PURI RATH YATRA 2026: ओडिशाच्या पुरीमध्ये 'हेर पंचमी' सोहळा संपन्न; रथयात्रेदरम्यान देवी महालक्ष्मीच्या रुसव्याचे दर्शन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 6 h ago
रथयात्रेनंतर ओडिशाच्या पुरीमध्ये 'हेर पंचमी' सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न; भाविकांची गर्दी.
रथयात्रेनंतर ओडिशाच्या पुरीमध्ये 'हेर पंचमी' सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न; भाविकांची गर्दी.

 

पुरी

ओडिशाच्या पुरी येथे सुरू असलेल्या जगन्नाथ रथयात्रेच्या उत्सवात सोमवारी अत्यंत रंजक आणि धार्मिक महत्त्व असलेला 'हेर पंचमी' सोहळा पार पडला. गुंडीचा मंदिरात भगवान जगन्नाथ आणि देवी महालक्ष्मी यांच्यातील दैवी प्रेम आणि खेळकर संवादाचे प्रतीक असलेल्या या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

वार्षिक रथयात्रेच्या पाचव्या दिवशी हा विधी पाळला जातो. भगवान जगन्नाथ, मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह नऊ दिवसांच्या प्रवासासाठी गुंडीचा मंदिरात जातात, मात्र देवी महालक्ष्मी यांना सोबत नेले जात नाही. यामुळे देवीच्या मनात निर्माण झालेला राग आणि रुसवा या विधीतून प्रतीकात्मक ९पद्धतीने व्यक्त केला जातो.

परंपरेनुसार, देवी महालक्ष्मी यांना एका भव्य पालखीतून सुमारे २.६ किलोमीटर अंतरावरील जगन्नाथ मंदिरापासून गुंडीचा मंदिरापर्यंत नेण्यात आले. जगन्नाथ संस्कृतीचे अभ्यासक भास्कर मिश्रा यांनी सांगितले की, "रथयात्रेदरम्यान सोबत न नेल्यामुळे देवी लक्ष्मी भगवान जगन्नाथांच्या 'नंदीघोष' रथाचा काही भाग प्रतीकात्मक रीतीने तोडते. हा तिच्या रागाचा एक विधीपूर्ण अभिव्यक्ती आहे."

या प्रथेनुसार, देवी गुंडीचा मंदिरात प्रवेश करते, परंतु भगवान जगन्नाथ त्यांच्या बालपणीच्या मित्रांना भेटण्यात मग्न असल्यामुळे देवीची त्यांची भेट होत नाही. मंदिर बाहेर पडताना देवी महालक्ष्मी नंदीघोष रथाचे नुकसान करते आणि दुसऱ्या मार्गाने मुख्य मंदिरात परत येते. हा सोहळा २४ जुलै रोजी होणाऱ्या 'बहुधा यात्रा' म्हणजेच देवांच्या परतीच्या प्रवासाच्या तयारीची सुरुवात मानला जातो. सुरक्षेसाठी गुंडीचा मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.