पाकिस्तानची ओळख शोधण्याची केविलवाणी धडपड: हडप्पा संस्कृतीच्या आडून 'हिंदू' इतिहास पुसण्याचा घाट!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
सिंधमधील मोहेंजो-दारो येथील हडप्पा संस्कृतीचे अवशेष
सिंधमधील मोहेंजो-दारो येथील हडप्पा संस्कृतीचे अवशेष

 

साकिब सलीम

गेले काही आठवडे भारतीय मीडियात पाकिस्तान आणि हडप्पा (सिंधू) संस्कृतीची बरीच चर्चा सुरू आहे. खरं तर, गेल्या ७९ वर्षांपासून पाकिस्तानला स्वतःचा असा एक वेगळा इतिहास शोधायचा आहे. त्यांची अवस्था इतकी गोंधळलेली आहे की, कधी ते इस्लामपूर्व हडप्पा संस्कृतीचे गोडवे गातात, तर कधी अरब आक्रमक मोहम्मद बिन कासिम हाच पहिला पाकिस्तानी होता, असं छातीठोकपणे सांगतात. पण या सगळ्या गोंधळात त्यांची एकच गोष्ट मात्र कायम आहे, ती म्हणजे भारताच्या वैदिक हिंदू संस्कृतीबद्दलचा प्रचंड तिरस्कार!

इतिहासाची अडचण आणि पाकिस्तानची कोंडी

कोणताही नवीन देश उभा राहण्यासाठी, तिथल्या लोकांचा एक समान इतिहास आणि संस्कृती असावी लागते. त्यातूनच त्या देशाला एक वेगळी ओळख मिळते. पण पाकिस्तानची सगळ्यात मोठी अडचण हीच होती की, त्यांचा सगळा इतिहास भारताशी आणि साहजिकच इथल्या हिंदू संस्कृतीशी जोडलेला होता. 'हिंदू राज्या'च्या भीतीपोटी आणि हिंदू संस्कृतीला विरोध करण्यासाठीच तर पाकिस्तानची निर्मिती झाली होती. मग आता जर हाच जुना इतिहास मान्य केला, तर वेगळ्या पाकिस्तानच्या निर्मितीला काही अर्थच उरत नाही! याच कोंडीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने जन्मापासूनच स्वतःचा एक खोटा, 'विगर-हिंदू' इतिहास रचायला सुरुवात केली.

मॉर्टिमर व्हीलर आणि पाकिस्तानचा जावईशोध

१९४८ मध्ये भारताने जेव्हा ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ मॉर्टिमर व्हीलर यांना 'ASI'च्या प्रमुख पदावरून हटवलं, तेव्हा पाकिस्तानने लगेच त्यांना आपल्याकडे 'सल्लागार' म्हणून कामावर ठेवलं. व्हीलर यांच्यावर एकच मोठी जबाबदारी होती: सिंधू संस्कृतीला भारताच्या आणि हिंदूंच्या इतिहासापासून वेगळं करणं.

व्हीलर यांनी १९५० मध्ये एक पुस्तक लिहिलं, जे पाकिस्तान सरकारचंच प्रपोगंडा (प्रचार) होतं. त्यांनी यात एक नवीनच जावईशोध लावला. त्यांच्या मते, आजचा पाकिस्तान ज्या भूभागावर उभा आहे (सिंध, बलुचिस्तान, पंजाब), तिथल्या लोकांचा संबंध भारतातील गंगा-यमुना खोऱ्यातील लोकांशी किंवा हिंदू प्रवृत्तीशी कधीच नव्हता. उलट, पाकिस्तानचा जास्त संबंध पश्चिमेकडच्या पर्शिया (इराण) आणि अरब देशांशी होता. थोडक्यात काय, तर भौगोलिकदृष्ट्याही आपण भारतापेक्षा वेगळे आणि इराण-अरबांच्या अधिक जवळचे आहोत, हे सिद्ध करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता.

भुट्टो यांचा काळ आणि इतिहासाची तोडफोड

१९७० च्या दशकात जेव्हा झुल्फिकार अली भुट्टो सत्तेत आले, तेव्हा हा इतिहास पुसण्याचा कार्यक्रम आणखी जोरात सुरू झाला. त्यांनी इतिहासाच्या पुस्तकांतून राम, बुद्ध, अशोक सम्राट ते अगदी मुघलांचा इतिहासही चक्क गायब करून टाकला. त्याजागी 'पाकिस्तान स्टडीज' नावाचा नवा विषय आणला, ज्यातून कट्टर पाकिस्तानी ओळख बिंबवण्याचा प्रयत्न झाला.

याच काळात त्यांना अचानक सिंधू संस्कृतीचा (Indus Valley) प्रचंड उमाळा आला. कारण सोपं होतं, त्यांना वाटलं की ही संस्कृती 'हिंदू' नाहीये! त्या काळात ब्राह्मणी किंवा हिंदू संस्कृती उदयास आलेली नव्हती, असा त्यांचा समज होता. त्यामुळे हिंदू प्रभावापासून मुक्त असलेली ही संस्कृती त्यांना आपलीशी वाटू लागली. नुकतंच बिलावल भुट्टो यांनी मोहेंजोदारोमध्ये 'सिंध फेस्टिव्हल' भरवून आपणच या संस्कृतीचे खरे वारसदार असल्याचा दावा केला होता, तो याच मानसिकतेतून.

'इंडस पर्सन' नावाचं नवीनच खूळ!

भुट्टो यांच्या पक्षाचे एक मोठे नेते ऐतझाझ अहसान यांनी १९९६ मध्ये एक पुस्तक लिहिलं. यातून त्यांनी 'इंडस पर्सन' (सिंधू माणूस) नावाची एक नवीनच ओळख जन्माला घातली. त्यांनी चक्क असा दावा केला की:

  • सिंधू संस्कृतीचा भाग फक्त आणि फक्त आजच्या पाकिस्तानातच होता.

  • हा भाग भौगोलिकदृष्ट्या भारतापेक्षा एकदम वेगळा आहे.

  • सिंधू संस्कृती हिंदू नव्हती, आणि बाहेरून आलेल्या 'हिंदू' आर्यांनी (Aryans) ती उद्ध्वस्त केली.

जिनांनी म्हटलं होतं की "पाकिस्तान म्हणजे ला इलाहा इलल्लाह (इस्लाम)". पण अहसान यांच्या मते, जो माणूस सिंधू खोऱ्यातील आहे, तोच खरा पाकिस्तानी!

खरा इतिहास काय सांगतो?

पाकिस्तानचे हे दावे म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. ज्येष्ठ इतिहासकार रोमिला थापर यांनी हे आर्य आक्रमणाचे दावे केव्हाच फेटाळून लावले आहेत. आर्यांनी येून सिंधू संस्कृती नष्ट केली, याचा एकही पुरातत्व पुरावा जगात अस्तित्वात नाही. हवामानातील मोठे बदल हेच त्या संस्कृतीच्या नाशाचं कारण होतं.

दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हडप्पा आणि सिंधू संस्कृती फक्त पाकिस्तानात मर्यादित नाहीये. अगदी काल-परवा भारतातील 'राखीगढी'सारख्या ठिकाणी या संस्कृतीचे अवाढव्य अवशेष सापडले आहेत, जे थेट उत्तर भारताच्या गंगेच्या मैदानापर्यंत पसरलेले आहेत.

स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड

हिंदू इतिहास पुसण्याच्या या अंधळ्या द्वेषामध्ये पाकिस्तान स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. जर 'इंडस पर्सन' किंवा सिंधू खोऱ्यातील माणूस हीच पाकिस्तानची खरी ओळख असेल, तर मग 'मुहाजिर' समुदायाचं काय? १९४७ मध्ये धर्माच्या नावावर भारताच्या यूपी, बिहार, मध्यप्रदेश आणि हैदराबादमधून सर्वस्व सोडून पाकिस्तानात गेलेल्या लाखो मुस्लिमांना हा नवा इतिहास थेट नाकारतो. कारण ते 'इंडस पर्सन'च्या व्याख्येत बसतच नाहीत!

केवळ हिंदूंचा द्वेष करण्यासाठी स्वतःचा एक वेगळा, तुटलेला आणि खोटा इतिहास रचण्याच्या नादात, पाकिस्तान एका भयंकर मोठ्या चुकीकडे वाटचाल करत आहे, ज्याची किंमत त्यांना भविष्यात नक्कीच मोजावी लागेल.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter