जवळपास आठ महिन्यांनंतर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कठोर प्रयत्न केले, फारसे यश हाती लागले नसले तरी त्याने प्रभावी मारा केला.
कालपासून सुरू झालेल्या दुलीप करंडक स्पर्धेत पूर्व विभागातून खेळणाऱ्या शमीच्या तंदुरुस्तीवर आणि कामगिरीवर सर्वांचे लक्ष होते. त्याने पूर्व विभागाने उत्तर विभागाला पहिल्या दिवशी सहा बाद ३०८ धावांवर रोखले. शमीने १७ षटकांत चार निर्धाव षटके टाकताना ५५ धावांत एक विकेट मिळवली. पूर्व विभागाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारल्यावर नव्या चेंडूवर डावाची सुरुवात करणाऱ्या शमीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
पहिल्या दोन स्पेलमध्ये त्याने जास्त धावा दिल्या नाहीत, परंतु प्रदीर्घ कालावधीनंतर रेड बॉल क्रिकेट खेळत असल्याने लय मिळत नसल्याचे दिसून आले. या दोन स्पेलमध्ये तो तंदुरुस्ती तपासत असल्याचे जाणवत होते. त्याचे दोन तीन चेंडू फलंदाजांच्या बॅटच्या जरा बाजूने गेले, पण उत्तर विभागाचे सलामीवीर अंकितकुमार आणि शुभम खजुरिया यांनी शमीचा मारा
खेळताना फार अडचण झाली नाही. शमीने पूर्ण दिवसांत मिळून १७ षटके गोलंदाजी केली, त्या वेळी तो तंदुरुस्त असल्याचे जाणवत होते. प्रदीर्घ कालावधीनंतर खेळत असल्याने पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाज साधारणतः तंदुरुस्ती आजमावत असतात, तसे शमीही करत होता. आता उद्याच्या दिवसात तो गोलंदाजीत अधिक धार आणण्याचा प्रयत्न करू शकेल.
दुसरीकडे शमीचा साथीदार आणि कसोटीपटू मुकेशकुमार नऊ षटके गोलंदाजी केल्यानंतर लंगडत असल्याचे जाणवत होते. दुसऱ्या सत्रात त्याला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा त्रास जाणवत होते. अखेर ११.५ षटके गोलंदाजी केल्यानंतर त्याने ड्रेसिंग रूममध्ये परतण्याचा निर्णय घेतला.
संक्षिप्त धावफलक : उत्तर विभाग, पहिला डाव: ६ बाद ३०८ (अंकितकुमार ३०, यश धुल ३९, आयुष बदोनी ६३ - ६० चेंडू, ७ चौकार, निशांत सिंधू ४७, मोहम्मद शमी १७-४-५५-१, मानिशी १९-२-९०-३).