पंढरपूर
आषाढी एकादशीच्या पवित्र औचित्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्नीह पंढरपूर येथील प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पारंपरिक शासकीय महापूजा संपन्न केली. वारकऱ्यांच्या महाप्रसादाने आणि दिंडी सोहळ्याच्या साक्षीने हा सोहळा पार पडला असून, देशाच्या तरुणांसाठी आणि महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी आपण प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महापूजा संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाच्या तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना बळ मिळावे आणि 'विकसित भारत'चे स्वप्न साकार व्हावे, अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी केली आहे. तसेच महाराष्ट्रात सुख, शांती, समृद्धी नांदावी आणि शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे, अशी कामनाही त्यांनी व्यक्त केली.
यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी यंदाची वारी ऐतिहासिक असल्याचे सांगत, २५ किलोमीटरपेक्षा अधिक लांब रांगेत उभे राहून विठ्ठलदर्शनाचा लाभ घेतलेल्या वारकऱ्यांच्या शिस्तीचे कौतुक केले. प्रशासनानेही उत्कृष्ट नियोजन केल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकरी दांपत्य बाळासाहेब माने आणि प्रभावती माने यांचा सत्कार करत 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार २०२६' प्रदान केला. तसेच वाढत्या भाविकांच्या संख्येचा विचार करून यंदापासून पंढरपूर मंदिर कॉरिडोअरचे काम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि मोफत विजेसंदर्भातील निर्णय वारकऱ्यांच्या सेवेच्या भावनेतूनच घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.