कुराण पठण, नमाज आणि दानधर्म; भारतात अशी साजरी होते शब-ए-कद्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अमीर सुहेल वानी

इस्लामिक दिनदर्शिकेतील अत्यंत पवित्र रात्रींमध्ये 'शब-ए-कद्र'ला एक सर्वोच्च स्थान आहे. या रात्रीला जगभरातील मुस्लिम बांधव अत्यंत आदराने पाहतात. भारतात इस्लामिक शिक्षण, सुफी अध्यात्म आणि समाजजीवनाचा खूप मोठा इतिहास आहे. त्यामुळे इथे शब-ए-कद्रची रात्र अत्यंत भक्तीभावाने साजरी केली जाते. इथल्या मातीत या परंपरेची पाळेमुळे खूप घट्ट रुजली आहेत. या रात्री तीव्र आध्यात्मिक भक्तीसोबतच स्थानिक चालीरीती आणि सामुदायिक परंपरांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. नमाज, आत्मपरीक्षण, दानधर्म आणि परमेश्वराच्या जवळ जाण्याची ओढ या रात्री प्रकर्षाने जाणवते.
 
शब-ए-कद्रचा कुराणमधील आधार
शब-ए-कद्रचे पावित्र्य साक्षात कुराणमधून आले आहे. याच रात्री प्रेषित मुहम्मद यांच्यावर कुराणचे पहिले प्रकटीकरण झाले होते. कुराणमध्ये या रात्रीचे महत्त्व सांगण्यासाठी 'सूरह अल-कद्र' हा एक संपूर्ण अध्यायच समर्पित करण्यात आला आहे. त्यात असे म्हटले आहे:
"खरेच, आम्ही हे कद्रच्या रात्री अवतरले आहे. आणि कद्रची रात्र काय आहे, हे तुम्हाला कसे समजणार? कद्रची रात्र हजार महिन्यांहून अधिक उत्तम आहे."
 
या घोषणेमुळे शब-ए-कद्रला एक अतुलनीय असा आध्यात्मिक दर्जा मिळाला आहे. या रात्री केलेल्या उपासनेचे पुण्य त्र्याऐंशी वर्षांहून अधिक काळ केलेल्या भक्तीच्या बरोबरीचे असते, अशी ठाम श्रद्धा आहे. प्रेषितांच्या परंपरेनुसार, ही रात्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा रात्रींमध्ये येते. प्रामुख्याने सत्ताविसावी रात्र शब-ए-कद्र म्हणून मानली जाते.
 
भारतातील परंपरेची ऐतिहासिक पाळेमुळे
व्यापार, विद्वत्ता आणि सुफी संतांच्या माध्यमातून इस्लाम भारतीय उपखंडात पोहोचला. शतकानुशतके भारतीय मुस्लिमांच्या धार्मिक संस्कृतीत अनेक गोष्टी मिसळून गेल्या. त्यात सनातनी इस्लामिक प्रथा आणि सुफीवादाचा भक्तीभाव यांचा सुरेख मेळ पाहायला मिळतो.
मध्ययुगीन काळात, विशेषत: मुघल साम्राज्याच्या काळात मशिदी आणि सुफी आश्रम (खानकाह) रमजानच्या उपासनेची मोठी केंद्रे बनली. शब-ए-कद्रच्या रात्री मोठ्या प्रमाणावर सामूहिक नमाज पठण, कुराण वाचन आणि आध्यात्मिक चिंतन सुरू झाले. परमेश्वराचे नामस्मरण (जिक्र), प्रार्थना (दुआ) आणि शांतपणे चिंतन करून ही रात्र जागवावी, असा मोलाचा उपदेश सुफी संतांनी दिला.
 
अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यासारख्या 'चिश्ती परंपरे'शी जोडलेल्या प्रमुख वास्तूंमध्ये एक वेगळीच संस्कृती फुलली. तिथे रमजानच्या शेवटच्या दहा रात्रींमध्ये रात्रीच्या भक्तीची एक विशेष परंपरा विकसित झाली. यासाठी देशभरातून हजारो भाविक तिथे मोठ्या श्रद्धेने येतात.
 
शब-ए-कद्रच्या रात्री चालणारी उपासना
देशभरात शब-ए-कद्र अत्यंत आध्यात्मिक तीव्रतेने पाळली जाते. रात्रभर मशिदी रोषणाईने उजळून निघतात. भाविक मोठ्या संख्येने एकत्र येऊन अल्लाहची उपासना करतात.
 
१. रात्रभर चालणारी नमाज (कियाम उल लैल) :
'कियाम उल लैल' म्हणजेच रात्रीची ऐच्छिक नमाज ही या रात्रीची मुख्य उपासना आहे. भाविक नमाजचे मोठे पठण करतात. ते कुराणचे विस्तृत भाग वाचतात आणि अल्लाहकडे क्षमा मागतात. रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांत अनेक जण मशिदीत राहून 'इतिकाफ' (आध्यात्मिक एकांतवास) करतात.
 
२. कुराण पठण आणि पूर्तता :
या रात्री कुराण पठण करण्याला खूप मोठे पुण्य मानले जाते. अनेक मशिदींमध्ये सामूहिक वाचन आणि 'खत्म-ए-कुराण'चे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. या रात्री परमेश्वराची कृपा मोठ्या प्रमाणावर बरसते, अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे.
 
३. प्रार्थना आणि क्षमायाचना :
मुस्लिम बांधव रात्रीचा बहुतांश वेळ स्वतःच्या वैयक्तिक प्रार्थनेसाठी देतात. प्रेषित मुहम्मद यांनी शिकवलेली एक अत्यंत प्रसिद्ध प्रार्थना आहे:
"हे अल्लाह, तू अत्यंत क्षमाशील आहेस आणि तुला क्षमा करायला आवडते, त्यामुळे मला क्षमा कर."
मशिदी आणि घरांमधील वातावरण अत्यंत चिंतनशील बनते. भाविक मागील पापांसाठी क्षमा मागतात आणि योग्य मार्गदर्शन तसेच कल्याणासाठी प्रार्थना करतात.
 
४. दान आणि सामाजिक बांधिलकी :
दानधर्म करणे हा या रात्रीचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कुराणने करुणेला दिलेले महत्त्व ओळखून अनेक लोक गरजूंना अन्न, कपडे किंवा आर्थिक मदत देतात. शहरी भागात सामुदायिक स्वयंपाकघरे चालवली जातात आणि रात्री उशिरा अन्नाचे वाटप केले जाते.
 
भारतातील विविध प्रादेशिक स्वरूपे
भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीने शब-ए-कद्रच्या प्रादेशिक परंपरांना एक वेगळाच आकार दिला आहे. हैदराबाद, लखनौ आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये ऐतिहासिक मशिदी मोठ्या गर्दीची प्रमुख केंद्रे बनतात. उदाहरणार्थ, दिल्लीच्या जामा मशिदीचा परिसर रात्रभर भाविकांनी फुलून जातो. संपूर्ण जुन्या शहरात कुराण पठणाचे पवित्र निनाद घुमत राहतात.
 
श्रीनगर आणि काश्मीरच्या इतर भागांमध्ये शब-ए-कद्रचे वातावरण अत्यंत आध्यात्मिक आणि भारलेले असते. हजरतबल दर्ग्यासारख्या मशिदींमध्ये हजारो भाविक येतात. ते रात्रभर प्रार्थना, कुराण पठण आणि क्षमायाचनेत मग्न असतात. पहाटेच्या विशेष नमाजने या रात्रीची सांगता होते. यावेळी पश्चात्ताप आणि आध्यात्मिक नवनिर्माणावर भावनिक प्रवचने दिली जातात.
 
घराघरांतून चालणारी प्रार्थना
सामूहिक उपासनेसाठी मशिदी महत्त्वाच्या असतातच. पण घरांमध्येही या रात्रीला खूप मोठे महत्त्व असते. कुटुंबे प्रार्थना आणि कुराण पठणासाठी एकत्र येतात. घरातील मोठी माणसे तरुणांना भक्तीसाठी रात्रभर जागे राहण्यास प्रोत्साहन देतात. महिला अनेकदा घरीच प्रार्थनेचे गट तयार करतात. त्या 'तस्बीह' वाचतात आणि आध्यात्मिक चिंतनात मग्न होतात.
घरातील ही उपासना या रात्रीचे नैतिक महत्त्व अधिक वाढवते. दैनंदिन जीवनात संयम, नम्रता आणि करुणा बाळगण्याची मोठी शिकवण यातून मिळते.
 
आजच्या काळातील महत्त्व
आधुनिक भारतात शब-ए-कद्रची परंपरा स्वतःचे मूळ आध्यात्मिक स्वरूप टिकवून ठेवत काळानुसार नक्कीच बदलत आहे. आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रमुख मशिदींमधून प्रार्थना आणि प्रवचनांचे थेट प्रक्षेपण केले जाते. प्रत्यक्ष मशिदीत जाऊ न शकणाऱ्या भाविकांना यामुळे घरबसल्या सहभागी होता येते.
 
समाजातील अनेक बदलांनंतरही, भारतीय मुस्लिमांसाठी ही रात्र सामूहिक आध्यात्मिक अनुभवाचा एक अत्यंत शक्तिशाली क्षण आहे. यातून श्रद्धा अधिक ताजी होते आणि सामाजिक बंध मजबूत होतात. ईश्वराची कृपा नेहमीच आपल्या पाठीशी असते, या कुराणमधील आश्वासनाची भाविकांना पुन्हा नव्याने आठवण होते.
 
भारतातील 'शब-ए-कद्र'ची परंपरा ही इस्लामिक भक्ती आणि उपखंडातील समृद्ध सांस्कृतिक तसेच आध्यात्मिक वारशाची घट्ट वीण आहे. कुराणात उल्लेख असलेली मूळ असलेली आणि शतकानुशतकांच्या सुफी प्रथेने तसेच सामूहिक उपासनेने घडलेली ही रात्र परमेश्वरासमोरील नम्रतेचे प्रतीक आहे. आध्यात्मिक परिवर्तनाची ती एक मोठी आशा आहे.
 
प्रार्थना, दान आणि नामस्मरणातून भाविक त्या स्वर्गीय क्षणाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. कुराणने वर्णन केल्याप्रमाणे ही तीच रात्र आहे, जी हजार महिन्यांहून खरोखरच उत्तम आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter