नवी दिल्ली : २ मे —
भारतीय हवामान विभागाने (IMD) मे महिन्यासाठी नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, मे महिन्यात महाराष्ट्र, गुजरातसह देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, या महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मे महिन्यात हिमालयाच्या पायथ्याकडील काही भाग, पूर्व किनारपट्टीवरील राज्ये, गुजरात आणि महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, देशाच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. मात्र, ईशान्य भारत आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहू शकते.
देशात मे महिन्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. केवळ पूर्व, ईशान्य आणि पूर्व मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मान्सूनच्या आगमनाबाबत माहिती देताना महापात्रा म्हणाले की, नैऋत्य मान्सून १४ ते १६ मेच्या दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होऊ शकतो.
सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरावरील 'अल निनो सदर्न ऑसिलेशन' (ENSO) तटस्थ परिस्थितीकडे वाटचाल करत आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, आगामी नैऋत्य मान्सून हंगामात 'अल निनो' परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याबद्दल सांगायचे तर, दक्षिण द्वीपकल्पीय भारत वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी होते. या काळात देशाला एकूण ७ 'वेस्टर्न डिस्टर्बन्सेस'चा फटका बसला.
आगामी काळात राज्यातील नागरिकांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागू शकतो, मात्र वेळेवर येणाऱ्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.