गुलाम रसूल देहलवी
इराणमधील संकटाच्या काळात अनेक भारतीय मुस्लिम विद्वान, शांतता कार्यकर्ते आणि धर्मगुरूंनी इराणला खंबीर पाठिंबा दिला. सुन्नी, शिया, सुफी, देवबंदी आणि अहल-ए-हदीस अशा विविध इस्लामिक परंपरांच्या प्रतिनिधींनी नवी दिल्लीतील इराणी दूतावासाला भेट दिली. त्यांनी इराणच्या नेतृत्वाप्रती तीव्र शोक आणि सहानुभूती व्यक्त केली.
वरवर पाहता या केवळ आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील राजकीय प्रतिक्रिया वाटू शकतात. पण त्यामागे एक खूप खोल भावना दडलेली आहे. भारतीय उपखंडातील इस्लाम आणि पर्शियन जगताला जोडणारा एक मोठा ऐतिहासिक वारसा यातून दिसून येतो. ही भावना समजून घेण्यासाठी भारतीय इस्लामच्या सांस्कृतिक मुळांचा नव्याने वेध घ्यावा लागेल.
इस्लामचे मूळ ग्रंथ अरबी भाषेत आहेत. पण दक्षिण आशियातील इस्लामचा बौद्धिक आणि सांस्कृतिक विकास प्रामुख्याने पर्शियन विद्वत्ता, अध्यात्म आणि साहित्याच्या प्रभावाखाली झाला. शतकानुशतके पर्शिया आणि मध्य आशियातील विद्वान, न्यायशास्त्रज्ञ आणि सुफी संतांनी या भागातील इस्लामिक शिक्षणाला आकार दिला. त्यांचे विचार, संस्था आणि आध्यात्मिक जाळ्याचा उपखंडातील मुस्लिम समाजाच्या जडणघडणीवर खूप मोठा प्रभाव पडला.
या बौद्धिक वारशाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली स्तंभ म्हणजे अबू हनिफा यांचे न्यायशास्त्र. ते इस्लामिक कायद्याच्या 'हनाफी' विचारधारेचे संस्थापक होते. अबू हनिफा कुफामध्ये राहिले आणि शिकले. पण ते मूळचे पर्शियन होते. त्यांच्या कायदेशीर पद्धतीला दक्षिण आशियातील इस्लामिक न्यायशास्त्रात सर्वोच्च स्थान मिळाले. मुघल साम्राज्य आणि त्याआधीच्या मुस्लिम राजवटींमध्ये हनाफी कायदा हाच न्यायव्यवस्थेचा मुख्य पाया होता. यातूनच या भागातील लाखो मुस्लिमांच्या धार्मिक जीवनाला आकार मिळाला.
भारतात इस्लामचा प्रसार केवळ धर्मशास्त्रज्ञ आणि न्यायशास्त्रज्ञांनी केला नाही. यात पर्शिया आणि मध्य आशियातून भारतीय उपखंडात आलेल्या सुफी संतांचे योगदान सर्वाधिक आहे. त्यांनी ईश्वराप्रती निस्सीम प्रेम आणि भक्तीचा संदेश इथल्या मातीत रुजवला.
यातील सर्वांत आदरणीय नाव म्हणजे ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती. त्यांना 'गरीब नवाज' म्हणूनही ओळखले जाते. पर्शियन सांस्कृतिक वातावरणात त्यांचा जन्म झाला. बाराव्या शतकात ते भारतात आले आणि अजमेरमध्ये स्थायिक झाले. त्यांची अजमेर शरीफ दर्गा ही दक्षिण आशियातील सर्वांत मोठी आध्यात्मिक वास्तू मानली जाते. तिथे सर्व धर्मांचे लोक मोठ्या श्रद्धेने जातात. ख्वाजा गरीब नवाज यांनी करुणा, नम्रता आणि गरिबांच्या सेवेचा उपदेश दिला. त्यांनीच भारतात एका अत्यंत प्रभावी सुफी परंपरेचा पाया रचला.
त्यांचा हा आध्यात्मिक वारसा पुढे कुतुबुद्दीन बख्तियार काकी आणि दिल्लीतील निजामुद्दीन औलिया यांसारख्या महान संतांनी चालवला. त्यांच्या 'खानकाह' (आश्रम) या आध्यात्मिक मार्गदर्शन आणि समाजसेवेची मोठी केंद्रे बनल्या. त्यानंतर सय्यद मुहम्मद गेसू दराज यांनी चिश्ती परंपरा दिल्लीतून दख्खनपर्यंत नेली. त्यांनी दक्षिण भारतात सुफी शिकवणुकीचा प्रसार केला.
अशरफ जहांगीर समनानी (१२८७-१३८६) हे भारत आणि इराणला जोडणारा आणखी एक महत्त्वाचा दुवा आहेत. या पर्शियन सुफी संताने आपले मूळ गाव सिमनन सोडले आणि ते भारतात स्थायिक झाले. ते चिश्ती आणि कादिरी या दोन्ही सुफी परंपरांशी जोडलेले होते. उत्तर भारतात गूढवादी इस्लामचा प्रसार करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील किछौछा शरीफ दर्गा हे त्यांच्या भक्तांचे एक मोठे श्रद्धास्थान आहे.
काश्मीरमध्ये पर्शियन संत मीर सय्यद अली हमदानी यांनी खूप मोठे काम उभे केले. त्यांना 'शाह-ए-हमदान' म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी काश्मीरमध्ये इस्लामिक संस्था आणि शिक्षणाची सुरुवात केली. इथल्या बौद्धिक जीवनात पर्शियन सांस्कृतिक परंपरा रुजवण्याचे मोठे श्रेय त्यांना जाते. काश्मीर खोऱ्यात हस्तकलेची परंपरा सुरू करण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते. स्वतःची शिकवण आणि शिष्यांच्या माध्यमातून त्यांनी काश्मीरची प्रसिद्ध 'ऋषी-सुफी' संस्कृती फुलवली. ही संस्कृती अध्यात्म, सर्वसमावेशकता आणि अहिंसेसाठी जगभर ओळखली जाते.
या ऐतिहासिक घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट होते. दक्षिण आशियातील इस्लामचा विकास एका व्यापक पर्शियन सांस्कृतिक वर्तुळात झाला आहे. शतकानुशतके भारतातील मुस्लिम राजवटींमध्ये पर्शियन हीच प्रशासन, साहित्य आणि शिक्षणाची मुख्य भाषा होती. पर्शियन संस्कृतीचा हा प्रभाव भारतीय मुस्लिमांच्या दैनंदिन धार्मिक शब्दसंग्रहात आजही पाहायला मिळतो.
प्रार्थनेसाठी वापरला जाणारा 'नमाज', उपवासासाठी 'रोजा' आणि अरबीमधील रमदान ऐवजी वापरला जाणारा 'रमजान' हे सर्व उर्दू शब्द थेट पर्शियातूनच आले आहेत.
भारत आणि इराण यांच्यातील हा सांस्कृतिक संवाद केवळ धर्मापुरता मर्यादित नाही. साहित्य आणि सांस्कृतिक कल्पनाशक्तीमध्येही तो खोलवर रुजला आहे. भारताचे महान महाकाव्य महाभारत आणि पर्शियन राष्ट्रीय महाकाव्य 'शाहनामे' यांच्यात खूप मोठे साम्य आहे. शौर्य, न्याय आणि नैतिक संघर्ष या विषयांवर दोन्ही महाकाव्यांत सारखेच विचार मांडले आहेत. पर्शियन पौराणिक कथांमधील महान योद्धा 'रुस्तम' आणि महाभारतातील महाबली 'भीम' यांच्यात कमालीचे साम्य दिसून येते.
त्याचप्रमाणे, 'अर्जुन' या पात्रातून धैर्य, नैतिक जबाबदारी आणि उच्च तत्त्वांशी असलेली बांधिलकी दिसून येते. हीच मूल्ये दोन्ही संस्कृतींमध्ये अतिशय महत्त्वाची मानली गेली आहेत.
या सामायिक बौद्धिक आणि सांस्कृतिक वारशामुळे धार्मिक विचारांनाही एक नवा आकार मिळाला आहे. शिया धर्मशास्त्रामध्ये 'महदी' (इमाम अल-महदी) या अपेक्षित तारणहारावर मोठा विश्वास आहे. न्याय आणि नैतिक व्यवस्थेचा अंतिम विजय होईल, ही मोठी आशा यातून व्यक्त होते. विशेष म्हणजे, ही संकल्पना हिंदू धर्मातील 'कल्की' अवताराशी खूप मिळतीजुळती आहे. कलियुगाच्या शेवटी नीतिमत्ता आणि विश्वाचा समतोल राखण्यासाठी भगवान विष्णू कल्की अवतार घेतील, अशी हिंदू धर्मात ठाम श्रद्धा आहे.
इराणमधील बहुसंख्य मुस्लिम हे शिया पंथाचे अनुयायी आहेत. त्यांच्या मनात अली इब्न अबी तालिब यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. ते सुन्नी परंपरेतील चौथे खलिफा आणि शिया धर्मशास्त्रातील पहिले इमाम आहेत. हजरत अली यांच्याकडे केवळ एक राजकीय नेता म्हणून पाहिले जात नाही. न्याय, नम्रता आणि नैतिक धैर्याचा पुरस्कार करणारे एक महान आध्यात्मिक गुरू म्हणूनही त्यांची ओळख आहे.
इस्लामच्या इतिहासात धर्माच्या कट्टरपंथी अर्थांमुळे अनेक अंतर्गत आव्हानेही उभी राहिली. हजरत अली यांच्या काळात 'खारीजी' नावाचा एक गट उदयास आला. त्यांनी इतर मुस्लिमांना काफिरांचा दर्जा दिला. या प्रथेला 'तकफीर' म्हटले जाते. त्यांनी काफिरांविरुद्धच्या हिंसेचे जोरदार समर्थन केले. इतिहासकार याला इस्लामिक इतिहासातील अतिरेकी कट्टरवादाचे पहिले रूप मानतात.
याउलट, भारत आणि इराण या दोन्ही देशांत बहरलेल्या सुफी परंपरांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी कठोर धार्मिक कट्टरवादाऐवजी अध्यात्म, करुणा आणि आत्मपरीक्षणावर नेहमीच भर दिला. हजरत अली यांच्या आध्यात्मिक वारशातून त्यांनी प्रेरणा घेतली. या गूढवादी परंपरांनी नम्रता, सहिष्णुता आणि सहअस्तित्वाला महत्त्व देणारी एक मोठी संस्कृती जोपासली.
त्यामुळे, भारतीय इस्लाम आणि पर्शियन संस्कृतीमधील हा ऐतिहासिक दुवा केवळ भौगोलिक किंवा राजकीय नाही. तो शतकानुशतके चालत आलेला विद्वत्ता, आध्यात्मिक देवाणघेवाण आणि सांस्कृतिक संवादाचा एक भक्कम पाया आहे. अबू हनिफा यांच्या न्यायशास्त्रापासून ते ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती आणि मीर सय्यद अली हमदानी यांच्या शिकवणुकीपर्यंतचा प्रवास खूप मोठा आहे. भारतीय इस्लामची ही संपूर्ण जडणघडण पर्शियन जगाशी अत्यंत घट्ट जोडलेली आहे.
आज जगात धार्मिक कट्टरतावाद आणि वैचारिक ध्रुवीकरण वेगाने वाढत आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात हा भारत-इराण वारसा एक अत्यंत महत्त्वाची आठवण करून देतो. अध्यात्म, बहुलवाद आणि बौद्धिक मोकळेपणातून घडलेल्या संस्कृतींकडे एक मोठी ताकद असते. धर्म आणि राष्ट्रांच्या सीमा ओलांडून शांतता, सांस्कृतिक संवाद आणि मानवी एकता प्रस्थापित करण्याची ही ताकद कायम टिकून राहते.
(लेखक भारतीय सुफीवादाचे अभ्यासक आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -