कर्नाटकात ४० दिवसांत हृदयविकाराने २२ मृत्यू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 21 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये अचानक वाढ झाल्याने सार्वजनिक आरोग्याची चिंता वाढली आहे. गेल्या ४० दिवसांत २२ जणांचा मृत्यू झाला. यापैकी अनेकजण ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. हे मृत्यू जिल्ह्याच्या विविध भागांतून नोंदवले गेले. यात विद्यार्थी, गृहिणी, शिक्षक आणि सरकारी कर्मचारी यांचा समावेश आहे.

३० जूनला आणखी चार जणांचा हृदयविकाराच्या संशयाने मृत्यू झाला. बेलूर येथील गृहिणी थकवा जाणवला आणि अचानक त्या जमिनीवर कोसळल्या. होलेनरसीपुरा येथील इंग्रजी प्राध्यापक प्रोफेसर मुत्तय्या चहा पिताना मरण पावले. चन्नरायपटना येथील डी-गट कर्मचारी कुमार यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते, तिथे त्यांचा मृत्यू झाला. रंगोलीहल्ली येथील सत्यनारायण राव अचानक कोसळले.

नोंदवलेल्या २२ मृत्यूंपैकी पाच जण १९ ते २५ वयोगटातील होते. आठ जण २५ ते ४५ वयोगटातील होते. यामुळे तरुणांमध्ये हृदयाशी संबंधित समस्यांची वाढती घटना चिंताजनक ठरली आहे. फक्त काही मृत्यू ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे होते.

यावर उपाय म्हणून हसनच्या उपायुक्त के.एस. लथाकुमारी यांनी सहा सदस्यांचे वैद्यकीय समिती स्थापन केली आहे. यात जिल्हा आरोग्य अधिकारी, हसन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (हिम्स) चे संचालक आणि वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ यांचा समावेश आहे. या समितीला एका आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

“आम्ही याला आरोग्याचा प्राधान्याचा मुद्दा मानत आहोत. काही मृत्यू हृदयविकाराशी संबंधित वाटत असले, तरी ठोस वैद्यकीय पुरावे अजून यायचे आहेत,” असे हिम्सचे संचालक डॉ. राजन्ना बी. यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही हसनमधील अचानक मृत्यूंची वाढती संख्या मान्य केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला बोलताना ते म्हणाले की, सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. त्यांनी संपूर्ण राज्यात अचानक होणाऱ्या हृदयविकाराच्या मृत्यूंचा, विशेषतः तरुणांमधील, सखोल अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्याने जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेसचे संचालक डॉ. सी.एन. मंजुनाथ यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. ही समिती कर्नाटकातील अशा मृत्यूंची कारणे शोधेल. यात कोविडनंतरच्या गुंतागुंती किंवा लसीच्या दुष्परिणामांचा समावेश आहे का, याचाही तपास होईल.

“हसनमध्ये एका महिन्यात २० हून अधिक असे मृत्यू झाले. आम्ही कोणाला दोष देणार नाही, पण काय घडत आहे हे वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेणे आमचे कर्तव्य आहे,” असे सिद्धरामय्या म्हणाले. त्यांनी लोकांना छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन केले.