पाकिस्तानमध्ये ६० हजारांहून अधिक जणांचा पोलिओ लसीकरणास नकार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 22 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पाकिस्तानमध्ये एप्रिल महिन्यातील राष्ट्रव्यापी पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान ६० हजारांहून अधिक लोकांनी पोलिओ लस घेण्यास नकार दिला. २१ ते २७ एप्रिल या कालावधीत झालेल्या या मोहिमेचा अहवाल एआरवाय न्यूजने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिला आहे.

एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, २०२५ मधील देशाच्या दुसऱ्या राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन मोहिमेत एकूण ६०,९०६ पोलिओ लसीकरणास नकार दिल्याची नोंद झाली आहे. सिंध प्रांतात सर्वाधिक ३९,०७३ नकारांची नोंद झाली आहे. यापैकी ३७ हजारांहून अधिक प्रकरणे एकट्या कराची शहरातील आहेत. त्यानंतर बलुचिस्तानमध्ये ३,५०० हून अधिक नकाराची प्रकरणे आढळली आहेत, तर खैबर पख्तूनख्वामध्ये लसीकरणास नकार देण्याचे प्रमाण ०.४ टक्के होते. पंजाब आणि इस्लामाबादमधूनही पालकांनी लस नाकारल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

लस देण्यास नकार ही पोलिओविरुद्धच्या पाकिस्तानच्या लढाईतील एक मोठी अडचण ठरत आहे. ही आकडेवारी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा देशात पोलिओचा आणखी एक नवीन रुग्ण आढळल्याची पुष्टी झाली आहे. यामुळे २०२५ मध्ये एकूण रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), पोलिओ हा विषाणूमुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये, मुख्यतः दूषित पाणी किंवा अन्नातून पसरतो आणि आतड्यांमध्ये वाढतो. या आजारामुळे लकवा होऊ शकतो, अगदी मृत्यूही होऊ शकतो आणि यावर कोणताही इलाज उपलब्ध नाही. मात्र, मुलांचे या दुर्धर आजारापासून संरक्षण करण्याचा लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. ५ वर्षांखालील मुलांना पोलिओविरुद्ध उच्च प्रतिकारशक्ती देण्यासाठी तोंडावाटे पोलिओ लसीचे अनेक डोस आणि नियमित लसीकरण वेळापत्रक पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

WHO नुसार, पोलिओचा परिणाम प्रामुख्याने ५ वर्षांखालील मुलांवर होतो. तथापि, कोणत्याही वयाची लस न घेतलेली व्यक्ती या आजाराने ग्रस्त होऊ शकते. पोलिओवर कोणताही इलाज नाही, तो फक्त प्रतिबंधाने टाळता येतो. पोलिओ लस, अनेक वेळा दिल्यास, मुलाचे आयुष्यभर संरक्षण करू शकते.

पाकिस्तान हा अफगाणिस्तानसोबत जगातील पोलिओग्रस्त दोन देशांपैकी एक आहे. पाकिस्तानमध्ये दरवर्षी पोलिओ रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली होती, परंतु अलीकडे त्यात वाढ झाली आहे. पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय मोहिमा राबवल्या जात असूनही, दक्षिण खैबर पख्तूनख्वामध्ये घराघरांपर्यंत लसीकरण पोहोचण्यात अडचणी आणि अडथळे येत आहेत, ज्यामुळे अनेक मुले लसीकरणापासून वंचित आहेत आणि त्यांना धोका आहे.