समीर गायकवाड
दिल्लीतल्या रस्त्यांवरचा तो मराठी माणसाचा आजवरचा सर्वात मोठा मोर्चा होता. त्यात अग्रभागी असलेल्या एका ट्रकच्या हौदयात उभे राहून एक शाहीर डफ वाजवत होता. माईकचा वापर न करता गळ्याच्या शिरा ताणून तो सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत सलग सहा तास गात होता. एका हाताने डफ वाजवत तो आपल्या खडया पहाडी आवाजात पोवाडे गात होता. हे अद्भुत दृश्य बघून दिल्लीकर हैराण झाले. ते तोंडात बोटे घालून त्या शाहीराकडे अचंबित नजरेने बघत होते.
चार वाजता मोर्चाची सांगता जाहीर सभेने झाली. ती सभा संयुक्त महाराष्ट्रासाठीची होती. या सभेत बोलताना आचार्य अत्रे त्या शाहीराचे कौतुक करताना सदगदित झाले. ते म्हणाले, "शाहीर, छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तुमच्या पाठीवर 'शाब्बास शाहीर' अशी थाप मारली असती. हातातलं सोन्याचं कडं तुम्हाला बक्षीस दिलं असतं." 'दो कवडी के मोल बिकने को मराठा तयार नहीं है' असं ठणकावून सांगणारे ते महान शाहीर होते 'शाहीर अमर शेख'. या अमरशेखांच्या कर्तृत्वाचा आणि जीवनाचा हा धांडोळा.
अमर शेख धर्माने मुस्लीम होते. पण त्यांनी कधी जात किंवा धर्म बघितला नाही. त्यांच्या आयुष्याची सुरुवात पाणक्या म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी गाडीचा क्लिनर आणि गिरणी कामगार म्हणून काम केले. पुढे ते गिरणी कामगारांचे पुढारी झाले. पहाडी आवाजाच्या देणगीमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले. शेख आडनावाच्या या शाहिराची ही रसरशीत चित्तरकथा आहे.

'महाराष्ट्र शाहीर' म्हणून अमर शेख यांना विसरणे हा कृतघ्नपणा ठरेल. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत मराठी जनतेचा त्याग सर्वात मोठा आहे. आचार्य अत्रे, डांगे, एस. एम. जोशी, उद्धवराव पाटील, सेनापती बापट आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या थोर नेत्यांच्या घणाघातामुळे ही चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचली. हे वातावरण तयार करण्यात शाहीर अमर शेख यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आत्माराम पाटील आणि इतर सर्वच शाहिरांचे योगदान मोलाचे आहे.
आज कोणाला खरे वाटणार नाही, पण त्या काळात ग्रामीण भागात वीज नव्हती. माईक नव्हते. लाखा-लाखांच्या सभा फळीवर कुठे तरी खडूने जाहिरात करून जमत होत्या. अशा या प्रचंड सभांमध्ये शाहीर अमर शेख यांच्या शाहिरीने सभेची सुरुवात होत असे. दिग्गज वक्ते रात्री कधीतरी उशिरा पोहोचत. त्या काळात दहा वाजेपर्यंतच सभा आटोपली पाहिजे, असा कोणताही नियम नव्हता.
एकेका रात्री चार-चार सभा असत आणि सर्व सभा मागे-पुढे होत. अमर शेख आपल्या पहाडी आवाजाने सभा सुरू करून द्यायचे. अत्रे, डांगे, एस. एम, उद्धवराव आणि क्रांतिसिंह हे पांडव सभेला पोहोचल्यावर अमर शेख पुढच्या सभेला जायचे. एवढे गाऊन एखादा शाहीर रक्त ओकला असता. व्यासपीठावर केवळ तीन-चार कंदील असत. गावात पेट्रोमॅक्स असली तरी ती काँग्रेसवाल्याकडे असायची. त्यामुळे ती मिळायची नाही आणि मग कंदिलावरच सभा व्हायची. सभेच्या शेवटच्या माणसाला व्यासपीठावरील माणसं दिसायचीच नाहीत. पण अमर शेख यांचा पहाडी आवाज अगदी शेवटपर्यंत पोहोचायचा. सर्वत्र निरव शांतता असायची. डफावर थाप पडल्यावर अमर शेख यांच्या मुखातून धगधगते शब्द निखारा होऊन बाहेर पडायचे.

