Solapur Malshiras Accident : देवदूत बनून आलेल्या इरफानने वाचवले भाविकांचे जीव

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
सोलापूर माळशिरस पिकअप अपघातात विहिरीत उडी मारून भाविकांचे प्राण वाचवणारा तरुण इरफान मुजावर
सोलापूर माळशिरस पिकअप अपघातात विहिरीत उडी मारून भाविकांचे प्राण वाचवणारा तरुण इरफान मुजावर

 

भक्ती चाळक

सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. सिद्धनाथ देवाचं दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला भीषण अपघात झाला. रस्त्याशेजारील एका खोल विहिरीत ही गाडी कोसळली आणि संपूर्ण कुटुंबाचा आनंद एका क्षणात आक्रोशात बदलला. 

या दुर्घटनेत ८ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पण या मोठ्या संकटात इरफान मुजावर नावाचा एक तरुण देवदूत बनून धावून आला. त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या मारून अनेकांचे प्राण वाचवले.

नेमकं काय घडलं 
पंढरपूर तालुक्यातील माळशिरस येथील तांदूळवाडी गावाजवळ हा अपघात घडला. रंजनी गावातील एकाच कुटुंबातील मंडळी सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. अधिक मासनिमित्त देवाचं दर्शन घेऊन सर्वजण पिकअप गाडीने आनंदात घरी परतत होते. संध्याकाळी ५ च्या सुमारास गाडी तांदूळवाडीजवळ आली. गाडीचा वेग साधारण ५० ते ६० च्या आसपास होता. अचानक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि रस्त्याशेजारी असलेल्या एका मोठ्या खुल्या विहिरीत ही गाडी थेट कोसळली.
 
अपघातग्रस्त कुटुंब 
इरफानने तातडीने मारली विहिरीत उडी
हा अपघात घडला तेव्हा तांदूळवाडीचा तरुण इरफान मुजावर आपल्या वाहनाने त्या पिकअपच्या पुढेच जात होता. त्याने आरश्यातून मागे पाहिलं तर पिकअप विहिरीत कोसळल्याचं दिसलं. इरफानने एक सेकंदाचाही विचार केला नाही. त्याने लगेच गाडी थांबवली, आपल्या वडिलांना फोन करून गावातील मुलांना तातडीने विहिरीकडे धावून येण्यास सांगितलं. 

इरफानने लगेच एका सहकाऱ्याला सोबत घेऊन थेट पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत उडी मारली. विहिरीला कोणतेही कठडे. पण इरफानने जीवाची बाजी लावून एकापाठोपाठ एक अशा ३ जणांना पाण्याबाहेर काढलं. त्यानंतर मागे येणारे इतर वाहनचालक आणि गावकरीही मदतीला धावले. सर्वांच्या या तातडीच्या प्रयत्नांमुळे विहिरीतून ८ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलं.

या घटनेविषयी माहिती देताना इरफान म्हणाले की, "अपघात झाला तेव्हा मी २०० फूट पाठीमागे पाहिलं, तेव्हा मला वाटलं, ही गाडी आता पलटी होणार आहेच. पण गाडी आली तशी ती थेट विहिरीत पडली. त्यातले  एक-दोन जण त्यांच्यापरीने वर आले.. त्यातलं ४ वर्षांचं बारीक बाळ उलटं होऊन वर आलं. मग मी पहिली उडी त्याच्यापाशी मारली. त्याला उचललं आणि छातीला दाबलं. त्याच्या तोंडातलं पाणी बाहेर काढलं. आणि त्या लहान लेकराला पाहिलं वाचवलं."

ते पुढे म्हणतात, "मी माझ्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं भाविकांना विहिरीतून बाहेर काढले. त्यात स्त्री-पुरुष आणि काही लहान मुलं सुद्धा होती. बाकी लोक गाडीसोबत खाली गेल्यामुळं त्यांना वाचवता आलं नाही. मग आम्ही दोन ट्रॅक्टर आणि जेसीबी लावून गाडी बाहेर काढली. आम्ही सर्व गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केले, पण बाकीच्यांचे जीव वाचवता आले नाही."
 
गाडीसोबत खोल पाण्यात बुडणाऱ्या उर्वरित लोकांना वाचवू न शकल्याची एक रुखरुख इरफानच्या बोलण्यातून जाणवते. परंतु त्याने आणि गावकऱ्यांनी केलेल्या तातडीच्या प्रयत्नांमुळेच आज ८ जणांचे प्राण वाचू शकले. संपूर्ण महाराष्ट्रभरातून इरफानचे आभार मानले जाताहेत.  
 
या भीषण अपघाताने रंजनी गावासह संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न केलं आहे. एकाच घरातील ८ हसती-खेळती माणसं, ज्यामध्ये अवघ्या ६ महिन्यांच्या चिमुरड्याचाही समावेश होता, ती नियतीच्या क्रूर खेळामुळे कायमची शांत झाली. हे कधीही न भरून निघणारं दुःख आहे.
 
गावकऱ्यांसह इरफान मुजावर
८ जणांचा दुर्दैवी अंत
इरफान आणि गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, तरीही या अपघातात ८ भाविकांना वाचवता आलं नाही. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. इंदुबाई दशरथ बावचे (६०), पूजा अमोल सातोरे (२३), पूजा बालाजी बावचे (२७), अश्विनी संदीप बावचे (२७), संस्कार संदीप बावचे (१४), संस्कृती संदीप बावचे (१४), आरव अमोल सातोरे (८) आणि अवघ्या ६ महिन्यांचा समर्थ बालाजी बावचे या निष्पापांचा मृतांमध्ये समावेश आहे. एकाच कुटुंबातील ८ जण गेल्याने रंजनी गावावर शोककळा पसरली आहे.

बचावलेले सुदैवी भाविक
या अपघातातून ८ जण सुखरूप बचावले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सागर सावकार चौगुले (२५), संदीप दशरथ बावचे (३६), बालाजी दशरथ बावचे (३२), जिया बालाजी बावचे (४), आरव बालाजी बावचे (२.५), शशिकला पोपट जाधव (५०), सिद्धेश्वर जाधव (४०) आणि अपूर्वा सातोरे (११) अशी बचावलेल्यांची नावे आहेत. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींवर तांदूळवाडी आणि पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिकअप विहिरीतून बाहेर काढण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 
गावकऱ्यांचा संताप
सातारा-पंढरपूर रस्ता सध्या संथ गतीने सुरू असलेल्या बांधकामामुळे धोकादायक बनला आहे. महामार्गालगत असलेल्या या विहिरीला कोणतेही संरक्षक कठडे किंवा रेलिंग नाही. दोन आठवड्यांपूर्वीच येथे एक टेम्पो कोसळला होता, सुदैवाने तेव्हा जीवितहानी झाली नाही. या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रस्ता कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
या भीषण दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त करत राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter