'मराठीच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 20 h ago
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरु आहे. यातच मुंबईतील मिरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यावरून झालेल्या वादाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मीरा रोड येथील एका मिठाईच्या दुकानात मराठी बोलण्यास नकार दिल्याने वाद झाला आणि यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवत मोर्चा काढत आंदोलन केले.

मुंबईत मराठी आणि अमराठीवरून झालेल्या वादावरून मुंबई महापालिका निवडणुकीआधीच चांगलंच राजकारण तापले आहे. याविषयी मनसेने आपली भूमिका ठाम असल्याचे सांगितले.  यावरून भाजपा आणि मनसे आमने-सामने आल्याचंही पाहायला मिळत आहे. यानंतर मनसेनेही मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. 

दरम्यान या वादावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मनसेला मोठा इशारा दिला आहे. 'मराठीच्या नावाखाली कोणी गुंडगिरी केली तर ते सहन केली जाणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल’, असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले की, “भाषेवरून मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्हालाही मराठीचा अभिमान आहे. पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उद्या आपली अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यात व्यवसाय करतात. त्यामधील आपल्या अनेक माणसांना तेथील भाषा येत नाही. मग त्यांच्याशी पण अशाच प्रकारे वागणूक मिळाली तर? भारतामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी ही योग्य नाही. अशा प्रकारची गुंडगिरी कोणी केली तर त्यावर योग्य कारवाई केली जाईल.”

ते पुढे म्हणाले, “भाषेवरून कोणी मारहाण करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. ज्या प्रकारची घटना घडली आहे, त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि कारावाई केली आहे. यापुढेही अशा प्रकारे भाषेवरून कोणी वाद केला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. भारतातील कोणत्याही भाषेवर अशा प्रकारे अन्याय केला जाऊ शकत नाही, हे देखील आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. हे लोक इंग्रजीला जवळ करतात आणि हिंदीवरून वाद करतात. मग हा कोणता विचार आहे? त्यामुळे अशा प्रकारे जे लोक कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल."