सीमेवरील राज्यांनी सजग राहावे - गृहमंत्री शहा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
सीमेवरील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
सीमेवरील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तान आणि नेपाळला लागून असलेल्या सीमावर्ती राज्यांच्या नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसोबत नवी दिल्लीत सुरक्षा आढावा बैठक घेतली. जम्मू आणि काश्मीर, लडाखचे नायब राज्यपाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि सिक्कीमचा प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, गुप्तचर विभागाचे संचालक, सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालकही हजर होते.

यावेळी अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. २२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुन्हेगारांना कठोर प्रत्युत्तर देण्याचे सांगितले होते. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. भारताच्या सीमा, सैन्य आणि नागरिकांना आव्हान देणाऱ्यांना हे ऑपरेशन सडेतोड उत्तर आहे, असे ते म्हणाले. बैठकीत सर्व मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांनी पंतप्रधान आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले.

पहलगाम हल्ल्याकडे दुर्लक्ष न करता ऑपरेशन सिंदूरने जगाला मजबूत संदेश दिला, असे शहा यांनी सांगितले. भारतीय सशस्त्र दलांनी विशिष्ट माहितीच्या आधारावर दहशतवादी गटांवर हल्ले केले. मोदी सरकारच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरणाचा हा पुरावा आहे, असे त्यांनी नमूद केले. देशाने दाखवलेली एकजूट मनोबल वाढवणारी आहे, असेही ते म्हणाले.

६ मे च्या मध्यरात्री सैन्याने पाकिस्तानात नऊ ठिकाणांवर हल्ले केले. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीनसह दहशतवादी गटांची प्रशिक्षण शिबिरे, शस्त्रास्त्रांचे तळ आणि लपण्याच्या जागा उद्ध्वस्त झाल्या. त्यानंतर खबरदारी म्हणून सर्व राज्यांनी मॉक ड्रिलच्या सूचनांनुसार तयारी करावी, असे शहा यांनी सांगितले. रुग्णालये, अग्निशमन दलासह अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवाव्यात. अन्न, इंधनासारख्या वस्तूंचा पुरवठा अखंडित राहील, याची खातरजमा करावी, असे त्यांनी निर्देश दिले.

राज्यांनी एसडीआरएफ, नागरी संरक्षण, गृहरक्षक दल, एनसीसी यांना सतर्क ठेवावे, असे शहा म्हणाले. नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत लोकसहभाग वाढवावा. सोशल मिडियावर देशविरोधी प्रचारावर कडक नजर ठेवावी. राज्य सरकारे आणि केंद्रीय संस्थांनी समन्वयाने त्वरित कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले. संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा मजबूत करावी. अनावश्यक भीती आणि अफवा थांबवण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक प्रशासन, लष्कर आणि निमलष्करी दलांमधील समन्वय वाढवावा, असेही ते म्हणाले.