फारुक एस. काझी यांचं “हाटूमुटूचा चंद्र” - करुणभाव आणि कृतिशीलता यांचा संगम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 11 h ago
फारुक एस. काझी यांचा बालकथासंग्रह हाटूमुटूचा चंद्र
फारुक एस. काझी यांचा बालकथासंग्रह हाटूमुटूचा चंद्र

 

प्रतीक सुनील येतावडेकर

फारुक एस. काझी हे बालसाहित्यिक म्हणून प्रसिदध आहेतच त्यासोबतच कृतीशील, प्रयोगशील शिक्षक म्हणूनही ते परिचित आहेत. चुटकीचं जग, टप्पूच्या गोष्टी (३ भागातील मालिका), अब्बूंचे मोदक, जादूई दरवाजे, चित्र आणि इतर कथा, तु माझी चुटकी आहेस आणि इतर कथा, प्रिय अब्बू इ. विपुल अशा प्रकारची बालसाहित्याची निर्मिती फारुक काझी यांनी केली आहे. बालसाहित्यातील अद्‌भुतरम्यता कुठेतरी हरवत चालली आहे यावर एक चर्चा मध्यंतरीच्या काळात घडून आली होती. त्यावर फारुक काझी यांच्या साहित्यातून वास्तवासोबतच अद्‌भुतरसाचा अनुभव ही वाचकांना येत असतो असे प्रतिपादन केले गेलले पाहायला मिळाले. वास्तव आणि कल्पकतेचा मेळ त्यांनी लिहीलेल्या साहित्यातून वाचायला मिळतो.

‘हाटूमुटूचा चंद्र’ हे नुकतेच प्रकाशित झालेले दहा कुमारकथांचे पुस्तक. या दहा कथांतून जी पात्रं भेटतात, संवाद साधतात त्यातील एक समान सूत्र म्हणजे माणसाची निसर्ग आणि भवतालाशी, जमिनीशी घट्ट असलेली नाळ. माणदेश, तिथली भाषा, निसर्ग यांचा प्रवास घडवून आणणारी ही सफर बालवाचकांना तसेच प्रौढ वाचकांना ही पर्वणीच म्हणावी लागेल. एकूण १० कथा या कुमारकथा संग्रहात समाविष्ठ केल्या गेल्या आहेत.

‘एस पी – १३’ कथेतील समायरा व तिची निसर्गाशी असलेली ओढ याचा वेध घेणारी कथा. अपघाताने ती एका नव्या ग्रहावर जाते. नव्या ग्रहाचा शोध लागल्यावर तिथल्या वाताव‌रणाशी एकरूप होते. तिथला निसर्ग आणि निसर्गाबाबतची मनातील भावना यामुळे भारावून जाऊन ती तिथेच राहायचा निर्णय घेते. बालमनातील शोध घेण्याची, नवीन शिकण्याची ओढ, निसर्गाबाबत असलेली संवेदनशीलता या बाबी कथेतून चित्रित झालेल्या पाहायला मिळतील. अद्भुतता आणि वास्तव यांचा सुरेख मेळ या कथेत अनुभवायला मिळतो

अर्पित आणि रेहान यांच्या बालमनातील निरागसतेची व निसर्गाकडे पाहण्याची एक वेगळीच अनुभूती ‘फिकर नॉट’ या कथेतून मिळते. निसर्गाकडून आपण फक्त घेतो त्याला देत मात्र काहीच नाही हा संदेश मनाला भावून जातो. टेकडीवरील तळ्यातील मासे बाटलीत भरुन ते घरी न्यावेत याला नापसंती दर्शवणारा अर्पित व ती नापसंती खिलाडूपणे स्वीकारणारा रेहान या दोन मित्रांच्या निसर्गाबाबतल्या मनातील भावभावनांची कथा मनात रेंगाळत राहते.निसर्गाकडे असलेले सर्वच ओरबाडून न नेता  निसर्गाने आपल्याला दिलेला आनंद भरून घ्यावा हा संदेश खूप काही शिकवून जातो.

'कर के देखो' या कथेतील ओजस, रेहान, प्रतीक, निशांत, सागर या मित्रांची गँग ही उनाड गँग म्हणून परिचित असते. घरात असणाऱ्या टेकडीवर ट्रेकिंगला गेल्यावर तेथील कचरा पाहून अस्वस्थ झालेला ओजस कचरा गोळा करून नेऊ असं आपल्या मित्रांना म्हणतो. तिथला कचरा नेऊन ती जागा स्वच्छ करतात. त्याबाबत लोकांच्या मनात जागृती व्हावी म्हणून तिथे कचरा टाकू नये असा फलक लावतात. या आवाहनाला कालांतराने प्रतिसाद मिळायला लागतो. स्वच्छतेचा नवा पायंडा यानिमित्ताने ही मुले पाडतात. बालमनात निसर्गाबाबत असलेला आपुलकीचा भाव या कथेतून व्यक्त होताना दिसतो. कर के देखों या नावाने ही गँग  सगळ्या गावात प्रसिद्ध होते. स्वच्छतेबाबतचा सकारात्मक संदेश या कथेतून मिळतो

'जखम' यातील आई आणि मुलाचा संवाद निसर्गाचा होणारा ऱ्हास यावर भाष्य करताना पाहायला मिळतो. योगेश आणि त्याची आई यांच्यातील हृदगत खूप काही सांगून जाते. शाळेजवळ असलेली चिंच जिला थोरली चिंच म्हणून ओळखले जाते. तिच्या फांदया इमारतीला अडथळा येतो म्हणून तोडल्या जातात. हे पाहून अस्वस्थ झालेला योगेश, त्याच्या मनात शालेयजीवनातील एक आठवण तरळते. लक्ष्मी तोटे लावून गावात येणाच्या माकडांचा बंदोबस्त करायची टूम निघते. त्यावेळेस झाडावर असलेल्या एका माकडीणीच्या डोळ्याला त्या लक्ष्मी तोट्यामुळे इजा पोहचते ही बालपणातील घटना आठवून अस्वस्थ झालेल्या योगेशच्या भावना मनाला भिडतात. लक्ष्मी तोट्यामुळे डोळ्याला जखम झालेल्या माकडीनीसोबत तिला बिलगलेले पिल्लू हे चित्र त्याला सतावत राहते. आई-मुलांचा भावस्पर्शी संवाद मानवी मनातील संवेदनशीलता अधोरेखित करतो.

'जाऊ दे त्याला' या कथेतील निधी तिचे बाबा आणि आई वनखात्याच्या बंगल्यावर राहायला येतात. तिथे पूर्वी राहणारे वनअधिकारी शेख साहेब यांच्यासोबत एक दुःखद गोष्ट घडलेली असते. जंगलातील लांडग्याने त्यांच्या लहान मुलीला नेलेले असते.जंगलातील हिंस्त्र जनावरे फिरत असताना आसपासची गुरे, कोंबड्या, मुले इ. हिंस्त्र जनावरांच्या भक्षस्थानी पडलेली असतात. त्यात शेखसाहेबांची लहान मुलगीही गेलेली असते त्या मुलीचा लळा एका अस्वलाला लागलेला असतो. ते अस्वल त्या मुलीचा शोध घेत असते अशा आशयाची ही कथा आहे. या बाबतची माहिती निधीला त्या बंगल्यातील एक डायरीमुळे लागते. यातून मनुष्य आणि प्राणी यांच्यातीत सहसंबंध मनाला वेगळीच सुखकारक भावना देऊन जातो. प्राण्यांशी तुम्ही कसे वागता त्यावर प्राणीही त्या प्रकारेच तुमच्यासोबत वागतात असा संदेश या कथेतून मिळतो.

‘बाबांची भाषा' ही देखील एक भावस्पर्शी कथा. आताच्या पुढारलेल्या, तंत्रस्नेही जगात नात्यांची वीण घट्ट असणं ही बाब दुर्मिळ समजली जाते. मोबाईलसारख्या उपकरणाचा वापर नको इतका वाढलेला असताना त्यातून ही त्याचा वापर रोजच्या जीवनात कसा करता येईल यावर भाष्य करणारी प्रस्तुत कथा आहे. सारंग आणि दवाखान्यात अॅडमिट असलेले त्याचे बाबा या दोघांतील नातेसंबंधांवर  असणारी कथा मनाला स्पर्शून जाते. वडीलांना झालेल्या जबर दुखापतीतून बाबा परत बरे होणार नाहीत हे समजल्यावर त्यांच्यासोबत आता संवाद साधण्यासाठी भाषा शोधणारा सारंग. वडील आणि मुलगा यांच्यातील नात्याची वीण अतूट कशी आहे यावर भाष्य करणारी प्रस्तुत कथा आहे. बोटाच्या खुणांची भाषा तो शोधून काढतो. ती भाषा शिकून सारंग आता बाबांसोबत बोलणार असतो. काहीतरी नवं शिकण्याची जिद्द असलेल्या मुलाची कथा मनात रेंगाळत राहते.

