हिंदी चित्रपटांमध्ये महिला दिग्दर्शक आपली छाप उमटवत आहेत. सध्या अनेक महिला दिग्दर्शकांचे प्रोजेक्ट्स सुरू आहेत. मेघना गुलजारपासून रिमा कागतीपर्यंत अनेक जणींचे चित्रपट सध्या निर्मितीच्या अवस्थेत किंवा अंतिम टप्प्यात आहेत.
तलाश सारख्या चित्रपटांमधून विशेष छाप उमटवणारी रिमा कागती सध्या 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' या चित्रपटाशी संबंधित तांत्रिक गोष्टींमध्ये व्यग्र आहे. मालेगावमध्ये लो वजेट चित्रपट तयार करणाऱ्या नासिर शेख आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या कहाणीवर आधारित हा कॉमेडी ड्रामा प्रकारचा चित्रपट तयार आहे. चित्रपटाचे ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीला उत्तरले असून, यंदाच तो प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. टोरांटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
मेघना गुलजार तलवार नंतर पुन्हा एकदा क्राइम ड्रामा प्रकाराकडे वळल्या आहेत. त्या 'दायरा' या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या करत आहेत. या चित्रपटात करिना कपूर आणि दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन असणार आहे.
झोया अख्तर सध्या 'गली वॉय २' या चित्रपटाची तयारी करत आहे. या सिक्वेलमध्ये रणबीरसिंह आणि आलिया भट्ट नसतील असं सांगितलं जात आहे. विकी कौशल आणि अनन्या पांडे यांची नावं चर्चेत आहेत. आश्विनी अय्यर तिवारीही पुढचा चित्रपट आणत आहे. हा चित्रपट कोर्टरूम ड्रामा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात आधी करिना कपूर आणि कियारा अडवानी असतील असं सांगितलं जात होतं. मात्र, आता त्यांच्या जागी सोनाक्षी सिन्हा आणि ज्योतिका आल्या आहेत. या चित्रपटाचं काम सुरू झालं आहे. 'हसिन दिलरुबा सारखे चित्रपट लिहिणारी कनिका घिल्लन लेखनाबरोबरच निर्मितीतही उत्तरली आहे. ती तापसी पन्नूबरोबर 'गांधारी' हा थ्रिलर चित्रपट आणत आहे. त्याचं दिग्दर्शन देवाशिष मुखजों करत असले, तरी दिग्दर्शन ही गोष्ट आपल्या नक्कीच विचारात असल्याचं कनिकानं म्हटलं आहे.
'मैं हूंना 'सारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी दिग्दर्शक फराह खान सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सबाबत काम करत आहे. त्यातला एक म्हणजे 'मैं हूं ना' या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. अर्थातच शाहरूख खान मुख्य भूमिकेत असणार आहे आणि तो निर्मितीही करणार आहे. त्याच्या 'किंग' या चित्रपटानंतर तो 'मैं हूं ना २'चं काम सुरू करेल अशी शक्यता आहे. फराह खान 'चुपके चुपके' या चित्रपटाचा रिमेकही करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
एकंदरित सगळ्याच दिग्दर्शकांचे चित्रपट महत्त्वाचे असणार आहेत ही महिलाशक्ती सध्या काहीशा मरगळलेल्या बॉलिवूडला नवी संजीवनी देते का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.