'ख्वाजा मेरे ख्वाजा' गाण्यामागचं १७ वर्षांनंतर उलगडले रहस्य, गाणं 'जोधा अकबर'साठी बनलंच नव्हतं!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

'जोधा अकबर' चित्रपटातील सुप्रसिद्ध कव्वाली 'ख्वाजा मेरे ख्वाजा' आजही श्रोत्यांच्या मनावर राज्य करत आहे. पण तब्बल १७ वर्षांनंतर, संगीतकार ए.आर. रहमान यांनी या गाण्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. हे गाणे मूळतः 'जोधा अकबर' चित्रपटासाठी बनवलेच नव्हते, तर ते त्यांनी त्यांच्या अजमेर शरीफच्या वैयक्तिक भेटीसाठी तयार केले होते.

एका मुलाखतीत बोलताना ए.आर. रहमान यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, "मी अजमेर शरीफ दर्ग्याला भेट देणार होतो आणि तिथे सादर करण्यासाठी मी एक गाणे तयार केले होते. त्याच वेळी 'जोधा अकबर'चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर माझ्यासोबत बसले होते. मी त्यांना हे गाणे ऐकवले आणि म्हणालो की, हे गाणे मी चित्रपटासाठी नाही, तर माझ्या वैयक्तिक प्रवासासाठी बनवले आहे."

गाणे ऐकताच आशुतोष गोवारीकर इतके प्रभावित झाले की, त्यांनी हे गाणे चित्रपटात वापरण्याचा हट्ट धरला. रहमान सांगतात, "आशुतोष म्हणाले, 'नाही, नाही... हे गाणे माझ्या चित्रपटासाठीच आहे. हे गाणे मला द्या!' त्यांचा हट्ट आणि गाण्याबद्दलची आवड पाहून मला त्यांना नाही म्हणता आले नाही."

अशा प्रकारे, जे गाणे ए.आर. रहमान यांच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग होते, ते आशुतोष गोवारीकर यांच्यामुळे 'जोधा अकबर' चित्रपटाचा आत्मा बनले आणि इतिहासात अजरामर झाले. या गाण्यासाठी रहमान यांनी संगीत दिले होते, तर जावेद अख्तर यांनी ते लिहिले होते आणि रहमान यांनी स्वतः ते गायले होते.