'मैतर' ही मेंढपाळ/मेंढका आणि अमृत नावाच्या मुलाच्या अनोख्या नात्याची कथा. कोल्हापूर भागातून मेंढ्या घेऊन एक मेंढका माणदेशातील एका खेड्यात आला आहे. त्यावळेस त्या गावातील एका अमृत नावाच्या मुलाशी त्या मेंढक्याची ओळख होते. त्या दोघांत मैत्री होते. अमृत आपल्या आजीला सांगून त्या मेंढक्या आजोबांना कानटोपी घेऊन यायला लावतो. ही कानटोपी दिल्यावर सुखावलेला मेंढका आधि त्याच्या भावना याचे चित्रण या कथेत पाहायला मिळते. आपल्या गावी परत जाताना मेंढका छोट्या अमृतला टी शर्ट भेट देऊन जातो. जगलो वाचलो तर पुढल्या वर्षीं भेट होईल ही आश्वासकता, मेंढका आणि अमृत यांच्यामधील नात्याचे अनोखे चित्रण मनाला भावून जाते.

'स्वप्न' या कथेतील मध्यमवर्गीय व श्रीमंत या दोन वर्गातील मानसिकता यातील तफावत  जाणवण्याइतपत असते. याची जाणीव करून देणारी ही कथा आहे. श्रीमंत घरातील मुलाला नवी सायकल घेऊन दिल्याने विशेष अप्रूप नसते.तीच सायकल सामान्य घरातील मुलाला दिल्यावर त्याच्या मनात खूप अप्रूप असते याचे मार्मिक चित्रण असणारी कथा म्हणजेच स्वप्न होय. कथेत असलेली सायकल संवाद साधते आहे ही या कथेची एक लक्षणीय बाब. मुलांच्या मनातील कल्पिताला चालना देणान्या स्वरुपाची कथा म्हणून या कथेकडे पाहावे लागेल.

या पुस्तकाचे शीर्षक जे आहे त्या नावाची कथा म्हणजेच ‘हाटूमुटूचा चंद्र’ होय. साक्षी आणि तिची आजी यांच्यातील संवादातून सदर कथा पुढे सरकत राहते. कोविडकाळात साक्षीच्या वडलांचे निधन झाले आहे. तिच्या घरी साक्षी, तिची आई आणि आजी अशा तिघीजणीच राहत असतात. घरातली परिस्थिती हलाखीची असते. साक्षीची आई घर चालवत असते.साक्षीला शाळेच्या सहलीला जायचे असल्याने ती आजीकडे पैसे मागत असते. सहलीसाठीची रक्कम देणं शक्य नसल्याचे साक्षीला ही माहित असते. आजी आणि नात यांच्यातील संवाद, साक्षीच्या संवेदनशील स्वभावाची साक्ष देतो. घरच्या परिस्थितीची साक्षीला असणारी जाणीव यातून चित्रीत होते. कडुलिंबाच्या कातऱ्या पानाला, फुलाला ‘हाटूमुटूचा चंद्र’ ही समर्पक उपमा आजी देते. प्रत्येकाच्या मनात एक खोटा चंद्र असतो. त्याकडे पाहूनच प्रत्येकजण जगत असतो. आजची स्वप्ने उद्या सत्यात उतरवायची हा अद्म्य विश्वास देणारी ही कथा. या पुस्तकातील सगळ्याच कथांमधून ही कथा वेगळ्या प्रकारे मनाच्या कोपऱ्यात रेंगाळत राहते.

‘हिरवं सपान' ही या पुस्तकामधील शेवटची कथा नागर-अनागर, ग्रामीण-शहरी दोन्ही भवतालांचा मनोवेध बालमनाच्या निरागस भावनेतून व्यक्त करणारी अशी कथा म्हणता येईल. शहरात राहणारा मंदार भाणि ग्रामीण भागात राहणारी चंदा या दोघांतील संवाद मनाला भिडतात. तुमच्याकडे शहरात सिंमेटची घरं पेरली जातात का ? असा भाबडा प्रश्न विचारणारी चंदा. गावात बियाणं पेरल्यावर हिरवी झाडं उगवतात हे सांगणारी चंदा. तिच्याच वयाचा असणारा मंदार या दोन भावंडांच्या भावस्पर्शी संवदेनशील नात्याची कथा.

पुस्तकाच्या मलपृष्ठावर प्रा.रणधीर शिंदे सरांनी लिहिलेला ब्लर्ब असून तो वाचून पुस्तकामधल्या कथांबद्दल वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण करतो.

निसर्ग आणि माणूस वेगळे होऊ शकत नाहीत हा संदेश पानापानांतून देणारा प्रस्तुत कथासंग्रह. मानवी भावभावना, तरल बालमनाची निरागसता, निसर्ग, गावप्रदेश याचं चित्रण असणारा आणि चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या रंगछटानी सजलेला कुमारकथासंग्रह ‘हाटूमुटूचा चंद्र’

हाटूमुटूचा चंद्र

पाने : ७६

किंमत : २५०/-

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे