऊन त्या दिवशी जन्मलेल्या मुलांची माहिती घेतात. यात कोणताही धर्म पाहिला जात नाही. त्या कुटुंबांना खास भेटवस्तू दिल्या जातात आणि नंतर त्यांचा सन्मानही केला जातो.
वर्क संस्थेचा प्रवास केवळ साधनसामग्रीवर अवलंबून नाही, तर ही छोट्या पण प्रामाणिक प्रयत्नांची गोष्ट आहे. अंधाराला दोष देण्यापेक्षा स्वतः दिवा बनण्यावर विश्वास ठेवणाऱ्या माणसांची ही कहाणी आहे. तुरुंग असो, रस्ता असो किंवा मंदिराची मिरवणूक असो, प्रत्येक ठिकाणी ही संस्था एकच संदेश देत आहे. माणुसकीचे नाते सर्वात जुने आणि सर्वात महान आहे, हेच ते आपल्या कार्यातून सांगत आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter