बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान आपल्या सशक्त अभिनय आणि सामाजिक जाणीव असलेल्या सिनेमांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. लगान, तारे जमीन पर, दंगल, पीके आणि सिक्रेट सुपरस्टार यांसारख्या गाजलेल्या सिनेमांनी त्याने आपली वेगळी छाप सोडली आहे. आता आमिर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण तो १६ व्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये मुख्य पाहुणा म्हणून सहभागी होणार आहे आणि त्याला भारतीय सिनेमासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सन्मान दिला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलदरम्यान आमिरच्या कारकीर्दीवर आधारित विशेष चित्रपटांचे प्रदर्शन आहे. या वेळी त्याच्या नव्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाची खास स्क्रीनिंग होणार आहे. या चित्रपटात आमिर बास्केटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारतो, जो न्यूरोडायव्हर्जेंट प्रौढांचा संघ तयार करतो. या चित्रपटाने संवेदनशील आणि समावेशक कथानकाची सध्या जोरदार चर्चा आहे. कार्यक्रमात आमिरसोबत दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना आणि आमिर खान फिल्म्सच्या सीईओ अपर्णा पुरोहित प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.