‘जनतेच्या सत्तेची ज्योत जागती
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती
गोव्याच्या फिरंग्याला चारूनी खडे
माय मराठी बोली चालली पुढे
एक भाषकांची होय संगती
गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती..’
अमर शेख यांच्या पाठोपाठ आत्माराम पाटील हातात डफ घ्यायचे. त्यांच्या शाहिरीने एक वेगळाच जोश निर्माण व्हायचा.
‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय सरकारा
खुशाल कोंबडं झाकून धरा..’
महाराष्ट्र अक्षरश: पेटून उठलेला होता. संयुक्त महाराष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करायची तयारी मराठी माणसाने दाखवली होती. या शाहिरांच्या तोंडून निघणारे शब्द लोक अक्षरश: झेलत होते.
बेल्लारी बेळगांव ।
पंढरी पारगाव।
बोरी उंबरगाव ।
राहुरी जळगाव।
सिन्नरी ठाणगांव।
परभणी नांदगाव।
व-हाडी वडगांव।
शिरीचा बस्तार।
भंडारा चांदा।
सातारा सांगली।
कारवार डांग।
अन् मुंबई माऊली।
जागृत झालाय दख्खनपुरा.. खुशाल कोंबडं झाकून धरा..
सारी सभा या शाहिरांच्या आवाक्यात यायची. मुख्य वक्त्यांना सभेला यायला दोन-तीन तास उशीर व्हायचा. एवढा वेळ सभेला मंत्रमुग्ध करून ठेवणे सोपे काम नव्हते. हे मर्दाचे काम होते. हे मर्द शाहीर दोन-तीन तास सभा आपल्या ताब्यात ठेवत होते. त्यांचा डफ, तुणतुणे आणि ढोलकी ऐकून सारी सभा मोहरून जात होती. संयुक्त महाराष्ट्राचे वातावरण तयार करण्यात या लोकशाहिरांचे योगदान खूप मोठे आहे.
संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश कोणी आणला यावर पुढे वाद झाला. पण तो प्रत्यक्ष मराठी जनतेने आणला. आचार्य अत्रे यांच्या वाणीने आणि 'मराठा'तील लेखणीने आणला. त्याचबरोबर महाराष्ट्रातील या दमदार शाहिरांनी छत्रपतींच्या काळातील शाहिरी या चळवळीत अमोघ शस्त्रासारखी वापरली.
संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी वातावरण तयार करण्याची जबाबदारी या शाहिरांनी पार पाडली. असा इतिहास महाराष्ट्राला नक्कीच लिहावा लागेल. या शाहिरांना त्याबदल्यात काहीही मिळालेले नाही. त्यांनी कोणतेही मानधन घेतले नाही. प्रवास खर्च कोणी दिला असेल तर ठीक, नाहीतर एसटी आणि साध्या युनियनच्या गाड्यांमधून प्रवास करून त्यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. हे शाहीर आणि त्यांचे नायक शाहीर अमर शेख यांना महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही.

संयुक्त महाराष्ट्रातील लढ्याचे दोन-तीन मोठे टप्पे होते. प्रतापगडचा मोर्चा हा एक मोठा टप्पा होता. समितीने मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकणे हा सर्वात मोठा टप्पा होता. त्याचप्रमाणे दिल्लीवर धडकलेला समितीचा विराट मोर्चा हाही फार मोठा टप्पा मानला जातो. या दिल्लीच्या मोर्चात अग्रभागी एक ट्रक होता. त्या ट्रकवर उभे राहून शाहीर अमर शेख यांची डफावर थाप पडली. सकाळी दहा वाजता सुरू झालेला हा मोर्चा दुपारी चार वाजेपर्यंत चालला. दहा ते चार असे सलग सहा तास शाहीर अमर शेख गात होते. एखादा शाहीर एवढ्या वेळाने रक्त ओकला असता. दिल्लीच्या रस्त्यावरील लोक तोंडात बोटं घालून या शाहिराकडे पाहत होते. गगनभेदी आणि पहाडी आवाजात अमर शेख दिल्ली भेदून गात होते.
