ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी एआय-जनरेटेड डीपफेक व्हिडिओंविरोधात कायदेशीर लढाई सुरू करताच, यूट्यूबने मोठी कारवाई केली आहे. तब्बल १.६ कोटींहून अधिक व्ह्यूज असलेले शेकडो बॉलिवूड व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आले आहेत. बच्चन कुटुंबाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर गुगलने हे कठोर पाऊल उचलले आहे.
'AI बॉलिवूड इश्क' नावाचे एक लोकप्रिय यूट्यूब चॅनल, जे "एआय-जनरेटेड बॉलिवूड लव्ह स्टोरीज" शेअर करत होते, ते आता यूट्यूबवरून पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. या चॅनलवर २५९ व्हिडिओ होते, ज्यांना एकत्रितपणे १.६५ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. यातील काही व्हिडिओ आक्षेपार्ह आणि लैंगिकदृष्ट्या स्पष्ट होते, असेही समोर आले आहे.
बच्चन दाम्पत्याने दाखल केलेल्या खटल्यात अशा अनेक व्हिडिओंचा उल्लेख होता. यातील एका व्हिडिओमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना स्विमिंग पूलमध्ये दाखवण्यात आले होते, ज्याला ४१ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज होते. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन एका अभिनेत्रीला किस करताना दाखवण्यात आले होते. या सर्व बनावट व्हिडिओंमुळे बच्चन कुटुंबाची प्रतिमा मलिन होत होती.
या प्रकरणी गुगलने एका निवेदनात म्हटले आहे की, "ज्या चॅनलचा अहवालात उल्लेख आहे, ते त्याच्या निर्मात्यानेच डिलीट केले आहे आणि आता त्यावरील सामग्री उपलब्ध नाही." कंपनीने पुढे म्हटले की, ते दिशाभूल करणारी आणि तांत्रिक फेरफार केलेली सामग्री हटवण्यासाठी कटिबद्ध आहेत.
बच्चन कुटुंबाने गुगल आणि इतर काही वेबसाईटवर ४.५ लाख डॉलर्स (जवळपास ४ कोटी रुपये) नुकसान भरपाईचा दावा केला आहे. या कायदेशीर लढाईमुळे एआय-जनरेटेड सामग्री आणि सेलिब्रिटींच्या हक्कांबाबत एक नवी चर्चा सुरू झाली आहे.