'जाग मराठा.. आम जमाना बदलेगा..'
अमर शेख यांच्यासोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हेही होते. त्यांनी गीते लिहायची आणि अमर शेख यांनी ती गायची.
'माझी मैना गावाकडे राहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
ओतीव बांधा | रंग गव्हाला | कोर चंद्राची | उदात्त गुणांची |
मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |
हसून बोलायची | मंद चालायची | सुगंध केतकी | सतेज कांती |
घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची | काडी दवन्याची |
रेखीव भुवया | कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हिरयाची |
काठी आंधल्याची | तशी ती माझी गरीबाची |
मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण |
नसे सुखाला वाण | तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||'
अण्णाभाऊंचे हे गीत अमर शेख यांनी गावागावात पोहोचवले. त्याचवेळी डाव्या विचारांचे प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांची कविताही त्यांनीच अमर केली.
'डोंगरी शेत माझं ग, मी बेनू किती ?
आलं वरीस राबून, मी मरू किती ?
कवळाचा भारा बाई ग, घेऊन चढावं किती ?
गवताचा भारा बाई ग, घेऊन चढावं किती ?
आडाचं पाणी बाई ग, पाणी वडावं किती ?
घरात तान्हा बाई ग, तान्हा रडंल किती ?
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती ?........
अक्षय र्हाया कुंकू कपाळा
संसार वेलीच्या फुलवाया फुला
रूप नवं आणू महाराष्ट्र भूला
जुलमाचे काच रावणी फास, एकीचं निशाण हाती ! ..'
दिल्लीचा मोर्चा संपल्यानंतर जाहीर सभा झाली. तेव्हा आचार्य अत्रे अमर शेख यांना म्हणाले, "शाहीर, छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी तुमच्या पाठीवर 'शाब्बास शाहीर' अशी थाप मारून हातातलं सोन्याचं कडं तुम्हाला बक्षीस दिलं असतं."

अमर शेख हे नुसतेच शाहीर नव्हते. ते उत्तम गीतकारही होते. 'अमर गीत', 'धरती माता' आणि 'कलश' हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. हे काव्यसंग्रह त्यांच्यातील साम्यवादी कवीची साक्ष पटवायला पुरेसे आहेत. 'कलश' या काव्यसंग्रहाला आचार्य अत्रे यांनी ६० पानांची प्रस्तावना लिहिली. त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व मराठी मनात आणि घराघरात पोहोचले.
या 'कलश'मध्ये अमर शेख यांनी कोकिळेच्या संगीतावर एक कविता लिहिली आहे. जगाला या कोकिळेच्या आवाजाची मोहिनी अनेक वर्षे आहे. पण या साम्यवादी कवीला संगीतापेक्षाही गरीब माणसाच्या पोटातील भूक अधिक अस्वस्थ करत होती. म्हणूनच अमर शेख लिहून जातात.
'कोकीळं गाऊ नको तव गीत
जाळीत सुटले मानवी हृदया..
जे भेसूर संगीत
भूक येई पायात माझी बघ
होई जीवाची तगमग तगमग
काय मला तारील तुझे संगीत
कोकीळं गाऊ नको तव गीत.....'
या ख्यातनाम मराठी लोकशाहिराचे 'शाहीर अमर शेख' हे टोपण नाव होते. त्यांची कारकीर्द २० ऑक्टोबर १९१६ ते २९ ऑगस्ट १९६९ इतकी राहिली. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव होते. त्यांच्या आईचे नाव मुनेरबी होते. बार्शी येथील एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. या मुलाला विलक्षण पल्लेदार आणि पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी लाभली होती. मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा त्यांना आईकडून मिळाला होता. गरिबीमुळे त्यांना कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून काम करावे लागले.
गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगातही जावे लागले. तिथे त्यांची कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्याशी भेट झाली. त्यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला आले. तिथे त्यांनी मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम सुरू केले. याच ठिकाणी मित्रांनी त्यांचे 'अमर शेख' असे नामकरण केले. १९३०-३२ च्या सुमारास ते राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. पुढे १९४७ मध्ये त्यांचा ज्योती (पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर) यांच्याशी विवाह झाला.
स्वतः एक श्रमिक म्हणून त्यांनी सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न पाहिले. आपल्या रचना अत्यंत रसाळपणे आणि बुलंद आवाजात गाऊन त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वतः रचलेली आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करत. गोवामुक्ती आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी त्यांनी आपल्या शाहिरीतून देशासाठी लाखो रुपयांचा निधी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी वाणी आणि लेखणीचा यज्ञ मांडला.
त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते आणि लोकनाट्ये यांचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात त्यांनी या गुणांचा पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो.

'कलश' आणि 'धरतीमाता' हे त्यांचे काव्यसंग्रह, 'अमरगीत' हा गीतसंग्रह आणि 'पहिला बळी' हे त्यांनी लिहिलेले नाटक आहे. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छत्रपती शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. 'युगदीप' व 'वख्त की आवाज' या मासिकांचे संपादनही त्यांनी केले. 'प्रपंच' आणि 'महात्मा ज्योतिबा फुले' या चित्रपटांतून तसेच 'झगडा' या नाटकातून त्यांनी प्रभावी भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी त्यांचे मतभेद झाले. त्यामुळे त्यांनी तो पक्ष सोडला.
लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे हा एक उद्देश होता. तसेच शाहिरी व लोककलेचा वारसा वृद्धिंगत व्हावा यासाठी मुंबई विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ 'शाहीर अमर शेख' अध्यासन सुरू करण्यात आले आहे.
कवितेची अंतर्लय आणि रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. काही कवनांतून त्यांनी रौद्र रसाचा आविष्कार घडवला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक होत्या. तरीही त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रुजली आणि फुलली. ती कविता लोकगंगेने जगवली.
प्र. के. अत्रे आणि मं. वि. राजाध्यक्ष यांनी या शाहिराचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. अत्रे त्यांना 'महाराष्ट्राचा मायकोव्ह्स्की' म्हणत. त्यांना सर्वात प्रिय असलेली पदवी म्हणजे 'लोकशाहीर'. आपले संपूर्ण आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा प्राण होता. सामान्यांतल्या सामान्यांचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.
२९ ऑगस्ट १९६९ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी इंदापूरजवळ त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन लोककलांचे जतन आणि संवर्धन व्हावे, हा विचार पुढे आला. शाहिरी व लोककलेचा वारसा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने मुंबई विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ 'शाहीर अमर शेख' अध्यासन सुरू करण्यात आले.
अमर शेख यांनी 'प्रपंच' आणि 'महात्मा फुले' या गाजलेल्या चित्रपटांत भूमिका केल्या. त्यांच्या या भूमिका खूप गाजल्या. 'महात्मा फुले' हा चित्रपट खुद्द आचार्य अत्रे यांची निर्मिती होता. त्यांच्या या चित्रपटाला राष्ट्रपतींचे रौप्य पदक मिळाले होते. याच चित्रपटात गाडगेबाबांनीसुद्धा कीर्तन करून काम केले होते. याच चित्रपटासाठी अमर शेख यांच्या अभिनयाचा गौरव झाला. आचार्य अत्रे तेव्हा म्हणाले होते, अमर शेख म्हणजे धग, रग आणि आग यांची बेरीज होय.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नवीन पिढीला या अजरामर शाहिराच्या महान कार्याची ओळख व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच. या अनोख्या योद्ध्याला त्रिवार नमन.
(लेखक मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत आहे.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter